Home » देशाचे राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एकाचवेळी हल्ला झाला होता.

देशाचे राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एकाचवेळी हल्ला झाला होता.

by Correspondent
0 comment
Giani Zail Singh | K Facts
Share

३१ ऑक्टोबर १९८४, इंदिरा गांधींवर त्यांच्या सुरक्षारक्षकानेच गोळ्या झाडल्या होत्या. त्या घटनेच्या २ वर्षांनंतर तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग आणि पंतप्रधान राजीव गांधींवर हल्ला करण्यात आला होता त्यावेळचा हा प्रसंग.

२ ऑक्टोबर १९८६चा तो दिवस… महात्मा गांधी यांची ११७वी जयंती साजरी केली जात होती. परंपरेनुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली देण्यासाठी समाधीवर पोहोचले. त्यांच्यासमवेत पत्नी सोनिया गांधी देखील होत्या. दोघांनीही राजघाट परिसरात प्रवेश केला. सोबत सुरक्षारक्षक तसेच गुप्तचर यंत्रणेचे काही अधिकारीही होते. साधारण सकाळी ६.५५ ची वेळ. अचानक जोराचा आवाज झाला. काहींना वाटलं गोळीबार आहे तर काहींनी स्कुटर किंवा एखाद्या वाहनाच्या इंजिन/टायरचा आवाज असण्याची शक्यता वर्तवली. काही असले तरी सभोवतालचे सुरक्षारक्षक जवान मात्र सतर्क झाले होते. राजीव गांधी समाधीस्थळाकडे प्रस्थान करत असतांनाच राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग (Giani Zail Singh) राजघाट परिसरात दाखल झाले. एकीकडे प्रार्थनासभा सुरु असतानाच सुरक्षा यंत्रणेकडून तपासकार्याला सुरवात केली गेली.

giani zail singh and rajiv gandhi
Giani zail singh and rajiv gandhi

महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त त्यांचे समाधीस्थळ फुलांनी सुशोभित केलेले आपण नेहमी पाहतो. या सजावटीबरोबरच जास्त काळजी घेतली जाते ती तेथे येणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला कोणताही धक्का लागू नये यासाठी यंत्रणा तैनात असते. सजावटीच्या फुलांखालची जमीन तसेच आजूबाजूचा परिसर ओलसर ठेवला जातो. जेणेकरून जमिनीखाली जर स्फोटके लपवली गेली असली तर चिखलयुक्त मातीत त्यांची तीव्रता काही प्रमाणात कमी व्हावी यासाठी अशा विविध उपाययोजना केल्या जातात. राजघाटावरही त्यादिवशी तसेच केले गेले होते. त्यामुळे जमिनीखाली शस्त्रास्त्रे आहेत का हे तपासण्यासाठी श्वानपथक सक्रिय करण्यात आले, आजूबाजूच्या इमारतींमधून तर गोळीबाराचा प्रयत्न झाला नाही ना? हे पाहण्यासाठी इमारतींची झडती घेण्यात आली. प्रार्थनासभा सुरु असतांनाच हा तपासही सुरु होता.

याचदरम्यान पुन्हा एकदा गोळीबार झाला. यावेळी मात्र गोळी पंतप्रधानांच्या अगदी मागे असलेल्या फुलांमध्ये जाऊन पडली होती. जमीन ओलसर असल्यामुळे ती गोळी जमिनीत रुतली गेली. पुढील सूत्रे वेगाने हलली आणि पंतप्रधान व राष्ट्र्पतींभोवती सुरक्षेचं कडं बनवण्यात आलं. उंचावर उभे असलेल्या सुरक्षारक्षकांना अधिक अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेले. सुरक्षायंत्रणा तसेच इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान दिल्ली पोलीस उपायुक्त (सुरक्षा) श्री. गौतम कौल आणि विशेष सुरक्षा दलाचे (SPG) एम आर रेड्डी यांच्यामध्ये पुढील दिशा काय असेल यावर चर्चा सुरु झाली.

Rajiv Gandhi Gyani Zail Singh
Rajiv Gandhi Gyani Zail Singh

अतिशय महत्वाच्या अशा या व्यक्तींची दिल्लीत कशी व कुठे व्यवस्था करावी हे ठरविण्यात येत होते. कोणत्या तरी वेगळ्या मार्गावरून व्हीआयपींना नेण्यात यावं असं रेड्डी यांचं मत होतं. तर गौतम कौल यांच्या मतानुसार इतक्या कमी वेळात नवीन मार्गावर सुरक्षा व्यवस्था तैनात करणे शक्य नसल्याने सुनिश्चित मार्गाचाच अवलंब करावा हा आग्रह होत होता. राजघाटावरुन लवकरात लवकर निघणे जास्त गरजेचे आहे हे लक्षात घेऊन सरतेशेवटी, ज्या मार्गावरून आले होते तोच व्हीआयपींच्या परतीचा मार्ग असेल हे ठरविण्यात आले व त्याप्रमाणे तयारी केली गेली.   

साधारण ८ वाजेच्या दरम्यान प्रार्थनासभा संपली. सगळे मान्यवर आपआपल्या वाहनांकडे रवाना होत होते. ज्ञानी जैल सिंग आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) दोघेही सोबत चालत असतांना, सिंग यांनी राजीवजींना विचारले, “ये हमला कौन कर रहा है?” त्यावर राजीव गांधी यांनीही उत्तर देतांना वातावरणातील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणाले “जब मैं आया, तब भी मेरा ऐसे ही स्वागत हुआ. मुझे लगता है, अब शायद विदाई दी जा रही है.” 

