देशात बऱ्याच कलाकारांच्या, नेत्यांच्या, उद्योजकांच्या हत्या झाल्या. पण ११ वर्षांपूर्वी झालेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येने साऱ्या देशाला हादरवून सोडलं होतं.
अंधश्रद्धा निर्मूल समितीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र विवेकवादी चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.
पुण्यात गोळ्या झाडून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. सारा देश या हत्येमुळे हादरला होता. आता तब्बल ११ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने अखेर ११ वर्षांनंतर निकाल दिला आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
दाभोलकरांच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात होता? त्यांची हत्या होण्यामागची नेमकी कारणं कोणती? या प्रकरणाला मिळालेलं राजकीय वळण आणि त्यातून निर्माण झालेला गोंधळ आणि या प्रकरणाचा निकाल द्यायला इतका विलंब का झाला? याबद्दलच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राला ‘तिमिरातून’ ‘तेजाकडे’ घेऊन जाणाऱ्या दाभोलकरांच्या हत्येबद्दल आजही कुणी विसरू शकलेले नाहीत. २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
त्यांची हत्या केल्यावर ते दोघे तिथून निसटण्यात यशस्वी झाले. यानंतर राज्यभरात सर्वत्र संतापची लाट उसळली. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून शिक्षा ठोठावण्याची मागणी जोर धरू लागली. पुरोगामी महाराष्ट्रात एका विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्याची होणारी हत्या ही कित्येकांना अस्वस्थ करणारी होती.
सुरक्षा तसेच सरकारी यंत्रणांवरही चांगलाच दबाव होता. अखेर २०१३ मध्ये पुणे पोलिसांना पहिली अटक करण्यात यश मिळालं.
ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ती पिस्तूल विकणाऱ्या मनीष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना अटक केली आणि ऑक्टोबर २०१३ मध्ये या दोघांनाही महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून ४० अवैध बंदुका जप्त केल्याचा दावाही एटीएसने केला होता.
जेव्हा या दोन आरोपीना कोर्टात हजर केला तेव्हा यांनी चक्क एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते. एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी या खुनाची कबूल देण्यासाठी २५ लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी कोर्टात केला आणि या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला.
नंतर बरीच चौकशी केल्यावर या दोघांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आणि यांची जामिनावर सुटकाही झाली.
पुणे पोलिसांचा भरकटलेला तपास आणि एकूणच अकार्यक्षमता लक्षात घेता हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात यावं अशी मागणीही होऊ लागली. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर २०१४ च्या जून महिन्यात दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला आणि यानंतर मात्र या प्रकरणाच्या तपासाला एक वेग मिळाला. सीबीआयने २०१६ मध्ये एका सनातन संस्थेशी संबंधित इएनटी सर्जन डॉ. विरेन्द्रसिंह तावडे याला अटक केली.
याच तावडेला आधी पानसरे हत्या प्रकरणात २०१५ ला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सूत्रधार तावडे असल्याचा सीबीआयचा आरोप होता. त्यांच्याविरोधात हे षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आलं.
===
हेदेखील वाचा : मतदाराच्या बोटाला लागणाऱ्या ‘शाई’बद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?
===
सनातन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांच्यातील आंतरिक वादातून ही हत्या झाली असल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला. याच सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनीच दाभोलकर यांच्या गोळा झाडल्या असल्याचा दावा त्यावेळी सीबीआयने केला होता.
तावडेच्या सांगण्यावरुण अकोलकर आणि पवार यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केलं होतं. हत्या होऊन दोन वर्षे उलटली तरीही संथ गतीने होणारा तपास आणि कोणत्याही बाबतीत ठोस पुरव्यांचा असलेला अभाव पाहता दाभोलकर यांचे कुटुंबीयांनी कोर्टाचे दार ठोठावले.
डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. तब्बल ८ वर्षे उच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली या प्रकरणाचा तपास सुरू होता.
यादरम्यान सीबीआयने आणखी दोन आरोपींना अटक केली होती. पण नंतर सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. कारण या तपासाच्या अगदी उलट जात ऑगस्ट २०१८ मध्ये सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा केला होता.
शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांचा सीबीआयला सुगावा कसा लागला याबद्दल थोडं जाणून घेऊयात. याचं कनेक्शन गौरी लंकेश हत्येशी जोडलेलं आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएसने २०१८ मध्ये नालासोपारा येथे वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती. यावेळी अवैध शस्त्र साठयाबरोबरच वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना अटक झाली होती.
त्यावेळी शरदचा दाभोलकरांच्या हत्येशी थेट संबंध असल्याचे समोर आले होते. सीबीआयच्या चौकशीदरम्यान शरदने गुन्हा कबूल केल्याचं स्पष्ट झालं. त्यानेच दिलेल्या माहितीवरुन तेव्हाच्या औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजी नगरमधून सचिन अंदुरेला सीबीआयने ताब्यात घेतलं.
दाभोलकर हत्या प्रकरणातील ही तिसरी अट होती. आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने अधिक वेळ मागून घेतली. अखेर १३ फेब्रुवारी २०१९ मध्ये या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
५ मार्च २०२० रोजी ज्या पिस्तुलाने दाभोलकरांची हत्या झाली ते सापडल्याचा दावा सीबीआयने केला. पण हे पिस्तूल तेच पिस्तूल आहे की नाही जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांनकडे ते पाठवण्यात आली ज्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. ‘सीबीआय’कडून विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवल्या आहेत.
‘डॉ. दाभोलकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचं स्पष्ट झालं. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले आहे.
दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती, हेदेखील सिद्ध झाले.
त्यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखण्यात आले.
आरोपी अंदुरेने गुन्हा केल्याचा कबुलीजबाब दिला. दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल जप्त झाले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे स्पष्ट केले.
दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर काढण्यात आल्याचे ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे गोळीबार झाल्याचे सिद्ध होते,’ असे ‘सीबीआय’चे वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी त्यांच्यायुक्तिवादात नमूद केले होते.
तब्बल ११ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. साऱ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.
प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जात आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाले आहे, त्यामुळे दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला ११ वर्षानंतर न्याय मिळतोय, यामुळे न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.