काका मला वाचवा
‘ध’ चा ‘मा’ झाला
नक्की काय घडलं होतं
शनिवारवाड्यात ?
‘काका मला वाचवा’, पुण्याच्या शनिवारवाड्यातून आजही अशी आरोळी ऐकू येते, असं अनेक जण सांगतात. काहींच्या मते शनिवारवाडाच झपाटलेलं आहे. काही जण म्हणतात, की या निव्वळ अफवा आहेत. मुळात ‘काका मला वाचवा’ हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण ते कोणाशी निगडीत आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे आजही कित्येक लोकांना माहित नाही. थोरले बाजीराव पेशवे यांनी पुण्यात भव्य शनिवारवाडा बांधून घेतला होता. त्यानंतर पुढचे नियुक्त पेशवे याच ठिकाणी वास्तव्य करू लागले. पण काही काळानंतर पेशव्यांमध्येच ताटातूट झाली आणि पहिल्यांदाच एका पेशव्याची हत्या याच शनिवारवाड्यात करण्यात आली. त्या दिवशी शनिवारवाड्यात नक्की काय घडलं होतं, ‘ध’ चा ‘मा’ झाला म्हणजे नक्की काय झालं, जाणून घेऊया. (Shaniwarwada)
थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे आणि याच नानासाहेबांचे पुत्र असलेल्या नारायणराव पेशवे यांच्या हत्येशीच ‘काका मला वाचवा’ निगडीत आहे. १७७२ साली पहिले माधवराव पेशवे यांचं निधन झाल्यानंतर पेशवेपदी नारायणराव आले. यावेळी त्यांचं वय केवळ १७ वर्ष होतं. नारायणराव गादीवर आले ही गोष्ट राघोबादादा यांना काही पचनी पडली नाही. राघोबादादा म्हणजेच रघुनाथराव हे पेशवे बाजीराव आणि काशीबाई यांचे कनिष्ठ पुत्र ! त्यांना पेशवेपदाची गादी हवी होती यासाठी त्यांनी अंतर्गत राजकारण करायला सुरुवात केली. त्यांनी नारायणराव यांना कैद करून स्वत: गादीवर बसण्याची योजना राघोबा दादांनी आखली. यामध्ये गारदी लोकांनाही सहभागी करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यावेळी पेशव्यांच्या आणि पुण्याच्या संरक्षणासाठी गारदी सैनिक असायचे. हे गारदी म्हणजे पठाण, अरब, राजपूत, काही युथोपियाचे आणि काही उत्तर भारतातले होते. फ्रेंच मिलिटरी लीडर चार्ल्स जोसेफ पॅटीसर याने केलेल्या उल्लेखानुसार पेशवे या गारदिंना ८ ते १५ रुपये वेतन द्यायचे. यापैकीच दोन गारदी म्हणजे सुमेरसिंग गारदी आणि खडकसिंग गारदी. या दोन्ही गारदींकडे राघोबादादांकडून एक पत्र गेले की, ‘नारायणराव यांस धरावे’ ! पण या पत्रामध्ये कुणीतरी बदल केला आणि तो कोणी केला, हे आजपर्यंत कळलं नाही. यामध्ये धरावेच्या जागी मारावे असं करण्यात आलं. यानंतरच ‘ध’ चा ‘मा’ झाला अशी म्हण प्रसिद्ध झाली. काही जणांच्या मते पत्रातला हा बदल राघोबादादा यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी केला होता. पण यात किती तथ्य आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. (Social News)
पहायला गेलं तर, राघोबादादा आणि आनंदीबाई यांचं नारायणरावांवर वडिलकीच्या नात्यानं प्रेम होतं, असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. पण त्यांना पेशवे बनवल्यानंतर राघोबादादांच्या मनात ईर्ष्या वाढत केली आणि नारायणरावांच्या अनेक निर्णयांबद्दल ते नाराजही होते. यामुळेच राघोबादादांनी नारायणरावांच्या विरोधात कट रचला. हा कट केवळ नारायणरावांना पकडून, कैदेत टाकून, स्वत: पेशवा व्हायचं असा होता. पण प्रत्यक्षात वेगळ घडलं आणि ‘ध’ चा ‘मा’ झाला. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली होती, त्याच दिवशी त्यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती नारायणरावांना आंग्रे यांनी दिली होती, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होत. पण शनिवारवाड्यात गेल्यावर त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं. तो दिवस होता ३० ऑगस्ट, १७७३ पुण्यात गणेशोत्सव सुरु होता. जवळपास ७००-८०० गारदिंना घेऊन सुमेरसिंग, खडकसिंग, महंमद इसब आणि तुळाजी पवार वाड्यात शिरले. त्यांनी दिल्ली दरवाजा आणि खिडकी दरवाजाने वाड्यात प्रवेश केला. चौक्या, पहारे बसवले आणि वाड्याचे सर्व दरवाजे बंद करून टाकले. त्यामुळे आत नेमकं काय चाललय, याचा पत्ता कोणालाही लागणार नव्हता. (Shaniwarwada)
