श्रावण महिना सुरु झाला की, वातावरणात लगेच एक नवीन उत्साह आणि आनंद जाणवायला लागतो. नेहमीपेक्षा जरा अधिकच आल्हादायक वाटत असल्याने एक नवीन ऊर्जा जाणवत असते. यात अधिक आनंद देतात ते या महिन्यात येणारे सण. श्रावण म्हटला की, प्रत्येक वार हा सणच असतो. आता यावर्षी श्रावण सुरु होऊन एक आठवडा होत आला आहे. आज आपण श्रावणातला पहिला शनिवार. जसे की श्रावणातल्या प्रत्येक वाराचे खास महत्व असते. तसेच आज शनिवार असल्याने या श्रावणी शनिवारचे देखील एक वैशिष्ट आहे. १० ऑगस्ट २०२४ रोजी पहिला श्रावणी शनिवार आहे. आज श्रावण शुल्क पक्षातील षष्ठी तिथी आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल.
श्रावण महिना सुरु झाला की घरांमध्ये जिवतीचा कागद लावला जातो. या जिवतीच्या कागदातील प्रत्येक देवतेचे वेगळे महत्त्व आहे. या जिवतीच्या कागदात वरती सर्वांत पहिला फोटो असतो तो नृसिंह देवाचा. याच नृसिंहाचे पूजन श्रावणी शनिवारी केले जाते. तसेच अश्वत्थ मारुती पूजन करण्याची परंपराही प्रचलित आहे. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा झाली असे मानले जाते. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते.
पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार आहे. त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. यज्ञ आणि पितर अश्र्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे.
पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन पूजा केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतो, असे सांगितले जाते. येथे अश्वथ म्हणजे पिंपळ आणि मारुती म्हणजे अंजनीचे लाल हनुमान जी. हिंदू धर्मात पिंपळाची देवता म्हणून पूजा केली जाते.
शनिवारी पिंपळाच्या झाडाची कशी पूजा करावी?
पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाची तीन वेळा प्रदक्षिणा करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची काही पाने तोडून ती घरी आणून गंगाजलाने धुवावी. पाण्यात हळद घालून घट्ट मिश्रण तयार करावे आणि हे मिश्रणाने उजव्या हाताच्या करंगळीने पिंपळाच्या पानावर ‘ह्रीं’ लिहावे. नंतर उदबत्ती, दिवा ओवाळावा.
पिंपळाच्या झाडाच्या पूजेच्या वेळी वेळी ‘ॐ अश्वत्थाय नम:।’ ‘ॐ ऊध्वमुखाय नम:।’ ‘ॐ वनस्पतये नम:।’ म्हणावे. सोबतच ‘श्रीपंचमुखहनुमतकवच’, संकटमोचन श्री हनुमान स्तोत्र आणि ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः’ या मंत्रांचे पठण करावे.
यासोबतच श्रावणी शनिवारी नृसिंह देवाची देखील पूजा केली जाते. प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला होता. तसेच नृसिंह अवतार खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र काढून ही पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. किंवा प्रतिमा लावावी. त्यावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा.
श्रावणी शनिवारची कथा
एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहात होता. त्याला एक मुलगा – सून होती. मुलगा प्रवासाला गेला होता. ब्रह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते. सून घरात स्वयंपाक करून ठेवायची. सासूसार्यांना आल्यावर वाढायची व उरलंसुरलं स्वत: खात होती. असं होतां होतां श्रावण मास आला आणि संपत शनिवार आला.
त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखू घाल. सून बाई म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घाल माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घालतं, उरलं, सुरलं आपण खाल्ल. असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला.
======
हे देखील वाचा : श्रावणी शुक्रवारचे महत्व, पूजाविधी आणि कथा
======
इकडे घराचा वाडा झाला. गोठभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरलं! सासूसासरे देवाहून आले, तर घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामांजी, सासूबाई इकडे या! अंग, तू कोणाच्या घरात राहिली आहेस?
तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला, बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला, लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊ घातलं. जेवू घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले. असं म्हणून त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारूती प्रसन्न झाला, तसा तु्हां आम्हां होवो.