आपल्या कार्यातून प्रबोधन घडवणारे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र आहेत, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. मुलाला त्याच्या कार्याची योग्य दिशा दाखवण्याचे, योग्य संस्कार करण्याचे कार्य प्रबोधनकारांनी स्वतः आपल्या कार्यातून केले. प्रबोधनकारांचे कार्य आणि त्याची महती अगाध आहे. साहित्य, वाद-विवाद यांत त्यांचा हातखंडा होता. त्यात ते अत्यंत प्रभावी वक्ते होते.. याचेच बाळकडू बाळासाहेबांना लाभले असावे.
सामाजिक सुधारणा हे प्रबोधनकारांच्या जीवनाचे ध्येयच होते. या ध्येयाला पाठबळ देण्याचे काम महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी साहित्याने केले. या साहित्याच्या व्यापक अभ्यासातून समाज सुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक व्यापक झाल्या. महात्मा फुले यांच्या आयुष्यात जसे अनेक विरोधक आले, तसेच प्रबोधनकारांच्या कार्याआडही आले. विरोधकांच्या अडथळ्यांना ते आक्रमकरित्या तोंड देऊ लागले. समाजसुधारणेच्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. त्यांच्या तत्त्वांपासून ते कधीच परावृत्त झाले नाहीत. विधवांच्या केशवपनाची अमानुष परंपरा, बालविवाह, अस्पृश्यता, हुकूमशाही, हुंडा प्रथा यांविरुद्ध प्रबोधनकारांनी आवाज उठवला. त्यांच्या प्रबोधन कार्याच्या ख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या देखील संपर्कात आले. शाहू महाराज आणि प्रबोधनकारांत महात्मा फुलेंच्या विचारांचे साम्य होते. प्रबोधनकार बराच काळ शाहू महाराजांच्या संपर्कात होते. ‘लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही, अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे.. ती म्हणजे प्रबोधनकार’, असे शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितले. या दोन्ही समाज प्रबोधनकारांनी एकमेकांची अगदी योग्य पारख केली.
केशव ठाकरे यांची ‘प्रबोधनकार’ म्हणून ओळख होण्यामागे देखील महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे प्रबोधन पाक्षिक! १९२१ साली प्रबोधन पाक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. या पत्राच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींविरोधात रोखठोक भाषेत लिहिण्याचे धैर्य ठाकरे यांनी दाखवले. प्रबोधन मासिक आणि लोकहितवादी साप्ताहिकानंतर ते अनेक वृत्तपत्रांतून वेळोवेळी लिहीत राहिले. ही प्रबोधनाची लेखणी शेवटपर्यंत थांबली नाही! लेखक, पत्रकार, इतिहास संशोधक या तीनही हुद्द्यांची कामगिरी प्रबोधनकारांनी चोख बजावली.
प्रबोधनकारांनी साहित्याच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड ही त्यांचे उल्लेखनीय पुस्तके होती. खरा ब्राह्मण, विधिनिषेध आणि टाकलेले पोर या त्यांच्या नाटकांतूनही त्यांच्यातील सक्रिय समाजसुधारक दिसून येतो.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे प्रबोधनकारांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा. त्यावेळी बरेच वय झाले असूनही त्यांनी चळवळीचे नेतृत्व केले, प्रसंगी कारावासही भोगला! कार्यावरील त्यांची निष्ठा पाहून वार्धक्यही त्यांना थांबवू शकले नाही. वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्तींना आणि संघटनांना ‘प्रबोधनाच्या’ छताखाली एकत्र बांधून ठेवण्याचे त्यांचे धोरण होते.
‘महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारी विचारवंत’ अशी प्रबोधनकारांची जगभर ओळख आहे. अशा थोर व्यक्तिमत्वाची आज जयंती. एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक कलागुणांची जोपासना करणाऱ्या केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!