सध्या सर्वत्र ठराविक वाक्य बोलली जात आहेत, ती म्हणजे, यंदा उष्मा जास्तच आहे. तापमान वाढलं आहे. गरमी जास्त आहे. अर्थातच सर्वत्र सूर्याचा पारा वाढला आहे. या सूर्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापैकी प्रमुख भर हा आहारावर आहे. यातील एक आहे, सत्तूचे पिठ. उन्हाळा वाढला की या सातूच्या पिठाचे सेवन जास्त करावे असे सांगण्यात येते. फारकाय अयोध्येत येणा-या भक्तांनाही तेथील प्रशासनानं असेच सातूचे पिठ सोबत ठेवावे असे आवाहन केले आहे. उन्हामुळे होणा-या आजारांचा सामना करायचा असेल तर हे सातूचे पीठ उपयोगी येते. पण हे सत्तूचे पिठ म्हणजे नेमके काय आणि त्याचा उपयोग कसा करावा याचा प्रश्न अनेकांना पडतो. (Satu Flour)
सातूचे पीठ म्हणजे, हरभ-यापासून बनवलेले पिठ. भाजलेल्या चण्याचे शक्यतो हे पीठ करण्यात येते. त्यात उच्च प्रथिने असतात. उन्हाळ्यात ब-याचवेळा पाणी जास्त प्यायल्यानं भुकेचं प्रमाण कमी होते. अशावेळी या सातू पिठातील प्रथिनांचा चांगला उपयोग होतो. उत्तर भारतात या सातूच्या पिठाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येतो. त्यासोबत झारखंड, बिहार, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली यासारख्या राज्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात सत्तूचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. या दरम्यान आलेल्या सर्व सण, समारंभामध्येही या सत्तूपासून पदर्थ बनवण्यात येतात. या सातूमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम आणि इतर विविध जीवनसत्त्वे असतात म्हणून याचा उल्लेख भारतीयांचे सूपरफूड असाही कऱण्यात येतो. याच सातूपासून बनवलेले पदार्थ उन्हाळ्यात खाल्यानं शरीराचे तापमान कमी राहते, असे सांगण्यात येते. उष्णतेची लाट असेल तेव्हा अशाच पदार्थांचे आहारात महत्त्व आहे. सातूचे पीठ हे भाजलेल्या हरभऱ्यापासून बनवण्यात येते. शरीरातील रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठीचा हमखास उपाय म्हणून या सातूपिठाचे नाव घेण्यात येते.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. अशावेळी या सातूपिठाचा वापर करीत अनेक पदार्थ तयार केले जातात, जेणेकरुन शरीराची पाण्याची आणि आहाराची गरजही पूर्ण होते. या सातूपिठामध्ये पाणी , लिंबू, साखर आणि मिठाचा वापर करीत सरबत तयार केले तरीही त्यातून आवश्यक अशी प्रथिने शरीराला मिळतात. काहीवेळा या पिठाचे सूपही तयार करण्यात येते. उन्हाळ्यात हे सूप पुरक अन्न म्हणून वापरले जाते. सातू पिठाचा एक आणखी उपयोग म्हणजे, बाहेर फिरायला जातांना हे पिठ आणि अन्य पुरक गोष्टी सोबत असल्या तर त्यापासून काही मिनिटातच एखादा पदार्थ तयार होतो. नुसते सातूचे पिठ आणि गुळ यांना मिसळून त्याचे सेवन केले तरी शरीराला आवश्यक असलेल्या सर्व प्रथिनांची पूर्तता होते. (Satu Flour)
यात सातूपिठामध्ये आवडीच्या भाज्या आणि कांदा, मिरची घातली तर त्यांचे डोसे किंवा चिल्लाही चांगला लागतो. या उष्णतेमध्ये ब-याच वेळा भाज्या मिळत नाही, अशावेळी फार कमी भाज्यांमध्ये होणारा हा चवदार पदार्थ आहे. तसेच उन्हाळ्यात लहान मुले घरी असतात, त्यांनाही आवडणारा हा पदार्थ आहे. सातूचे लाडू हा बराच प्रसिद्ध पदार्थ आहे. उत्तर भारतासह अनेक राज्यात गरमीची चाहूल लागली की, घराघरात असेच सत्तूचे लाडू तयार केले जातात. ज्यांचे काम फिरतीचे आहे, अशांसाठी हे सातूचे लाडू एखाद्या वरदानासारखे ठरतात. सत्तूचे लाडू फार माफक सामानात तयार केले जातात. त्यात साखरेपेक्षा गुळाचा वापर होत असल्यामुळे ते अधिक सात्विक होतात. सत्तू, गुळ आणि तूपासह वेलचीपूड यांचा वापर केलेले हे सत्तू लाडू उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांना आवश्यक खाऊ घालावेत. त्यामुळे मुलांना आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मिळतात. घराबाहेर काम करत असलेल्यांना हे सत्तूचे लाडू अधिक लाभदायक ठरतात. (Satu Flour)
============
हे देखील वाचा : खरी सिल्व्हर ज्वेलरी अशी ओखळा, फसवणूकीपासून रहाल दूर
============
काही ठिकाणी हे सातूचे पीठ बनवतांना त्यामध्ये भाजलेल्या चण्यासह भाजलेल्या मक्याच्या दाण्याचाही वापर करण्यात येतो. या दोन्ही पिठांचे समसमान प्रमाण घेण्यात येते. हे पीठ पाण्यात भिजवून ठेवूनही देण्यात येते. हे पाणी काही तासांच्या अंतरानं प्यायल्यास गरमीमध्ये वाटणारा थकवा, आणि अन्य शारीरिक तक्रारी दूर होतात, असे सांगण्यात येते.
सई बने