महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या कुठे आहे, याचा पत्ता नाही. आयएएस सारख्या प्रतिष्ठीत पदावर असलेल्या पूजाचा प्रताप देशभर झाला. त्यामुळे महाराष्ट्राची चांगलीच बदनामी झाली. पूजा सोबत तिचे वडिलही फरार आहेत, तर पूजाची आई ही तुरुंगात आहे. पूजा खेड़कर सोबत आणखी एक प्रशिक्षीत अधिकारी महाराष्ट्रात गाजत आहे, हा अधिकारी म्हणजे, शुभम गुप्ता. मुळ राजस्थानचे असणारे शुभम गुप्ता हे महाराष्ट्र केडरचे आय़एएस अधिकारी आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या शुभम गुप्ता यांच्या यशोगाथेच्या प्रवासाच्या कहाण्यांचा धुरळा बसेपर्यंत त्यांच्या भ्रष्ट्राचाराच्या कथाही बाहेर आल्या. शुभम गुप्ता यांनी आदिवासी विकास प्रकल्प भामरागडचे प्रकल्प अधिकारी असताना सरकारी योजनेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याबाबत त्यांची चौकशी चालू असून, पूजा खेडकर पाठोपाठ नवनियुक्त आयएएस अधिका-यांच्या भ्रष्ट्राचाराच्या बातम्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. (Shubham Gupta)
शुभम गुप्ता हे आयएएस अधिकारी झाले, आणि त्यांच्या कष्टाच्या कहाण्या सर्वदूर ऐकू येऊ लागल्या. एकेकाळी वडिलांसोबत बूट आणि चप्पल विकणारा मुलगा अधिकारी झाला. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील भूडोली गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल कंत्राटी कामगार होते. शुभम सातव्या वर्गात असतांना त्यांचे वडिल रोजगाराच्या शोधार्थ राजस्थानहून महाराष्ट्रात आले. पालघर जिल्ह्यातील डहाणू रोडवर पादत्राणांचे दुकान थाटले. इथे शुभम अनेकवेळा वडिलांना मदत करत असत. दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नंतर एमए पूर्ण केल्यानंतर, त्यांनी युपीएससीसाठी तयारी सुरु केली. चौथ्या प्रयत्नात ते आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या या संघर्षाच्या कहाण्या सर्वत्र आल्या. मात्र त्यांची नियुक्ती भामरागड येथे झाल्यावर त्यांच्यावर झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी हा सर्व संघर्ष कलंकीत झाला. (Shubham Gupta)
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि सांगली महापालिकेचे आयुक्त असतांनाच शुभम गुप्ता वादाच्या भोव-यात अडकले. शुभम गुप्ता हे आदिवासी विकास प्रकल्प, भामरागडमध्ये प्रकल्प अधिकारी असताना या योजनेत मोठा घोटाळा झाला होता. यासंदर्भात आदिवासी विभागाने शुभम गुप्ता यांच्यावर कारवाईसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अहवाल पाठवला. यात गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आदिवासी भागात ज्या दुभत्या गायी वाटण्यात येतात, त्या योजनेत आणि लाभार्थींना मिळणा-या पैशामध्येच गुप्ता यांनी घोटाळा केल्याचा हा अहवाल आहे. आदिवासी विभागाच्या भामरागड प्रकल्प कार्यालयातील आदिवासी लाभार्थ्यांना दुभत्या गायी वाटण्याच्या नावावर गुप्ता यांनी संबंधितांना धमकी दिल्याचाही गंभीर आरोप आहे. याशिवाय आदिवासी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील पैसे दुसऱ्याच्या खात्यात वर्ग केले आहेत. (Shubham Gupta)
हे पैसे दुस-या खात्यात फिरवण्यासाठी गुप्ता यांनी फक्त आदिवासींना नाही तर कार्यालयातील कर्मचा-यांनाही दमदाट केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेतील लाभार्थी हे गायीचे फोटो काठून पैसे उकळतात, असे कारण त्यांनी चौकशी समितीपुढे दिले आहे. मात्र यातील फोलपणा उघड झाला. कारण आदिवासी लाभार्थ्यांना धमकावून थेट त्यांच्या बँक खात्यातून पैसे गुप्ता यांनी वर्ग केल्याचे लेखी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या घोटाळ्यात सहाय्य करण्यासाठी त्यांनी कार्यालयातील कर्मचा-यांनाही दमदाटी केल्याची नोंद आहे. कर्मचा-यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी शुभम गुप्ता यांनी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणाची कुणकुण लागल्यावर गुप्ता यांची चौकशी करण्यात आली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी प्रकल्पस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. (Shubham Gupta)
=======
हे देखील वाचा : आयएएस अधिका-याची पत्नी गावगुंडाच्या प्रेमात !
=======
त्यानंतरच नागपूरचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमून शुभम गुप्ता यांच्या सर्व कारभाराची सखोल चौकशी केली. त्यात ते दोषी आढळले आहेत. या योजनेत शासन निर्णयानुसार प्रति लाभार्थी ५० हजार रुपयांची मर्यादा होती. पण शुभम गुप्ता यांनी प्रति लाभार्थी १ लाख रुपये खर्च केले आहेत. या सर्व फाईल मंजूर करून घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर का करण्यात आल्याचीही माहिती आहे. हे सर्व करतांना गुप्ता रस्त्यावर फिरणाऱ्या गायी लाभार्थ्यांना देत असत. ज्यांनी या गायी घेण्यास नकार दिला त्यांना वीस हजार रुपये देण्यात आले. यात नाराज झालेल्या लाभार्थींनी मग गुप्ता यांच्या विरोधात तक्रार केली आणि हा सर्व घोटाळा उघड झाला आहे. पूजा खेडकर पाठोपाठ शुभम गुप्ता यांच्या नाव यात आल्यानं महाराष्ट्र केडरचे भ्रष्ट्राचाराच्या आरोपात ओळखले गेलेले ते दुसरे अधिकारी ठरले आहेत. (Shubham Gupta)
सई बने