विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे.
श्री क्षेत्र विघ्नेश्वराची अख्यायीका
पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पडण्यासाठी धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकली पण त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने सुध्दा निर्माण केली. म्हणून मग पृथ्वीतळावरील लोक ब्रम्हदेव आणि शंकर यांच्याकडे गेले. त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले.
समस्त लोकांनी गणपतीची अराधाना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला. विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची (Vigneshwara Temple, Ozar) स्थापना केली.
श्री क्षेत्र विघ्नेश्वर मंदिर आणि परिसर
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत.
देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.
पूजा आणि उत्सव
उपलब्ध माहितीनुसार दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ११. अंगारकी चतुर्थीला सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत. महाआरती सकाळी ७.३०, मध्यान्न आरती दुपारी १२ आणि शेजआरती रात्री १० वाजता असते. महाप्रसाद सकाळी १०, दुपारी १ आणि संध्याकाळी ७.३० ते १०.३०.
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती यादिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते.
मुर्तीची वैशिष्ट्ये
डोळ्यात माणिक. मंदिरातील गाभाऱ्यात पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणिक तर कपाळावर, नाभीवर हिरे आहेत. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मंदिराच्या पुढे २० फूट लांब सभागृह आहे. आतील गाभारा १० बाय १० फुटांचा आहे. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी आहे. मंदिर परिसरात दोन अत्यंत रेखीव अशा दीपमाळा आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता प्रसन्नतेची अनुभूती होते.
कसे पोहचाल
ओझर लेण्याद्रीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर ओझर येते. नाशिकपासून सिन्नर-आळेफाटामार्गे १३९ किलोमीटरचे अंतर पार केल्यावर ओझर गणपतीला जाता येते.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: तिसरा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.