सध्या संपूर्ण देशामध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. प्रत्येक राज्यात, गावात, शहरात नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर असतो. सण जरी एक असला तरी तो साजरा करण्याची पद्धत प्रत्येक गावावर, राज्यानुसार बदलेली पाहायला मिळते. त्यामुळे नवरात्र महाराष्ट्रामध्ये साजरी करण्याची पद्धत वेगळी असते तर गुजरात आणि बंगालमध्ये अजूनच वेगळी असते.
गुजरातमध्ये नवरात्रीचा जल्लोष वेगळाच असतो. देवीचे पूजन आणि रास गरबा याला गुजरातमध्ये मोठे महत्व आहे. मात्र यासोबतच नवरात्रीचे अजून एक आकर्षण म्हणजे बंगालमधील दुर्गा पूजा. बंगाली लोकांमध्ये दुर्गापूजेला मोठे महत्व आहे. आपल्याकडे नवरात्र नऊ दिवस साजरे केले जाते मात्र बंगालमध्ये नवरात्र किंवा दुर्गा पूजा चारच दिवस करतात.
बंगालमध्ये दुर्गापूजेच्या मोठी धूम पाहायला मिळते. या काळात शहरं, गावं सर्वच मोठ्या उत्साहात असतात. बाजारपेठा देखील फुललेल्या असतात. सगळीकडे चैतन्य आणि उत्साह भरभरून ओसंडत असतो. या दुर्गा पूजेचे सर्वात मोठे आणि प्रमुख आकर्षण म्हणजे मोठे आणि भव्य दिव्य डोळे दिपवणारे पंडाल. दरवर्षी उत्सव मंडळे विविध थीम वापरून हे पंडाल बनवतात. दुर्गामाता नवरात्रात आपल्या घरी येते म्हणजे तिच्या माहेरी येते. अशी मान्यता आहे. त्यामुळे सर्वच लोकं एकजुटीने दुर्गामातेच्या सेवेसाठी एकत्र येतात.
बंगाली संस्कृतीमध्ये नवरात्राच्या सातव्या दिवसापासून अर्थात सप्तमीपासून ते दसऱ्यापर्यंत अर्थात दशमीपर्यंत दुर्गादेवीची पूजा केली जाते. सातव्या दिवशी दुर्गामातेची भव्य प्रतिमा मोठमोठ्या पंडालमध्ये स्थापित करून दशमीपर्यंत तिची पूजा-अर्चा करण्याची पद्धत आहे. आजही ही दुर्गापूजा अगदी पारंपरिक पद्धतीनेच साजरी होती. दुर्गा देवीची अतिशय मोठी आणि भव्य प्रतिमा मूर्तीकारांकडून तयार करून घेतली जाते. या दुर्गा देवीच्या प्रतिमेसोबतच गणपती, कार्तिकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमादेखील तयार करून घेतल्या जातात. एका मोठ्या आडव्या पाटावर या मूर्तींची मांडणी केली जाते. या मुर्त्यांमागे एक मोठी कमान देखील उभी केली जाते.
चोखूदान विधी
कोलकातामधील प्रमुख सण म्हणून दुर्गापूजा सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी आजही खास रितीरिवाज आणि परंपरा आहेत. त्यानुसारच हा सण साजरा केला जातो. नवरात्र सुरु आधी दुर्गा मातेची मूर्ती तयार करून रंगवली जाते. संपूर्ण मूर्ती जरी तयार झाली असली तरी देवीच्या मातेच्या डोळ्यांना रंग दिला जात नाही. महालयाच्या दिवशी दुर्गामातेची यथासांग पूजा करून तिला पृथ्वीवर येण्याचे रीतसर आमंत्रण दिले जाते. आणि मग त्याच शुभ मुहुर्तावर देवीच्या मूर्तीवर डोळे साकारले जातात. या शुभ विधीला चोखूदान असे म्हणतात. याचा अर्थ आहे नेत्रदान असा होतो. देवी याच दिवशी धर्तीवर प्रवेश करते अशी मान्यता आहे. कोलकातामध्ये कुमारतुली नावाचा एक परिसर आहे. ती कुंभारांची वस्ती असून तिथे संपूर्ण भागात दुर्गामातेच्या मूर्ती साकारल्या जातात.
