Home » राजकारणातील झंझावात : शरद पवार

राजकारणातील झंझावात : शरद पवार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sharad Pawar
Share

शरद पवार बस नाम ही काफी है! महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते. एक मुत्सद्दी राजकारणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे शरद पवार आज त्यांचा ८४ वा वाढदिवस साजरा करत आहे. शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते अशी शरद पवारांची ओळख आहे.

भारतातील सर्वाधिक संसदीय कारकिर्द असलेले शरद पवार हे पन्नासहून अधिक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री यांसोबतच नानाविध पदांवर काम केले आहे. या वयातही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या विचारांना खूप महत्व दिले जाते. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून सुरु झालेला शरद पवारांचा राजकीय प्रवास हा दिल्लीपर्यंत पोहचला आहे.

शरद पवार यांचे गणना देशातील प्रभावशाली राजकीय नेत्यांमध्ये केली जाते. शरद पवार यांनी वयाच्या २७व्या वर्षी राजकीय प्रवास सुरु केला. जवळपास ५७ वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवारांनी १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सदस्य म्हणून निवडून आले. आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत.

शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या अतिशय छोट्या गावात झाला. शरद पवारांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव शारदाबाई होते. शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या आई शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या. तर वडील गोविंदाराव हे देखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यंकर्ते होते.

शरद पवार यांचे भाऊ वसंतराव हे देखील शेतकरी कामगार पक्षात होते. त्यामुळे पवारांवर लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याचे संस्कार झाले. शरद पवार यांनी बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर पुढे त्यांनी पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतले. याच काळात ते राजकारणात हळूहळू सक्रिय होऊ लागले. शरद पवार हे महाविद्यालयीन निवडणूक जिंकले आणि ते जनरल सेक्रेटरी (जी.एस) झाले. त्यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नेतृत्त्व केले. या काळात पवारांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि त्यांची पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार यांनी त्याचे राजकीय गुरू मानले. पुढे शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. शरद पवार यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत असताना एका कार्यक्रमाला हजर असणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर जे भाषण केले ते ऐकुन यशवंतराव कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी पवारांना युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले. चव्हाणांचा तो सल्ला ऐकून शरद पवार यांनी वयाच्या २४ व्या वर्षी राज्य युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.

पुढे शरद पवार यांनी १९६७ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यानंतर १९७८ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि जनता दलाशी आघाडी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अगदी वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते सहभागी झाले. काँग्रेसचे १२ आमदार फोडून शरद पवार पहिल्यांदा १९७८ ला मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांचे सरकार पाडले.

१९८० मध्ये इंदिरा गांधींनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले. १९८३ मध्ये, शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शरद पवार यांनी संसद सोडली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले.

यानंतर १९८७ मध्ये शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि १९८८ मध्ये ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. १९९० मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पवार पुन्हा एकदा अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्याचे मुख्यमंत्री बनले. राजीव गांधींच्या हत्येनंतर शरद पवारांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देखील होते. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने नरसिंह राव यांची पंतप्रधान म्हणून निवड केली तर शरद पवार संरक्षणमंत्री बनले.

१९९३ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नायक यांनी पद सोडल्यानंतर शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने काँग्रेस पक्षाचा पराभव केला आणि पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यानंतर पवार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले.

१९९६ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि १२ व्या लोकसभेत त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. १९९९ मध्ये जेव्हा १२ वी लोकसभा विसर्जित झाली तेव्हा शरद पवार यांनी सोनिया गांधी विदेशी वंशाच्या असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसची साथ सोडली आणि तारिक अन्वर आणि पी.ए. संगमा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवारांना काँग्रेससोबत युती करावी लागली. त्यावेळी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यावर मनमोहन सिंग सरकारमध्ये शरद पवार यांना कृषी मंत्री करण्यात आले. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनमोहन सिंग सरकारमध्ये शरद पवार यांना केंद्रीय कृषी आणि ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री करण्यात आले.

शरद पवार २९ नोव्हेंबर २००५ मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि २००८ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. दरम्यान २००१ ते २०१० पर्यंत शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)अध्यक्ष होते आणि जून २०१५ मध्ये त्यांची पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली.

२०१९ साताऱ्यात शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली होती. ही सभा भर पावसात झाली. या सभेमुळे राज्यातील वातावरण बदलले. आजही शरद पवार यांच्या त्या सभेची चर्चा होत असते. २०१९ साली शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवत भाजपला आव्हान दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे हे सरकार पडले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात त्यांचा अनुभव अमूल्य ठरला. दरम्यान, २०१७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक म्हणून शरद पवार ओळखले जातात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.