द्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात.
पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे.
श्री क्षेत्र बल्लाळेश्वराची आख्यायिका (Shri Ballaleshwar Ashtvinayak Temple)
आख्यायिकेनुसार ही त्रेता युगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. बल्लाळ हा मोठा गणेशभक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाळाच्या आग्रहामुळे मुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागले. ती मुले गणेशभक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान-भूक, दिवस-रात्र कशाचेही भान उरत नसे.
एक दिवस सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधीत झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली दिसली आणि त्याचा क्रोध अनावर झाला.

संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले. त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालासुद्धा त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, “आता बघूया कोणता देव तुझे संरक्षण करतो ते.” असे म्हणून तो घरी निघून गेला.
जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेशजप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राम्हणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला. त्याने बल्लाळाला स्पर्श केला. बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली, त्याच्या जखमा भरून आल्या. बल्लाळाने ब्राम्हणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले. बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले.
गणपती म्हणाला, “माझा एक अंश इथेच राहील, माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. इथे मला लोक बल्लाळ विनायक यानावाने बोलावतील.” गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीश्या झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्यालासुद्धा धुंडीविनायक असे संबोधिले जाते. ही एक स्वयंभू मूर्ती आहे.

श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसर
एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फुट उंच आहे.
हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे.
साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.
या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे. या डोंगराचा फोटो बघून मग गणपतीची मूर्ती पाहिली की हे साम्य विशेष करून जाणवते.

श्री बल्लाळेश्वर पूजा
मंदिर सकाळी ८ पर्यंत भाविकांसाठी खुले असते. (म्हणजे सकाळी ८ पर्यंत भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात. नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत.) गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन चालू असते.
चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दहीकाला याचा नैवेद्य असतो.
कसे पोहोचणार
हे मंदिर मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथून ११ किमी अंतरावर पाली येथे आहे. हे मंदिर कोकणातील रायगढ जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-मार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमँजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: पाचवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.