८ मे, १९६१, रोजी शिवाजी पार्क, दादर येथे संपन्न झालेल्या टागोर जन्म शताब्दी महोत्सवात, माननीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेला हा किस्सा आहे. ही कथा त्यांनी जेलमध्ये असताना ऐकली होती शांतिनिकेतन (Shantiniketan) मध्ये राहिलेल्या एका गृहस्थांनी स्वतः त्यांना हा किस्सा सांगितला होता.
एके दिवशी संध्याकाळी रवींद्रनाथांनी (Rabindranath Tagore) शांतिनिकेतन मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर बोलावले आणि त्यांची परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर भारताचा नकाशा ठेवला आणि ते म्हणाले “तुमच्यातलं कवीमन जागं करा आणि या नकाशाकडे पाहिल्यावर तुम्हाला काय कल्पना सुचतेय ते सांगा.” उदाहरणादाखल ते पुढे म्हणाले की, “अशी कल्पना करा, भारत म्हणजे कोणी पुराणपुरुष आहे आणि तो काखेइतक्या पाण्यात उतरला आहे. आता तुम्ही सांगा, की हा महापुरुष काय करत असेल?”
थोड्यावेळाने एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, “गुरुदेव, मला वाटतंय हा कोणीतरी धर्मनिष्ठ पुरुष आहे, पुराण कालापासून या समुद्रात उतरला आहे आणि तेव्हापासून सूर्याला आणि चंद्राला सतत अर्घ्य देतोय.” पुढे दुसरा विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने सांगितले, “हा महापुरुष समुद्रामध्ये उतरलाय हे खरं आहे पण आपल्या दैन्याला, गरिबीला, कष्टाला कंटाळून, समुद्रामध्ये आत्महत्या करण्यासाठी तो उतरला आहे असं मला वाटतंय” आणखी कोणाला काही कल्पना सुचतेय का?
असे विचारल्यानंतर तिसरा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुदेव, मला नाही वाटत या दोन्ही कल्पना बरोबर आहेत. हा महापुरुष प्रार्थनेकरिता अथवा आत्महत्या करता उतरला नाही. हा आहे पुराणपुरुष तो नुसत्याच सागरामध्ये उतरलेला नाही. या समुद्राला रत्नाकर ही म्हटलं जातं म्हणजेच हा पुराणपुरुष महासागराच्या तळाशी असलेली माणके मोती रत्न हिरे दुनियेला देण्याकरिता उतरलेला आहे.”
हा किस्सा सांगून, पुढे आपल्या भाषणात मा. यशवंतराव चव्हाण म्हणाले की ही कल्पनाच अत्यंत भव्य आणि खरी होती. भारत हा असा पुराणपुरुष आहे जो व्यास- वाल्मिकींपासून, रवींद्र-गांधी-जवाहरलालांपर्यंत दुनियेला आणि मानवतेला रत्ने पुरविण्याचे काम करत आहे.
शब्दांकन- धनश्री गंधे
=====
हे नक्की वाचा: रवीन्द्रनाथांच्या शांतिनिकेतनमधील जुन्या घराचा भाग, समोरील चाफा
=====