नुकताच राष्ट्र सेवा दलाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. स्थापनादिवशीच संघटनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. काय होती कारणे?
लेखन – श्रीकांत ना. कुलकर्णी
राष्ट्र सेवा दलाचे एकेकाळी खूप नाव होते. प्रामुख्याने समाजवादी विचारांच्या तरुणांची संघटना म्हणून तिचा बोलबाला होता. कारण समाजवादी नेत्यांनीच पुढाकार घेऊन राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली होती. आणि हे सर्व समाजवादी नेते महाराष्ट्रातील असल्याने प्रामुख्याने महाराष्ट्रातच तरुणांची एक प्रभावी संघटना म्हणून राष्ट्र सेवा दल उदयास आले. वास्तविक ब्रिटिश राजवटीविरुध्द काँग्रेसने सुरू केलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काँग्रेसमधील काही तरुण नेत्यांना तरुण मुलामुलींसाठी जाती-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे धडे देण्यासाठी युवक संघटनेची गरज भासू लागली. या विचारातूनच ना. सु. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली १९२३ साली ‘हिंदुस्थान सेवा दल’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.
मात्र नंतर ब्रिटिशांनी ही संघटना बेकायदा ठरविल्याने कालांतराने तिचे अस्तित्व संपुष्टात आले. पुढील काळात स्वातंत्र्य चळवळीला आणखी जोर चढला आणि काही सांप्रदायिक संघटनाही त्यामध्ये सामील झाल्या. त्याला विरोध करण्यासाठी शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे., एस. एम. जोशी., साने गुरुजी आदी तत्कालीन समाजवादी विचारांच्या नेत्यांनी ४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे एक खास शिबीर घेऊन त्यामध्ये राष्ट्र सेवा दलाची (Rashtra Seva Dal Pune) पुनर्स्थापना केली.
जनमानसात समाजवादी विचार रुजविण्यासाठी स्थापन केलेली युवकांची एक संघटना म्हणून सुरुवातीला तिला चांगला प्रतिसाद मिळत गेला. शिवाय रा. स्व. संघाच्या शाखा आणि रा. स्व. संघानेच स्थापन केलेल्या अ. भा. विद्यार्थी परिषदेसारख्या युवक संघटनेला एक सक्षम पर्याय म्हणून तरुण वर्गात तिचा प्रसार करण्यात येऊ लागला. रोज सायंकाळी भरणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत वैचारिक, बौद्धिकतेबरोबरच शारीरिक खेळ, कवायतींचेही धडे देण्यात येऊ लागले. त्यामुळे समाजवादी विचाराचे असंख्य युवक या संघटनेत सामील होऊ लागले आणि संघटनेला राज्यात चांगली बळकटी आली. (आजही मुंबई, पुणे नाशिक आदी शहरांत राष्ट्र सेवा दलाच्या शाखा सक्रिय आहेत) याशिवाय राष्ट्र सेवा दलाने (Rashtra Seva Dal Pune) कलापथकाचीही निर्मिती केली.
शाहीर अमर शेख, शाहीर लीलाधर हेगडे, कविवर्य वसंत बापट, निळू फुले, दादा कोंडके यांनी सुरुवातीच्या काळात या कलापथकांद्वारे सामाजिक व राजकीय जागृती मोठ्या प्रमाणावर केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या कलापथनाने भरीव कामगिरी केली. मात्र बदलत्या काळानुसार या कलापथकाला साहजिकच नंतर उतरती कळा लागली. तसेच समाजवादी चळवळीला लागलेल्या फुटीच्या ग्रहणाचा फटका राष्ट्र सेवा दलालाही बसला. त्यामुळे एक काळ असा आला की ‘राष्ट्र सेवा दल’ म्हणजे फक्त तरुण-तरुणींचे प्रेम करण्याचे एकमेव ठिकाण आहे असे गंमतीने म्हटले जाऊ लागले.