इतक्यातच पुन्हा एकदा गोळीबार झाला. मागचे दोन्ही वार वाया गेले असले तरी यावेळी मात्र गोळीने निशाणा साधला होता. दोनजणांना यावेळी गोळी लागली होती, ते दोघेजण म्हणजे काँग्रेसचे तत्कालीन आमदार ब्रिजेंद्रसिंग मवाई आणि राजस्थानचे माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राम चरण लाल. राजीव गांधींच्या अगदी मागे हे दोघे चालत असल्याने त्या दोघांना गोळ्या लागल्या होत्या. आता मात्र राजीव गांधी जास्त सतर्क झाले. त्यांनी स्वतः वेगाने हालचाली करत ज्ञानी जैल सिंग यांना एका बुलेटप्रूफ मर्सिडीजमध्ये बसवले आणि ते सोनिया गांधींसोबत दुसऱ्या कारमध्ये सुरक्षितरित्या बसले.

सर्व सुरक्षा यंत्रणा, एसपीजी, दिल्ली पोलिस, एनएसजी, उपस्थित अधिकारी सर्वांचेच धाबे दणाणले होते. गोळीबार नेमका कुठून होत आहे? कोण करत आहे? काहीच तपास लागला नव्हता. त्याचवेळेस तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग हेदेखील महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते. इतक्यात काही सुरक्षारक्षकांची नजर १० फूट उंचीवरील एका छताकडे गेली. तिथून धूर येतांना दिसल्याने सुरक्षारक्षकांनी तिकडे लागलीच धाव घेतली. समाधीस्थळापासून २५-३० फुट अंतरावर असलेल्या त्या छतावर एक २४-२५ वर्षांचा युवक देशी कट्ट्यांसह दबा धरून बसला होता. सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर बंदुका ताणल्या, गृहमंत्री बूटा सिंग यांनी देखील फर्मान सोडले “गोली मार दो उसे”. तेवढ्यात गौतम कौल ओरडले “नहीं… गोली मत मारो.” तो तरुण देखील दोन्ही हात उंचावत ओरडू लागला “मैं सरेंडर करता हूं.”

शरण आलेल्या त्या तरुणाला पकडण्यात आले. तपासणीअंती त्याच्याकडे देशी कट्ट्यांसोबतच काही खाद्यपदार्थ सापडले. त्यांनतर त्याची चौकशी सुरु केली गेली. त्यांनतर जी माहिती समोर आली, ती अशी… करमजीत सिंग त्याचे नाव. दोन वर्षांपूर्वी इंदिरा गांधींची (Indira Gandhi) हत्या झाली त्यावेळेस तो अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होता. यमुनापार या भागात झालेल्या हल्ल्यात त्याच्या शीख मित्राला हल्लेखोरांनी ठार केलं होतं. त्याचा स्वतःचा जीव कसाबसा वाचला असल्याचे त्याने सांगितले. आणि याच घटनेनंतर आपण संपूर्ण गांधी परिवाराचा द्वेष करू लागल्याचे त्याने सांगितले. सुरक्षा यंत्रणेला मात्र या माहितीवर, त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. 

दुसरीकडे, राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांना सुरक्षितरित्या ७, रेसकोर्स रोड येथील पंतप्रधान निवासस्थानी पोहचविण्यात आले. लागलीच त्यांनी सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली. तब्ब्ल तीन तास चाललेल्या या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर, दिल्ली पोलीस उपायुक्त (सुरक्षा) श्री. गौतम कौल यांना त्वरित निलंबित करण्यात आले. आणि सदर प्रकरणाचा तपास इंटेलिजन्स ब्युरोकडे सोपविण्यात आला.

राजघाटावरील या घटनेला २४ तास पूर्ण होत असतांनाच, ३ ऑक्टोबर १९८६ रोजी अजून एक घटना घडली. एकीकडे करमजीत सिंग याची चौकशी चालू होतीच. त्याचवेळेस पंजाबमधील जालंधर येथे DGP जूलियो रिबेरो आणि त्यांची पत्नी मेल्बा रिबेरो यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. घटना घडली तेव्हा रिबेरो हे जालंधरमधील शेरशाह सूरी मार्गावरील सशस्त्र पोलीस दलाच्या मुख्यालयात होते. एका व्हॅनमधून आलेल्या या हल्लेखोरांनी पोलिसांचाच गणवेश परिधान केला होता, काही कळायच्या आतच त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. ज्याला प्रत्युत्तर म्हणून रिबेरोंसोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनी प्रतिहल्ला केला. या चकमकीत CRPF चे जवान कुलदीप राज हे मृत्यमुखी पडले. रिबेरो आणि त्यांच्या पत्नी बचावल्या गेल्या

.

या घटनेनंतर राजघाट प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली गेली. घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का हे तपासण्यात आले. करमजितसिंग यांची चौकशी प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आली. परंतु तरीही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना दोन्ही घटनांमध्ये कोणताही समान दुवा सापडला नाही. ८ वर्षांनंतर म्हणजेच १९९४ साली, करमजितसिंग यांना राजघाट गोळीबार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले व शिक्षा सुनावली गेली. मात्र सन २००० मध्ये चांगल्या  वर्तणुकीमुळे त्यांची सुटका झाली.

२००९ साली करमजीत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पटियाला मतदारसंघातून, कॉंग्रेसच्या उमेदवार आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांच्याविरोधात लोकसभा निवडणूकदेखील लढवली होती. मात्र केवळ ४५९१ मते मिळाल्याने त्यांचे डिपॉजिट जप्त करण्यात आले. 

शब्दांकन- धनश्री गंधे   

—–

हे देखील वाचा: राजीव गांधी ….. पायलट ते पंतप्रधान


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.