अवघ्या काही दिवसांवरच शारदीय नवरात्र उत्सव येऊन ठेपले आहे. सध्या सर्वत्र या नवरात्राची जोरदार तयारी चालू आहे. मंदिरांमध्ये रंगरंगोटी करून, ते स्वच्छ धुतले जात आहे. नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा करत तिचा आशीर्वाद मिळवला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवी पृथ्वीवर असते आणि तिच्या भक्तांवर भरभरून आशीर्वादाचा वर्षाव करत असते. नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्वच देवीच्या मंदिरांना उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले असते.
असे असताना याच महाराष्ट्रातील अतिशय जाज्वल्य आणि प्रसिद्ध अशा साडे तीन शक्तिपीठांना अनन्यसाधारण महत्व असते. या साडे तीन शक्तिपीठांचा आपला स्वतःचा एक वेगळाच महिमा आहे. महाराष्ट्रात या साडे तीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूर गडाची रेणुका माता आणि अर्धे शक्तीपीठ म्हणून वणीच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरांना ओळखले जाते. आपण नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया या साडे तीन शक्तिपीठांच्या इतिहासाबद्दल.
श्री महालक्ष्मी कोल्हापूर
महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये असलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे पहिले शक्तीपीठ आहे. महालक्ष्मी मंदिर एक जागृत देवस्थान मानले जाते. कोल्हापूरची महालक्ष्मी ही भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री महालक्ष्मी मंदिर हे संपूर्ण देशात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अंबाबाईचा उल्लेख पुराणात देखील सापडतो.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ म्हणून कोल्हापूरची अंबाबाई ओळखली जाते. या मंदिराबद्दल बोलायचे झाले तर चालुक्य राजवटीत या मंदिराचे बांधकाम केले गेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला पाच कळस आहे. हे महालक्ष्मी मंदिर एकमेवाद्वितिय असं म्हटलं पाहिजे. यात दोन मजले असून दोन गर्भगृहे आहेत. सध्या दिसणारी शिखरं अगदी अलिकडची म्हणजे 18 व्या किंवा 19 व्या शतकातली असावीत. श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे सांगितले जाते. कोल्हापूरमध्ये दर वर्षी शारदीय नवरात्र हे भव्य दिव्य स्वरूपात साजरे केले जाते.
वर्षातून दोनदा महालक्ष्मीच्या मंदिरात ‘किरणोत्सव’चा नेत्रदीपक सोहळा साजरा केला जातो. हे मंदिराचे वैशिष्ट्य असून, दर वर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये हा सोहळा साजरा होतो. ठराविक दिवशी उगवित्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा सोहळा पाहण्यासाठी, हजारो भाविक आवर्जून कोल्हापुरामध्ये येत असतात. या शिवाय रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते. नवरात्र उत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरूपती देवस्थानाकडून शालू पाठवण्यात येतो. कोल्हापूरची महालक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे या नात्याने हा शालू पाठवला जातो.
श्री तुळजाभवानी तुळजापूर
महाराष्ट्रातील तुळजापूर मध्ये असलेली तुळजाभवानी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी दुसरे महत्वाचे पीठ मानले जाते. तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत असे सांगितले जाते.
श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता असलेली तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना दर्शन देत त्यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद तुळजाभवानीने दिला, असे सांगितले जाते. पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
पुराणानुसार राक्षसांचा संहारकरून धर्माची स्थापना करण्याचे कार्य तुळजाभवानी देवीने केले. तसेच स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील तुळजाभवानी आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो. भक्तांची अलोट गर्दी या काळात येथे असते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो अशी मान्यता आहे.
वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची देखील मिरवणूक निघते.
श्री रेणुका देवी माहूर
महाराष्ट्रातील माहूरगड मध्ये असलेली रेणुका देवी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे पीठ असून जागृत देवस्थान आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुकदेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो.
अनेक जणांची कुलदेवता असलेली रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. रेणुका मातेचे देऊळ यादव काळातील राजाने बांधले आहे अशी आख्यायिका आहे. तसेच माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. रेणुकादेवीचे हे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे, असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.
तर देऊळ हे गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहेत. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाही. गाभाऱ्याचे प्रवेश द्वार चांदीच्या पत्राचे आहे. देवीचा मुखवटा तब्बल 5 फुटी उंचीचा असून रुंदी 4 फुटी एवढी आहे. तसेच देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे. मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साठवून ठेवण्या सारखे आहे.
शारदीय नवरात्र हे माहूरगडावर शुचिर्भूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरा करतात. नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी असते. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्या पर्यंत दर रोजचा नैवेद्य म्हणजे दहीभात, पुरणपोळी दाखवतात. ललितापंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात. माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी, मकरसंक्रांत, होळी इत्यादी सर्व सण साजरे केले जातात.
श्री सप्तशृंगी देवी वणी
साडेतीन शक्तिपीठांपैकी असलेले अर्धे शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी होय. महाराष्ट्रातील नाशिकजवळ असलेले वणी हे सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे शक्तीपीठ आहे.
देवीआईचे हे मंदिर 4800 फूट उंचीवर आहे. तसेच देवीची मूर्ती आठ फुटी उंच असून तिला अठरा भुजा आहे. तर मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्रीसोबतच शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो.
देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. तसेच गडावर शारदीय नवरात्रोत्सव, गुडी पाडवा, चैत्रउत्सव, गोकुळाष्टमी, कोजागिरी उत्सव, लक्ष्मी पूजन, हरिहर भेट, महाशिवरात्र इत्यादी उत्सव गडावर भव्य आणि दिव्य साजरे केले जातात.