दुर्गामातेचे माहेरपण
आपल्याकडील नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे कोलकात्यातील दुर्गा पूजेचा पहिला दिवस असतो. दुर्गा देवी ही पार्वती मातेचा अवतार मानली जाते. आणि म्हणूच जेव्हा देवी माहेरी येते तेव्हा ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह येते. अर्थात दुर्गादेवीसोबत तिचे पती भगवान शिव शंकर आणि दोन्ही मुले गणपती, कार्तिकेय देखील असतात. सुंदर आणि आकर्षक देवीच्या मूर्तींची घरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये आणली जाते. दुर्गा देवीच्या मूर्तीला फुले, वस्त्र, दागिने आणि सिंदुर याने सजवले जाते. देवीसमोर अनेकविध मिठाई ठेवल्या जातात.
कोलाबोखीरास
दुर्गामातेची मूर्ती आणल्यानंतर तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सप्तमीच्या दिवशी ही पूजा केली जाते. याला बंगाली भाषेमध्ये “कोलाबोखीरास” किंवा “कोला बौ” असे म्हणतात. नवरात्रीच्या सातव्या दिवशी पहाटेपासून हे विधी सुरु होतात. केळीच्या झाडाला नदीवर नेले जाते, स्नान घालून, लाल किनार असणारी साडी नेसवली जाते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात देवीची मिरवणूक काढून वाजत गाजत विधीवत सजवलेले केळीचे झाड पंडाल किंवा घरात आणले जाते. त्यानंतर ते झाड देवीच्या बाजूला उभे करून ठेवले जाते.
कुमारीपुजा
कुमारीपुजा ही प्रथा बंगालमध्ये महत्वाची मानली जाते. कुमारीकांची नऊ दिवस पूजा केली जाते. या प्रथेची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या बेलूर मठात झाली असल्याचे सांगण्यात येते. दुर्गा देवीचे रौद्र रूप आणि सौम्य अशी दोन रूपं आहेत. आणि ही दोन्ही रूपं आपल्याला बंगालमधील दुर्गापूजेत पहायला मिळतात.
महागौरी आणि चंडी पूजा
अष्टमीच्या दिवशी देवीने महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी रूपात पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा असते. देवीने चामुंडाचे रूप घेतल्याने चंडी पूजा केली जाते असे म्हणतात. या दिवशी देवीला विशेष ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायस या गोड पदार्थाचा समावेश असतो. तसेच सामिष भोजन देखील मातेला अर्पण केले जाते. बंगाली संस्कृतीत हिल्सा किंवा इलिश मासे महत्त्वपूर्ण असतात. दुर्गापूजामध्ये देखील याचा देवीला नैवेद्य दाखवला जाते.
======
हे देखील वाचा : नवरात्राची सातवी माळ – कालरात्री देवी
======
ढोल वादन, सिंदुर उत्सव
नवरात्रात दररोज ढोल वादन केले जाते. बंगाली स्त्रिया एक अतिशय खास तोंडावर बोट फिरवत “उलु” ध्वनी काढतात. हा आवाज अत्यंत शुभ मानला जातो. विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा नैवैद्य असतो. त्याला “चरणमिर्ती” असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया ‘सिंदुर उत्सव’ साजरा करतात. सोप्या शब्दात सांगायचे तर सवाष्ण महिला सिंदूराने होळी खेळतात.
माहेरवास झाल्यानंतर पुन्हा आपली पतीगृही जाण्यास निघालेल्या दुर्गा देवीला डोक्याला सिंदूर लावला जातो. याला “कनक अंजली” म्हणतात. त्यानंतर सुरुवात होते उत्तर पूजेची. उत्तर दिशेला कलश ठेवून त्यात फुले ठेवली जातात. त्यानंतर मातेची प्रतिमा विसर्जनासाठी बाहेर काढली जाते. दुर्गा मातेला सोबत खाण्या-पिण्याचे पदार्थ दिले जातात. त्याची एक पोटली सोबत दिली जाते. शिवाय दुर्गा मातेसोबत श्रृंगाराच्या वस्तूही दिल्याही जातात. या प्रथेला “बोरन” असे म्हणतात. या दुर्गा पूजेच्या काळात बंगालमध्ये जाऊन हा सोहळा याची देही याची डोळा बघणे खरंच खूपच सुंदर आणि समाधानकारक असते.