– श्रीकांत ना. कुलकर्णी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रात पंढरपूर येथेही विधानसभेची नुकतीच पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे तीन हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिलीच विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आले होते. त्यामध्ये सध्या विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने बाजी मारली आहे हे विशेष होय.
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे मविआ आघाडीतर्फे साहजिकच या मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादीचाच उमेदवार पोटनिवडणूक लढविणार हे गृहीतच होते. त्यानुसार राष्ट्रवादीने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. कदाचित भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा भगीरथ भालके यांना फायदाच होईल असे साधे गणित त्यामागे होते. मात्र हे गणित फसल्याचे निकालावरून कळून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव असतानाही भगीरथ भालके यांचा जोरदार प्रचार केला. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली मात्र भगीरथ भालके यांना यश मिळू शकले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे दोन प्रमुख मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीला साहजिकच पाठिंबा दिला होता परंतु तो फारसा सक्रिय नसावा असे दिसते.
दोन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांपैकी कोणीही प्रचाराला गेल्याचे ऐकिवात नाही. उलट शिवसेनेच्या एका स्थानिक महिला कार्यकर्तीने बंडखोरी करून निवडणूक लढविल्याचे चित्र पाहायला मिळाले. थोडक्यात मविआ आघाडीत समन्वय नव्हता. शिवाय आघाडीचा उमेदवार सहानुभूतीच्या लाटेत निवडून येणारच असेच जणू गृहीत धरण्यात आले होते. याउलट भाजपमधील सर्व नेते या निवडणुकीत गटबाजी विसरून एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले.
पंढरपूर परिसरातील बहुतेक सर्व भाजपची नेतेमंडळी ही इतर पक्षातून आयात केलेली आहेत. त्यामध्ये काही मूळ राष्ट्रवादीचेच आहेत. अकलूजचे विजयसिंग मोहिते पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, पंढरपूरचे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक त्यांचे बंधू उमेश परिचारक या सर्वांनी या निवडणुकीत एकदिलाने काम केल्याचे दिसून आले. शिवाय भालके यांचा पराभव केल्यास अजित पवार यांनाही शह बसेल. त्यांचा तालुक्यातील हस्तक्षेपाला आळा बसेल असेही या नेत्यांना वाटले असेल. त्यामुळे त्याचेही समाधान आता या नेत्यांना मिळाले असेल. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांनी या नेत्यांच्या गटबाजीचा फायदा घेऊनच पवारांच्या मदतीनेच ही निवडणूक जिंकली होती.
याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कारण मविआ सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या फडणवीसांना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जनतेपर्यंत जाण्याची संधी मिळाली होती. मविआ सरकारबद्दल राज्यातील जनतेच्या मनात काय भावना आहेत हेही मतपेटीतून दिसणार असल्यामुळे त्यांनी सत्तारूढ पक्षाचा उमेदवार कसा पराभूत होईल यासाठीच सर्व प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यशही मिळाले.
त्यामुळेच निवडणुकीच्या काळात प्रचार सभेत बोलतांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, “तुम्ही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना फक्त निवडून द्या, त्यानंतर मी लगेच आघाडी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो” असे आवाहन केले होते. आता आवताडे तर निवडून आलेले आहेत त्यामुळे साहजिकच फडणवीस आघाडी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कधी करणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलेले असेल.
या पोटनिवडणुकीतील विजयामुळे भाजपचा उत्साह दुणावला असला तरी फडणवीसांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ नजीकच्या काळात अंमलात येईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यात आघाडी सरकारला येत असलेले अपयश हा एक महत्वाचा मुद्दा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास भाग पाडू शकतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्रपक्षातील काही मंत्री व इतर नेत्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला केंद्र सरकारचे असहकार्याचे धोरण कसे कारणीभूत आहे हे वारंवार सांगून जनतेला आधीच पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवाय दिल्लीसारख्या इतर राज्यांनीही केंद्राच्या बाबतीत हाच सूर आळवल्यामुळे आणि कोरोनाबाबत उपाययोजना करण्याऐवजी मोदी-शहा यांनी निवडणुकीला प्राधान्य दिल्याचे उघड झाल्यामुळे केंद्र सरकार सध्या तरी बॅकफूटवर गेले आहे. शिवाय प. बंगाल, तामिळनाडू, केरळ या प्रमुख राज्यातील पराभवामुळे मोदी-शहा यांचे नैतिक धैर्यही खचल्यामुळे महाराष्ट्रात तूर्तास तरी राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता दिसत नाही.
एवढे करूनही भाजपला (BJP) राज्यात नवे सरकार स्थापन करावयाचे झाल्यास किमान ३५ आमदारांची आवश्यकता आहे. हे ३५ आमदार लगेच मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे फडणवीसांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कोणत्या मुहूर्तावर होणार हे सांगणे त्यांनाही अवघडच जाणार आहे.
-श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)