साठचे ते स्वर्णांकित दशक ज्या ज्या गोष्टीसाठी कायम आठवले जाते त्यात ज्याच्या एन्ट्रीला टाळया पडत ज्याच्या डॉयलॉगबाजीवर पिटातले प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत त्या स्व राजकुमारला वगळणे हा अक्षम्य गुन्हा ठरेल. ब्लॅक ॲण्ड व्हाईट जमान्यात संवादफेकीसाठी ज्या निवडक मोजक्या कलाकारांची नावे तेंव्हा आवर्जून घेतली जात त्यात स्व. सोहराब मोदी नंतर त्याचेच नाव यायचे.
संवादातील अर्थपूर्ण ‘पॉझ’ हे राजकुमारचे जितके वैशिष्ठ मानले जाई त्यापेक्षा मफलर गुंडाळलेल्या आपल्या गळ्याभोवती हाताची बोटे फिरवित तो जो डॉयलॉग त्याच्या खर्जातील खरखरीत आवाजात टाकत असे त्याला प्रेक्षकांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व होते. तसा तो कायम सहकलाकार म्हणूनच नावाजला गेला. पण तरीही आपल्या अफलातून संवादफेकीने तो समोरच्या दिग्गजच्या तोंडचे पाणी पळून त्याला दिगमूढ करत असे. ३ जुलै ही त्याची पुण्यतिथी.
त्याच्या आपल्यातील जाण्याला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होतील. त्याच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी निमित्ताने परत एकदा त्या संवादफेकीतल्या साठच्या दशकातील बेताज बादशहाला त्रिवार कुर्निसात..
स्व. किशोरकुमार, राजकुमार यांच्याबरोबरीने सध्या काही मंडळी नाना पाटेकरांचाही विक्षिप्त अवलियात समावेश करतात.या तिघांमध्ये तसं कोणत्याच दृष्टीने साम्य नाही. रोखठोकपणा हा नानांचा स्वभाव तर मूडी, खोडकर, व्रात्य व विक्षिप्तपणा हे किशोरदांचे वैशिष्ठय पण राजकुमार या कोणत्या पठडीत बसतो तर त्याचे असंख्य चाहते त्याच्याच बुलंदी मधील सुप्रसिध्द डॉयलॉग ऐकवून त्याची महती ऐकवतील.
हम जमानेसे नही जमाना हमसे है.. हमे झुका सके ये जमानेमे दम नही.. हा बुलंदी मधील स्व. राजकुमारचा डॉयलॉग अनेकांना स्मरत असेल. अन विचार केला तर राजकुमारच्या व्यक्तिमत्वाचा तोच लसावि (आजच्या भाषेत यूएसपी) ठरावा. अखेरपर्यन्त हा डॉयलॉगमास्टर कुणापुढेही झुकला नाही. संवादफेक हा त्याचा बालेकिल्ला होता. थोडीथोडकी नव्हे तब्बल तीन दशके या संवादफेकीतील बेताज बादशहाने रसिकांवर अधिराज्य गाजवले.
राजकुमारचे (Raaj Kumar) चित्रपट गाजायचे तेच मुळी त्याच्या अफलातून संवादफेकीमुळे. आज त्याचे कित्येक चित्रपटातील संवाद सुभाषितसारखे अजरामर झाले आहेत. अनेक नकलाकारांचा कार्यक्रम राजकुमारच्या संवादफेकीची नक्कल पेश केलयाशिवाय संपत नाही हेच त्याच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
खर तर राजकुमार, सुनील दत्त, राजेंद्रकुमार या त्रिमूर्तीचा प्रवेश जवळपास एकाच वेळी झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अन या तिघांची कारकिर्द बहरतही एकाच वेळी गेली. या तिघांना एकत्र चमक ते स्व. महबूबखान यांनी त्यांच्या माईलस्टोल मदर इंडिया चित्रपटात या चित्रपटात स्व. नर्गिसचा रोल हा सगळयात वरचढ होता तरीही याच चित्रपटामुळे राजकुमार, राजेंद्रकुमार अन सुनीलदत्त यांना ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो पर्यन्त हे तिघेही आल्सो रन कॅटेगेरीतील चित्रपटात भूमिका करत असल्याने त्यांची दखलही नायक म्हणून घेतली जात नव्हती.
