Home » म्हणून शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत संत नामदेव !

म्हणून शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत संत नामदेव !

by Team Gajawaja
0 comment
Sant Namdev
Share

हरि नांव हीरा हरि नांव हीरा । हरि नांव लेत मिटै सब पीरा ॥
हरि नांव जाती हरि नांव पांती । हरि नांव सकल जीवन मैं क्रांती ॥

संत कबीर, तुलसीदास किंवा रोहिदास यांच्या ओळी असतील. पण या ओळी आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले संत नामदेव महाराज यांच्या ! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हिन्दी आणि संत नामदेव यांचा संबंध तरी काय? तर फक्त हिंदीच नाही तर पंजाबी साहित्यातसुद्धा नामदेव महाराजांनी आपला ठसा उमटवला होता. पंजाबमध्ये त्यांना इतकी प्रसिद्ध मिळाली होती की, चक्क शिखांचं पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्येही त्यांचा उल्लेख आपल्या मिळतो. आजही पंजाबमध्ये नामदेव महाराज बाबाजी म्हणून ओळखले जातात. पण महाराष्ट्रभूमीतले संत पंजाबपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी इतके प्रतिष्ठित व्यक्ती कसे झाले, यामागची गोष्टसुद्धा फार प्रेरित करणारी आहे. (Sant Namdev)

आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा हजारो वर्षांचा वारसा लाभला आहे. त्यात वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी अभंग रचून समाज प्रबोधनाचं काम केलं. हे सर्व संत वैष्णव म्हणजेच विठ्ठलाची भक्ति करणारे असेच एक मराठवाड्यातील विठ्ठलाचे भक्त थेट पंजाबपर्यंत पोहोचले, तेसुद्धा 13 व्या शतकात ! संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन संत पंजाबमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वरांसोबत उत्तर भारताची यात्रा केली होती. महाराष्ट्रात पुन्हा परतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. यानंतर नामदेव महाराज दक्षिणेत गेले. पण त्यांनी पंजाब हीच आपल्या साहित्य, आणि संत परंपरेच्या कार्याची कर्मभूमी निवडली. (Sant Namdev)

नामदेव महाराजांनी खर्‍या अर्थाने महाराष्ट्र सोडला आणि आपल्या आयुष्याची उरलेली ५४ वर्षे भागवत धर्माच्या प्रचारात आणि सेवेत वाहिली. पंजाबमध्ये सुरुवातीला ते भूतविंड गावात आले. इथे त्यांची भेट बाबा बोहरदास यांच्याशी झाली. हेच बाबा बोहरदास अखेरपर्यंत संत नामदेवांसोबत होते, त्यांनीच नामदेवांचे पंजाबमधील कार्य त्यांच्या पश्चात सुरू ठेवलं होतं. नामदेव महाराज संत, त्यात ते अभंग गाणारे व्यक्तिमत्त्व  यामुळे अनेक शीख त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. भूतविंडनंतर नामदेव महाराज मर्डी या गावात गेले. इथे त्यांनी बोहरदासांचं लग्न लावून दिलं. मर्डीवरून ते या भट्टिवाल गावात आले, तिथे तेव्हा पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. यावेळी नामदेव महाराजांनी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना सांगितलं आणि इथला पाण्याचा दुष्काळ संपला. यानंतर अनेक गावांमध्ये त्यांना मानणाऱ्यांची संख्या वाढायला लागली.