राष्ट्र सेवा दलात काम करण्यासाठी एकत्र आलेल्या अनेक समाजवादी कार्यकर्त्यांचे प्रेमविवाह हा त्याकाळी चर्चेचा विषय झाला होता. (नंतर मात्र बदलत्या काळानुसार बस स्टॉप, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणीही तरुण-तरुणींचे ‘प्रेम’ जमू लागले त्यामुळे साहजिकच राष्ट्र सेवा दलाला उतरती कळा लागली आणि या संघटनेविषयीचे तरुणांमधील औत्स्युक संपत गेले असावे)
राष्ट्र सेवा दल या संघटनेविषयी एवढा उहापोह करण्याचे मुख्य कारण म्हणजे अलीकडेच म्हणजे चार जूनला पुण्यात राष्ट्र सेवा दलाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. मात्र या स्थापनादिवशीच संघटनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. राष्ट्र सेवादलाचे विद्यमान अध्यक्ष गणेश देवी आणि उपाध्यक्ष कपिल पाटील यांच्याविरोधात संघटनेतीलच मिहीर थत्ते आणि त्यांच्या समर्थकांनी उपोषण केले आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्याचा प्रयत्न केला. अन्यायाचे कारण काय तर काही कार्यकर्त्यांचे संघ आणि भाजपशी असलेले संबंध आणि त्याला पदाधिकाऱ्यांनी घेतलेली हरकत. त्यामुळे हा स्थापना दिन चांगलाच गाजला.
मिहीर थत्ते हे ज्येष्ठ समाजवादी यदुनाथ थत्ते यांचे चिरंजीव आहेत. एकेकाळी यदुनाथ थत्ते यांनी मोठ्या निष्ठेने राष्ट्र सेवा दलाचे कार्य केले होते. परंतु मिहीर थत्ते हे स्वतःचे महत्व वाढविणारे एक स्वयंभू कार्यकर्ते असल्यामुळे ‘एक उपदव्यापी माणूस’ म्हणूनच त्यांची सध्या ख्याती आहे. अशा माणसाला गणेश देवी यांच्यासारखे साधे, सोज्ज्वळ व्यक्तिमत्व कसे मानविणार? त्यातच गणेश देवी हे पडले मोदी – पर्यायाने भाजपाविरोधक त्यामुळे राष्ट्र सेवादलात सुंदोपसुंदी सुरू झाली नसल्यास नवलच.
वास्तविक पाहता गणेश देवी यांचा यापूर्वी कधी राष्ट्र सेवा दलाच्या कार्याशी प्रत्यक्ष काही संबंध आल्याचे ऐकिवात नाही. केवळ समाजवादी विचारसरणीचे म्हणूनच त्यांना अध्यक्ष केले असावे. एक विद्वान, बोलीभाषेचा अभ्यासक आणि आदिवासी परंपरेचा अभिमान असणारा आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणारा एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता अशीच गणेश देवी यांची ओळख आहे. मोदी-विरोधकांच्या ‘दक्षिणायन’ चळवळीला प्रोत्साहन देता देता त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे उत्तरदायित्व घेण्याचे ‘उत्तरायण’ का आणि कधी केले हे अनेकांना कळलेच नाही.
कदाचित पंतप्रधान मोदी आणि पर्यायाने भाजपाला विरोध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनेसारखे एक मोठे व्यासपीठ पाठीशी असावे म्हणून त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्षपद स्वीकारले असावे असे वाटते. कदाचित हीच बाब राष्ट्र सेवा दलातील संघ आणि भाजपाला अनुकूल असणाऱ्या कार्यकर्त्यांना खटकली असावी. त्यामुळेच त्यांच्या विरोधात स्थापना दिवशीच उपोषणाचे अस्त्र वापरण्यात आले असावे. याबाबत अध्यक्ष गणेश देवी यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही मात्र हा अंतर्गत विरोध वाढतच गेला तर राष्ट्र सेवा दलात आणखी दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच मरणपंथाला लागलेल्या राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनेचे पुढे काय होणार? याचीच चिंता अनेकांना वाटत असेल हे मात्र निश्चित.
- श्रीकांत ना. कुलकर्णी, पुणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)