तो जमाना ब्लॅकव्हाईट चा होता. त्यामुळे जवळपास पदापर्णातच तिघांनाही मदर इंडिया सारखा रंगीत व क्लासिक चित्रपट मिळाला. आज मदर इंडिया तील नाटयाला आजची पिढी मेलो मेलो ड्रामा म्हणून कितीही नाके मुरडत असली तरी ती तेंव्हाच्या प्रेक्षकांची भूक होती. असो. विषयांतर टाळून परत एकदा डॉयलॉगमास्टर राजकुमारच्या कारकिर्दीचा विचार केला तर राजकुमार काही रातोरात पहिल्याच चित्रपटापासून डॉयलॉगमास्टर म्हणून उदयाला आला नाही. तो किताब मिळण्यापूर्वी त्याने कित्येक नगण्य चित्रपटात नगण्य नायकाचे रोल केले ज्यात त्याच्या नायिका मालासिन्हा, कुमकुम पासून….. होत्या.
नौशेरवाले आदिल हा राजकुमार व मालासिन्हाचा जवळपास पहिलाच चित्रपट होता. जो केवळ संगीतकार स्व. सी रामचंद्र यांच्या सदाबहार सुमधुर, अजरामर संगीतामुळे गाजला. आजची पिढी स्व. राजकुमारला ओळखते ते त्याच्या विक्षिप्त, कडवट, त-हेवाईक हेकट स्वभावामुळे त्याच्या या स्वभाववैशिष्ठयाचे वर्णन करणारे अनेक खरेखोटे किस्से दंतकथा मिमिक्रीवाले स्टेजवरुन ऐकवत असतात.
विक्षिप्तपणा, त-हेवाईकपणा वा सर्कीटगिरीचे किस्से सांगण्याची चढाओढ एखाद्या मैफीलीत लागली की त्यात संगीतकार स्व. सज्जादहुसेन, नाना पाटेकर, किशोरकुमार यांच्यासमवेत राजकुमारचेही खरेखोटेकिस्से ऐकवले जातात. यातील गंमतीचा भाग सोडला तर या विक्षिप्तपणालाही काही लॉजिक आहे. जे अशा कलाकारांच्या सुरवातीच्या हालअपेष्टा, अवमान, कुचेष्टा वा अन्यायात दडलेले असते. राजकुमारलाही सुरवातीच्या काळात अशा विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला.
पोलीस खात्यात पोलीस अधिकारी म्हणून सुरवातीस काम करताना एका अपघातप्रकरणात त्याला नाहक गोवून तुरुंगवास घडला असे सांगण्यात येते. खरे खोटे कधीच करता आले नाही. कारण त्याचे अखेरपर्यन्त मिडियाशी विळयाभोपळ्याएवढे सख्य होते. शिवाय त्याने आपले खासगी आयुष्य आपले कुटुंब व सिनेकारकिर्दीत एक अलिखित अदृश्य अशी सिमारेखा आखली होती जी तो कुणालाच ओलांडू देत नसे. तो स्वतः प्रसंगनिमित्ताने अनेक फिल्मी पाटर्यात सहभागी होत असला तरी त्याचे कुटुंबिय, पत्नी, मुले कधीच सार्वजनिक जीवनात दिसली नाहीत.
किंबहुना राजकुमारचे लग्न झालेले असून त्याला मुलबाळे आहेत ही गोष्टही कित्येक वर्षे अनेकांना ठाऊक नव्हती. एवढी गुप्तता दिलीप कुमार, एव्हरग्रीन देव आनंदनेही कधी बाळगली नव्हती. त्याने पार्टीत एखाद्या कलाकाराचा केलेला पाणउतारा, सिनेतारकेवर केलेली तिरकस शेरेबाजी व निर्माता दिग्दर्शकांना ओळख न देणे हे सर्वच सिनेनियतकालिंकाच्या दृष्टीने गॉसिपिंग मसाला होता. जो तो अधून मधून पुरवत असे.
राजकुमार हा त्याच्या टिपीकल वेषभूषेबाबतही प्रसिध्द होता. चित्रपट कोणताही असो कपाळावर रुळणा-या जुल्फांचा केसांचा टोप, गळ्यात बेफिकीरपणे टाकलेला मफलर, पायात पांढरे बूट, हरवलेली शून्यात रोखलेली नजर अन ठराविक पॉज घेत समोरच्याला तुच्छ लेखित केलेली नाटकी संवादफेक म्हणजे राजकुमार हे समीकरण त्यावेळच्या त्याच्या चाहत्यांच्या मनात दृढ झाले होते.
