आपल्या भारत देशाची ओळख जगामध्ये विविध धर्मांचा देश म्हणून केली जाते. भारतात जरी हिंदू धर्मीय जास्त असले तरी इतर अनेक धर्मांचे लोकं या देशात आनंदाने राहतात. म्हणून भारतासाठी नेहमीच ‘सर्व धर्म समभाव’ हे वाक्य उच्चारले जाते. या देशात फक्त विविध धर्माचे लोकं राहातच नाही तर त्यांचे सण देखील आनंदाने साजरे करतात. भारतात राहणाऱ्या विविध धर्माच्या लोकांमध्ये पारशी हे लोकं प्रामुख्याने येतात.
यावर्षी १५ ऑगस्टच्या दिवशीच ‘पतेती’ हा सण साजरा होणार आहे. पतेती हा पारशी लोकांचा सण मोठ्या उत्साहाने भारतात साजरा केला जातो. पारशी लोकांचे नवीन वर्ष म्हणून पतेती सणाला ओळखले जाते. या दिवशी पारशी बांधव अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात. पारशी समाजात प्रेम बंधुता यासाठी पतेती हा सण ओळखला जातो. पारशी लोकांमध्ये त्यांच्या वर्षाच्या शेवटचे दहा दिवस हे अतिशय महत्वाचे समजले जातात. या दहा दिवसांमध्ये ते लोकं त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. दहा दिवसानंतर दुसऱ्या दिवशी पारशी लोकं त्यांचे नवीन वर्षी विविध संकल्प घेत सुरु करतात.
पारशी समाजाच्या पारंपारिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार त्यांचा वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. यंदा 15 ऑगस्ट रोजी पतेती सण असून, 16 ऑगस्ट रोजी पारशी समाज नववर्ष साजरे केले जाणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणून ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ फरवर्दीन महिन्याने होतो.
पतेती हा सण पारशी लोकं देखील मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करतात. पतेतीच्या दिवस पारशी लोकं सकाळी लवकर उठतात. या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते त्याला नहाना असे म्हणतात. या दिवशी ते नवीन कपडे घालतात आणि अग्यारीमध्ये जातात. तिथे प्रार्थना करतात. नंतर एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन एकमेकांना घरी जेवणासाठी आमंत्रण देखील देतात. या दिवशी पारशी लोकं आपली घरे साफ करतात. फुलांनी आणि रंगांनी घरांची सजावट करतात. तसेच या दिवशी गोडधोड पदार्थ खातात.
पारशी नववर्षाचा सण हा नवरोज म्हणून ओळखला जातो. पर्शियनमध्ये नव आणि रोझ या शब्दांचा अर्थ नवीन आणि दिवस असा होतो. नवरोजला जमशीदी नवरोज, नौरोज, पतेती या नावाने ओळखले जाते. जगातील अनेक भागात हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. मार्च आणि ऑगस्ट महिन्यात अर्धवार्षिक आणि वार्षिक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील पारशी लोक हा सण पारशी दिनदर्शिकेच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात २१ मार्च रोजी साजरा करतात. तर भारतातील पारशी लोकं शहाशाही कॅलेंडरचे पालन करतात. म्हणूनच ते १५ ऑगस्ट रोजी साजरा करतील.
======
हे देखील वाचा : तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यासाठीचे नियम
======
नवरोज हा सण पर्शियाचा राजा जमशेद यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. असे सांगितले जाते की, राजा जमशेद यांनी पारशी दिनदर्शिकेची स्थापना केली. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारशी नववर्षाचा उत्सव जमशेद-ए-नौरोज या नावानेही प्रसिद्ध आहे.
पारशी समाजाच्या मान्यतेनुसार जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी राजा साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी आनंदाने त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले. राजा जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली. तेव्हापासून पारशी समाजातील लोकांनी पतेती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.