Home » ऑपरेशन मॅन म्हणून ओळखले जाणारे ‘रवी सिन्हा’

ऑपरेशन मॅन म्हणून ओळखले जाणारे ‘रवी सिन्हा’

by Team Gajawaja
0 comment
Ravi Sinha
Share

ऑपरेशन मॅन म्हणून ओळख असणारे, कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची भारताच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे म्हणजेच रॉ चे प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत. बिहारचे रवी सिन्हा हे भारतीय पोलीस दलातील अतिशय वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या भारतीय आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख सामंत कुमार गोयल हे आहेत. गोयल यांचा कार्यकाल 30 जून रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर रॉ च्या प्रमुखपदी रवी सिन्हा विराजमान होतील.   

भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची भारताच्या गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉ चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिन्हा, 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा, छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत. सध्या सिन्हा कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. रॉ चे सध्याचे प्रमुख सामंत कुमार गोयल हे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सामंत गोयल यांच्या रॉ प्रमुखपदाच्या कार्यकाळात अनेक प्रमुख कामगिरी भारताच्या नावावर नोंदवली गेली आहे. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले. बालाकोट येथील हल्ल्याला भारतानं प्रत्युत्तर दिले. आता त्यांच्या जागी रवी सिन्हा हे नियुक्त होत आहेत. रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची ओळख ही ऑपरेशन मॅन अशी आहे. रवी सिन्हा हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

सिन्हा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. 1988 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश केडर प्राप्त केले. 2000 मध्ये,  तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल भाग वेगळा करुन छत्तीसगड राज्याची निर्मिती केली. त्यावेळी सिन्हा यांचा समावेश तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड केडरमध्ये करण्यात आला. रवी सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात प्रधान कर्मचारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रवी सिन्हा (Ravi Sinha) हे त्यांच्या ऑपरेशनल आणि डिटेक्टिव्ह कौशल्यासाठी ओळखले जातात.

भारतीय आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थेची स्थापना सप्टेंबर 1968 मध्ये करण्यात आली. 1962 च्या भारत-चीन युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर भारताला गुप्तचर संस्थेची गरज भासू लागली होती. त्यानुसार तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली रॉ ची स्थापना करण्यात आली.  रॉ चे प्रमुख काम माहिती गोळा करणे, दहशतवाद थांबवणे आणि गुप्त कारवाया करणे हे आहे. रॉ चे मुख्यालय  नवी दिल्ली येथे आहे. रॉ ची सुरुवात ही 20 दशलक्ष च्या वार्षिक बजेटवर झाली. त्यावेळी फक्त 250 रॉ एजंट कार्यरत होते. या संघटनेच्या स्थापनेला विरोधही झाला. मात्र रॉ ची गरज दिवसेंदिवस जाणवू लागली. देशाबाहेर शत्रू आणि देशातील शत्रूंच्या गुप्त हालचाली टिपण्यासाठी रॉ चा उपयोग होऊ लागल्यावर त्याची व्यापकता वाढली. 1990 पर्यंत रॉ चे स्वरुप एकदम बदलले. रॉ हा भारतीय लष्कराला मदत करणारा प्रमुख घटक झाला. 2004 मध्ये, भारत सरकारने नॅशनल टेक्निकल फॅसिलिटीज ऑर्गनायझेशनची स्थापना केली. ही संघटना रॉ ची सहकारी असल्याचे मानले जाते.   

========

हे देखील वाचा : पंकज त्रिपाठी यांनी मनोज बाजपेयींचे चप्पल ठेवून घेतले..

========

बदलत्या काळानुसार रॉ चेही स्वरुप बदलत गेले आहे.आता त्यात तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेल्या अनेक साधनसामुग्रीचा वापर करण्यात येतो. मुळात रॉ मध्ये एजंट होण्यासाठी कठोर प्रशिक्षणातून पार जावे लागते. यात मुख्यतः निवृत्त लष्करी अधिकारी किंवा पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असतो. काळानुसार बदलत चाललेल्या या संस्थेत तंत्रज्ञानासंबंधी अनेक जाणकारांचा समावेश करुन घेण्यात आला आहे. भारताच्या शेजारी देशांच्या बेकायदेशीर कारवायांवर प्रामुख्याने रॉ कडून लक्ष ठेवले जाते. दहशतवादाचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करण्यात ही एजन्सी महत्त्वाची भूमिका बजावते.  

रॉ मधील या माहितीच्या आधारानं भारतानं अनेकवेळा आपल्या शत्रूराष्ट्रांवर मात केली आहे. कारगिल युद्धातही रॉ ची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आता याच रॉ च्या प्रमुखपदी रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन मॅन ही त्यांची ओळख आहे. भविष्यात शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध हे रॉच्या आणि रवी सिन्हा यांच्या पुढच मोठे आव्हान असणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.