त्यामुळे असं काही नसलं की ते चित्रपटच अपयशी ठरत. सिनेमात रुपेरी पडद्यावर होणारी राजकुमारची एन्ट्री हा एक त्याच्या चाहत्यांच्या दृष्टीने जाम उत्सुकतेचा चर्चेचा विषय असे. मग तो सिनेमा काजल असे, हमराज असेल वा बुलंदी राजकुमारची एन्ट्री ही टाळी घेणारीच असे. अन त्याबरोबर त्याची डॉयलॉगबाजी.
सोहराब मोदी दिग्दर्शित ‘नौशेरवाले आदिल’ या चित्रपटात काम करतानाच राजकुमारला सोहराब मोदी यांच्याकडून परिणामकारक नाटकीय संवादफेकीचे जणू बाळकडूच मिळाले. रंगिला, घमंड, आदि सुरवातीच्या चित्रपटात अदखलपात्र ठरलेल्या राजकुमारचे नंतरचे काही चित्रपटही कारकिर्दीच्या दृष्टीने तसे थंडच गेले. पण उजाला, दिल एक मंदिर, दिल अपना और प्रीत पराई, जिंदगी पैगाम, उंचे लोग, चार दिल चार राहे, फूल बने अंगारे, शरारत यासारख्या कृष्णधवल चित्रपटातून त्याची संवादफेकीची अनोखी धाटणी प्रेक्षकांना खिळवू लागली.
नायिकेवर एकतर्फी अबोल प्रेम करणारा अशी काहीशी त्याची प्रतिमा त्यांच्या वैशिष्ठयपूर्ण आवाजातील संवादफेकीमुळे उजळून निघत असे. दिल एक मंदिर मधील “बुलावा आया है’ हा साधा संवादही केवळ राजकुमारच्या तोंडातून ऐकताना त्यातील गर्भित अर्थ थेट काळजाला भिडत असे. तर नंतरच्या वक्त, वासना, बुलंदी, वा रंगीत जमान्यातील वासना, हिररांझा, हसते जखम, कुदरत, काजल, मर्यादा, सौदागरकाही चित्रपटातील त्याचे संवाद जणू आम जनतेच्या दृष्टीने सुभाषितेच ‘ठरली.’ शिशेके घरमे रहनेवाले दूसरोके घरपे पत्थर नही फेका करते चिनॉयशेठ’ हा डॉयलॉग असो वा उजाला मधील ‘ये चक्कू मुझे दे दे रामू,’ किंवा चक्कुछुरीसे खेलना बच्चोका काम नही जान….. संवाद चित्रपटात त्याच्या तोंडातून ऐकू आले की पिटातले प्रेक्षक शिटया-टाळ्यांचा जो पाऊस पाडत तो अंगावर शहारे आणीत असे.
रुपेरी पडद्यावरील त्याच्या संवादफेकीतील ‘जानी’ हे समोरच्याला केलेले संबोधन त्याची जणू स्वतःचीच ओळख बनली होती. पडद्याआडही काही वेळा सार्वजानिक ठिकाणी तो समोरच्याला जानी’ म्हणूनच संबोधत असे. त्याच्या विक्षिप्त, त-हेवाईक व कुजकट शेरेबाजीमुळे अनेक निर्माते त्याला टरकत कुणाच्या केसांना सरसोच्या तेलाचा उग्र वास येतो म्हणून स्टोरीसेशनही नाकारणारा तर एखाद्या प्रख्यात हिरो, दिग्दर्शकाला जनाब आप क्या करते है असे विचारणारा झिनत अमानला सिनेमात काम करण्याचा सल्ला ती टॉपवर असताना देणारा असा हा अवलिया राजकुमार भर पार्टीत भल्याभल्यांची त्याची टोपी उडवून शरमिंदा करत असे.
त्याच्या केसाच्या टोपाबददल, गळयातील काथ्यासदृश दोरीबददल ब-याच वेळा अफवेच्या रुपात कुजबुजही चालत असे. पण राजकुमारचा रुबाबत असा की हाथी चले अपने चाल कुत्ते भौके चाहे हजार….. असा हा जानी अखेरच्या काळात मारधाडीच्या जमान्यात कादरखानी बंबय्या संवादांच्या कोलाहलात पार गुदमरून गेला.
आपल्या आता करण्यासारखे काही उरले नाही हे ओळखून त्याने काम करणे कमी केले. त्याचा स्वतःच्या मुलाला सिनेसृष्टीत रुजवण्याचा प्रयत्नही नाकामयाब ठरला. अन अखेर ३ जुलै १९९८ रोजी “ये दुनिया ये मेहफिल मेरे कामकी नही” असे म्हणत त्याने त्यांच्या चाहत्यांना अलविदा केले
– दिलीप कुकडे