आपल्या भारतामध्ये एकामागोमाग एक सण सुरूच असतात. काही दिवसांच्या फरकाने अनेक सण येतात. श्रावणानंतर तर सणांची नुसती मांदियाळीच सुरु असते. आताच मोठ्या जल्लोषात आपण गणेशोत्सव साजरा केला. गणपती बाप्पांना निरोप देऊन काही दिवस होत नाही तोवर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. या नवरात्रीमध्ये आदिमाया आदिशक्ती देवीचा जागर करत तिची आराधना केली जाते. पितृपक्ष संपला की, सोमवती अमावस्येनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो.
नवरात्र अर्थात नऊ रात्री. या नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्राला विशेष महत्व आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नवरात्रात देवीच्या साडे तीन शक्तिपीठांना तर एक वेगळेच महत्व प्राप्त होते. यासोबतच घराघरांमध्ये घटस्थापना देखील केली जाते. यावेळी गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे. या लेखातून जाणून घेऊया शारदीय नवरात्राची संपूर्ण माहिती आणि पूजेच्या पद्धती.
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे. वर्षभरात आपण चार नवरात्री साजऱ्या करतो यात दोन नवरात्री या गुप्त नवरात्री असतात. तर एक चैत्र महिन्यात साजरे नवरात्र आणि दुसरे आश्विन महिन्यात साजरे होणारे नवरात्र. अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने या नवरात्राला शारदीय नवरात्री म्हणतात. आपल्या पुराणातील कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची या नव्रतारीच्या नऊ दिवसांमध्ये पूजा केली जाते. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रुपात पृथ्वीवर असते. म्हणूनच या नऊ दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे.
नवरात्र तिथी आणि वेळ आणि तारीख
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा ही तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होणार असून, ती शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी संपणार आहे. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला देवीचे आवाहन करत तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. याला घटस्थापना असे संबोधतात. घटस्थापनेचा यंदाचा मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून सुरु होणार असून, तो ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत, ज्यात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी यांचा समावेश होतो. या नवरात्रोत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे येतात.
घटस्थापनेचे साहित्य
नवरात्री घटस्थापनेसाठी मातीचे लहान मडके किंवा कलश, विविध प्रकरची धान्ये, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतासाठी तांदुळ, आंब्यांची डहाळी (आंब्याची पाने), पैशांची नाणी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, श्रृंगार पेटी, फुलांचे हार, इत्यादी साहीत्य लागते.
घटस्थापना करण्याची पद्धत
कलशाची स्थापना करण्यासाठी फरशीवर किंवा टोपलीमध्ये माती पसरून घ्यावी. त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी. कलशात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून घेऊन त्याला सप्तरंगी धागा बांधावा. कलशातील पाण्यात सुपारी, अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंबाची पाने ठेवावीत, त्यानंतर नारळाला देखील सप्तरंगी डोरा बांधून तो कलशावर ठेवावा.
काही ठिकाणी नारळ शेजारी देवीचा टाक, मूर्ती ठेवण्याची देखील प्रथा असते. शिवाय अनेक ठिकाणी कलशावर नारळ न ठेवता कलशावर ताम्हण ठेऊन त्यात तांदूळ भरून मग आडवा नारळ ठेवला जातो. त्यानंतर त्या कलशावर येईल अशी झेंडूच्या फुलांची किंवा विड्याच्या पानांची ७ च्या पटीमध्ये माळ तयार करून बांधली जाते. यासोबतच देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची सकाळ, संध्याकाळ पूजा केली जाते. या नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक घरांमध्ये किंवा देवीच्या मंदिरांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात.
सोबतच अनेक घरांमध्ये नऊ दिवस उपवास करण्याची परंपरा असते, तर काही घरांमध्ये उठता बसता उपवास असतात. काही घरांमध्ये या नऊ दिवसात एकच धान्य खाण्याची पद्धत असते. काही ठिकाणी फक्त फळं खाल्ली जातात. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचे आपले एक वेगळे महत्व आहे. अनेक ठिकाणी पाचव्या, सातव्या, आठव्या दिवशी फुलोरा केला जातो. अष्टमीला उपवास करत कुमारिका पूजन होते. सोबतच अष्टमीलाच देवीच्या मंदिराभोवती हळदी कुंकवाचा सडा टाकला जातो. नवमीला होमहवन होते आणि दशमीला पुरणावरणाचा नैवेद्य करत पारणे केले जाते. यात काही घरांमध्ये सवाष्ण भोजन देखील केले जाते.
======
हे देखील वाचा : तणावमुक्त होण्यासाठी करा ‘ही’ योगासने
======
शारदीय नवरात्री २०२४ तिथी
दिवस पहिला – ३ ऑक्टोबर, गुरुवार – घटस्थापना, शैलपुत्री पूजा
दिवस दुसरा – ४ ऑक्टोबर, शुक्रवार – ब्रह्मचारिणी पूजा
दिवस तिसरा – ५ ऑक्टोबर, शनिवार – चंद्रघंटा पूजा
दिवस चौथा – ६ ऑक्टोबर, रविवार – विनायक चतुर्थी
दिवस पाचवा – ७ ऑक्टोबर सोमवार – कुष्मांडा पूजा
दिवस सहावा – ८ ऑक्टोबर मंगळवार- स्कंदमाता पूजा
दिवस सातवा – ९ ऑक्टोबर बुधवार- कात्यायनी पूजा
दिवस आठवा – १० ऑक्टोबर, गुरुवार – कालरात्री पूजा
दिवस नववा – ११ ऑक्टोबर, शुक्रवार – दुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीय
दिवस दहावा -१२ ऑक्टोबर, शनिवार – नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा