Home » आई एकविरा देवी कार्ला इतिहास

आई एकविरा देवी कार्ला इतिहास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ekvira Devi karla
Share

सध्या सगळीकडे शारदीय नवरात्राचा मोठा जल्लोष सुरु आहे. या शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा देवीने नऊ दिवस नऊ वेगवेगळी रूपं घेऊन महिषासुर राक्षसाचा वध केला होता. हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्राला मोठे महत्व. दुर्गा देवीची असंख्य अगणित रूपं आपल्याला पाहायला मिळतात. देवीने विविध रूपं घेऊन या सृष्टीला वाईट वृत्तीपासून वाचवले आहे. तसेच चांगल्या गोष्टींसाठी भक्तांना नेहमीच आशीर्वाद दिला आहे. असेच देवीचे एक प्रसिद्ध रूप म्हणजे आई एकविरा.

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यानजीक कार्ला लेणींमधील आई एकविरा देवी अतिशय जागृत आणि जाज्वल्य देवस्थान मानले जाते. लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा दोन मूर्ती या मंदिरात पाहायला मिळतात. या दोन्ही देवींमध्ये नणंद आणि भाऊजय असे नाते आहे. जोगेश्वरी देवी ही काल भैरवनाथांची पत्नी आहे. म्हणजेच कालभैरवनाथ हे एकविरा आईचे भाऊ आहेत.

महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थान सामील आहे. इसवी सनच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचे अतिशय सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी. मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे. एकविरा देवीचे दर्श घेण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढून वर जावे लागते. त्यानंतर आई एकवीरेचे सुंदर दर्शन मिळते.

Ekvira Devi karla

कार्ला येथील लेण्यांचा देखील मोठा इतिहास आहे. ही कार्ला येथील लेणी बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. एकविरा देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची माहिती आहे. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे देखील म्हटले जाते.

महाराष्ट्रातील खासकरून मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी आदी अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईला ओळखले जाते. चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यांत येणाऱ्या नवरात्रोत्सवात देवीची यात्रा भरते. या काळात येथे मोठी यात्रा असते. लोकं देवीचे दर्शन घेण्यासोबतच नवस फेडण्यासाठी देखील येथे येत असतात.

एकविरा देवीची आख्यायिका

धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पाचही पांडव वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना ते कार्ला परिसरात पोहोचले. त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली. ‘या ठिकाणी माझे मंदिर बांधा’ असा दृष्टांत देवीने पांडवांना दिला. मात्र सोबतच एक अटीही घातली की, ‘एका रात्रीतच मंदिर बांधले गेले पाहिजे’. देवीने घातलेल्या या अटीचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले. देवी प्रसन्न झाली. वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहायचे होते. या काळात ‘पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही,’ असा वर देवीने पांडवांना दिला.

एकवीरा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अवतार आहे, असेही म्हटले जाते. विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती, देवी यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी, अशीही आख्यायिका सांगितली जाते.

=======

हे देखील वाचा : नवरात्रातील अष्टमी तिथी आणि कन्यापूजनाचे महत्व

=======

एकविरा देवीचे मंदिर दररोज पहाटे ५ ला उघडले जाते. त्यानंतर मंदिरात गुलाब जल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ, पवित्र वातावरण निर्माण केलं जातं. त्यानंतर तांदळा दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आई एकविरेच्या मूळ मुर्तीची पहाटे ५.३० ला काकड आरती केली जाते, ६ वाजून ३० मिनिटांनी अभिषेक देखील करण्यात येतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.