महत्त्वाचं म्हणजे त्यावेळचे मातब्बर मराठा सरदार, नाना फडणवीस, त्र्यंबक मामा पेठे, हरिपंत फडके यांना याची काडीचीही कल्पना नव्हती. त्यामुळे राघोबादादा यांनी ही योजना किती गुप्तपणे केली होती, हे आपल्याला कळून येतं. गारदी वाड्यात आले. नारायणराव रंग महालाच्या तिसऱ्या मजल्यावर होते. यावर गारदी जोरजोरात ओरडू लागले, ‘आमचा पगार आम्हाला द्या’! यावर नारायणराव यांनी सांगितलं की, तुम्ही कचेरीतून पगार घ्या. यानंतर तुम्ही पेशवे आहात, तुम्हीच पगार द्या, असं गारदी म्हणाले. हे ऐकल्यावर नारायणराव खाली यायला लागले, आतापर्यंत त्यांना कळून चुकलं होत की आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपला जीव वाचवण उत्तम ठरेल. आणि मग शनिवारवाड्यात त्यांचा पाठलाग सुरु झाला. नारायणराव रंग महालातून सातखणी नावाच्या इमारतीकडे गेले. गारदी त्यांच्या मागावरच होते. यावेळी नारायणरावांचे हुजरे इच्छाराम ढेरे गारदींसमोर गेले, पण त्यांच्यावर हल्ला झाला. यानंतर नारोपंत फाटक नावाचे गायक त्याठिकाणी गारदींना भेटले, मात्र पेशवे समजून त्यांनाही तलवारीने मारण्यात आलं. नारायणराव पार्वतीबाईंच्या खोलीत आले आणि त्यांनी पार्वती बाईंना विचारलं की मी आता काय करू ? यावर पार्वतीबाईंनी सल्ला दिला की, तुम्ही राघोबा दादांकडे जा. आतापर्यंत वाड्याच्या बाहेर संपूर्ण पुण्यात ही खबर पसरली होती. यानंतर नारायणराव राघोबा दादांच्या खोलीत शिरले. दारात गणेश गोविंद बारगीर नावाचा चौकीदार उभा होता, त्याने नारायणरावांना दादांच्या खोली जाऊ दिलं. नारायणराव त्यांच्या पायावर पडले आणि ‘काका मला वाचवा, काका मला वाचवा’ असं म्हणू लागले. एवढ्यातच तुळाजी पवार तिथे आला. त्याने तलवार उगारली. राघोबा दादांनी तुळाजीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दादांवर वार केला. दादांची पगडी खाली पडली आणि घळाघळा रक्त यायला लागलं. (Social News)
एवढ्यात राघोबादादांच्या समोरच शेंडी ओढून नारायणरावांना चौकात आणण्यात आलं. चापाजी नावाचा आणखी एक हुजऱ्या नारायणरावांच्या बचावासाठी त्यांच्या अंगावर पडला. मात्र तुळाजीने चापाजी यांचे एका घावातच दोन तुकडे करून टाकले. यानंतर तलवारीने नारायणरावांचा एक हात तोडण्यात आला. पुढच्या घाव पोटावर पडला. नारायणरावांचा कोथळा बाहेर आला आणि त्यासोबत दुपारी खाल्लेलं जेवणसुद्धा पोटातून बाहेर आलं. यानंतर सर्वांनी तलवारीने नारायणराव पेशव्यांचे अक्षरशः तुकडे करून टाकले. संपूर्ण शनिवारवाड्यात रक्तामांसाचा चिखल झाला. कारण नारायणराव यांच्यासोबत ७-८ ब्राम्हण, काही गाई, वाड्यात काम करणाऱ्या बायका आणि चौकीदार अशी अनेकांची हत्या करण्यात आली होती. काका राघोबा दादांसमोरच त्यांच्या पुतण्याचा वाईट पद्धतीने खून झाला यानंतर गारद्यांनी राघोबा दादांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. बाहेर इतर मराठा सरदार तोफा घेऊन तयार झाले. वाड्याचे दरवाजे तोफांनी उडवावे, अशी योजना करण्यात आली होती. यावर गारद्यांनी म्हटलं, की यामध्ये आमची काही चूक नाही आणि आम्हाला असे करण्याचे आदेश राघोबादादांनी दिले होते. (Shaniwarwada)
========
हे देखील वाचा : हिंदुत्वाला आजार म्हणणारी मुफ्तींची पुढची पिढी
========
इथे एक गोष्ट आवर्जून कळून येते की, राघोबा दादांनी नारायणरावांना मारण्याचा आदेश दिलाच नव्हता, केवळ कैद करण्याचा त्यांचा आदेश होता. याच कारणाने त्यांनी नारायणरावांना वाचवण्याचे प्रयत्न केले होते, असं एकंदरीत प्रसंगातून कळून येत. पण शेवटी त्यांच्या खुनाचा शिक्का राघोबा दादांवर बसलाच भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण मराठेशाही हादरली होती. यानंतर राघोबादादांनी स्वत:ला पेशवा म्हणून घोषित केलं. पण पुतण्याचा खून करून पेशवेपदाची गादी बळकावण्याचा डाग त्यांच्यावर राहिला. जवळपास वर्षभर ते पेशवेपदावर राहिले. मात्र नंतर नाना फडणवीस आणि इतर 12 मुत्सद्दी लोकांनी त्यांना पेशवेपदावरून काढून टाकलं. आणि त्यांच्यानंतर नुकतेच जन्मलेले नारायणराव पेशवे यांचे पुत्र माधवराव दुसरे यांना गादीवर बसवण्यात आलं. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ही सर्वात दुख:द घटनांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते. यानंतरच ‘काका मला वाचवा’ आणि ‘ध’ चा ‘मा’ झाला’ हे वाक्य आपल्या मराठी भाषेत प्रचलित झाले. (Social News)