नामदेव महाराज हिन्दीसोबत पंजाबी भाषासुद्धा शिकले होते. उत्तर भारतात तीर्थयात्रा करत ते हरिद्वारहून दिल्ली तिथून पंजाब आणि पंजाबमधील भूतविंड, मर्डी, भट्टीवाल असा प्रवास करत शेवटी घुमानमध्ये पोहोचले. त्यानंतर ते जवळपास वीस वर्षं इथंचघुमानमध्ये राहिले. बोहरदास यांच्यानंतर त्यांना जल्ला, लद्धा, कंसो असे अनेक शिष्य मिळाले. मुळात घुमान नावाचं कोणतंही गाव आधी नव्हतं. इथं सगळं जंगलच होतं. पण नामदेव महाराज इथे आल्यानंतर लोकं येऊ लागली आणि हे गाव वसलं, असं स्थानिक सांगतात. (Sant Namdev)

लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. आपल्या प्रवचनांमधून आणि किर्तनांमधून त्यांनी गावागावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसने याविषयी लोकांचं प्रबोधन केलं. या गावाला घुमान असं नाव पडण्यामागेही एक कथा सांगितली जाते. नामदेव महाराज घुमत घुमत म्हणजे देशभर फिरत इथे आले आणि स्थिरावले म्हणून ‘घुमान’ असं नाव याला पडलं असं म्हणतात. याशिवाय येथील अनेक शिखांचं आडनावदेखील घुमान आहे. आजही येथील स्थानिक शीख बांधव नामदेव महाराजांना ‘भगत नामदेव’ म्हणजेच भक्त नामदेव, बाबा नामदेव किंवा बाबाजी असं म्हणतात.

इथे अजून एक आश्चर्याची गोष्ट आहे, ती म्हणजे आपण नामदेव महाराजांना संताचा वेश परिधान केलेले, हातात वीणा आणि चिपळी असलेले असं पाहतो. पण पंजाबमध्ये त्यांचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळं आहे. घुमान गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात आजही बाबा नामदेवांची प्रतिमा ही एक दाढीवाल्या बाबांचा फोटो, डोक्यारील केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ अश्या स्वरुपातील आढळते. संपूर्ण पंजाबमध्ये तुम्हाला नामदेव महाराज याच रुपात पाहायला मिळतात. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे याच घुमान गावात संत नामदेव महाराज यांची समाधी असून आणि त्यांच्याच नावाचा एक गुरुद्वारा आहे. (Sant Namdev)

स्थानिक सांगतात की, संत नामदेव महाराजांनी याच घुमान गावात अखेरचा श्वास घेतला. पण महाराष्ट्रात मात्र पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवांची समाधी असल्याचा विश्वास आहे. आयुष्याच्या अखेरची वीस वर्षं नामदेव महाराज पंजाबमध्येच होते. तिथून फक्त समाधी घेण्यासाठी ते पंढरपूरला आले, मात्र यावर त्यांच्या पंजाबी भक्तांचा विश्वास नाही. ते म्हणतात, इथेच घुमानमध्येच त्यांचं महानिर्वाण झालं. पण संशोधक रा. चि. ढेरे यांच्या माहितीनुसार, नामदेव महाराज पंजाबमधील आपलं कार्य संपवून महाराष्ट्रात आले आणि पंढरपूरात त्यांनी समाधी घेतली. ज्या भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले, त्या भागवतधर्माचे केंद्र असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचं अखेरीस दर्शन व्हावे, आपल्या आईची सेवा व्हावी ही नामदेवांची आस होती, असं ढेरे यांनी सांगितलं आहे. (Sant Namdev)

==================

हे देखील वाचा : नागपूरच्या देविदास सौदागरांची यशोगाथा

================

याचा एक पुरावा आपल्याला त्यांच्या अभंगामध्ये मिळतो, ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती’ असं ते म्हणतात. याचा अर्थ पंजाबला निरोप देऊन ते पंढरपूरला आले आणि इथे पायरीवर समाधीस्त झाले. पण तरीही शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच नामदेव महाराजांनाही मानाचं स्थान मिळालं आहे. शिखांसाठी प्रातःस्मरणीय असणाऱ्या १५ भगवतांमध्ये नामदेव महाराजांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखलं जातं. इतकी वर्ष लोटली, पण आजही पंजाबी मनात त्यांचं स्थान फार मोठं आहे. महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही संत नामदेव महाराजांची मंदिरं आहेत. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपल्या संत नामदेव महाराजांच्या या महान कार्याची जाण असावी एवढच !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.