Home » ‘मस्ती’ अखेर अंगलट आली!

‘मस्ती’ अखेर अंगलट आली!

by Correspondent
0 comment
Narayan Rane | K Facts
Share

श्रीकांत नारायण

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात मंगळवार दि. २४ ऑगस्ट (२०११) हा काळ्या अक्षरात लिहिला जाईल. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्याबद्दल चक्क अटक करण्यात आली. त्यानंतर नारायण राणे यांची न्यायालयाने लगेच जामिनावर मुक्तता केली. त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबतही मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना थोडासा दिलासा असला तरी ”जो बुंद से गयी, वो हौद से आती नही” या म्हणीचा प्रत्यय आला.

याशिवाय आता पोलीस आणि न्यायालयाचे शुक्लकाष्ठ त्यांच्यामागे लागले आहे. केंद्रात गेल्या सात वर्षांपासून सत्तेवर असलेल्या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ते धाडस उद्धव ठाकरे सरकारने करून दाखवले आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात गेले काही महिने सातत्याने चालू असलेल्या संघर्षाची परिणिती अखेर राणे यांच्या अटकेत झाली.

राणे यांच्या अटकेनंतर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते परस्परांशी भिडले. काही ठिकाणी हिंसाचारही झाला आणि शिवसेना – भाजपमधील कटुता आणखी वाढली. एकीकडे राज्यात ‘कोरोना’ सारख्या महामारीचे संकट कायम असताना मंगळवारी दिवसभर राणे यांच्या अटकेचा तमाशा पाहण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्रातील जनतेला लाभले.

शिवसेनेने भाजपशी असलेली आपली दीर्घकाळची युती तोडून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यापासून भाजप आणि शिवसेना यांच्यात आडवा विस्तव जात नाही. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार व्हावे म्हणून भाजपने जंग-जंग पछाडले मात्र भाजपाला यश मिळाले नाही. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला सळो की पळो करून सोडण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना ‘फ्री हॅन्ड’ दिला. त्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रीही केले.

अत्यंत खालच्या भाषेत जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे नवे बळ मिळाले आणि त्यांची जीभ तर आणखी सुटली. उद्धव ठाकरे हे त्यांच्यादृष्टीने ‘खलनायक’ असले तरीही ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे राणे स्वतः केंद्रीय मंत्री होऊनही विसरले. त्यामुळे त्यांची उद्धवबाबत पहिल्यापासून असलेली ‘अरे-तुरे’ ची भाषा आणखीनच कडवट झाली.

केंद्रीय मंत्री म्हणून कोंकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर अधिकाऱ्यांना झापणे, अधिकाऱ्यांशी बोलताना लोकांसमोर आणि मिडियासमोर ”सीएम-बीएम गेला उडत” अशी भाषा करणे असे प्रकार राणे यांनी सर्रास केले. त्यातच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘अमृतमहोत्सवी’ की ‘हीरकमहोत्सवी’ शब्द वापरण्यावरून गोंधळ उडाला आणि राणे यांना त्याचे आयते कोलीतच मिळाले.

त्यासंदभात बोलताना पत्रकारांशी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचीच भाषा केली. यावेळी आपण एक केंद्रीय मंत्री आहोत हेही ते विसरले. राजकारणातील द्वेषाची त्यांनी परिसीमा केली. आपण काहीही बोललो, काहीही केले तरी आता चालते या भ्रमात कायम राहणाऱ्या राणे यांचा फुगा अखेर त्यांच्या अटकेने फुटला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चतुराईने राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्याची गंभीर दखल घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आघाडीतील इतर प्रमुख मंत्र्यांना विश्वासात घेऊन रात्रीतून राणे यांच्या अटकेचे जाळे टाकले आणि त्यामध्ये, अगदी सकाळपर्यँत ”मला अटक करण्याची कोणाची हिम्मत नाही” असे सांगत राहणारे राणे अलगद अडकले. राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले.

राणे यांना अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने एका दगडात दोन-तीन पक्षी मारले आहेत. एक तर खालच्या पातळीवरून टीका करणाऱ्या वाचाळवीरांना हा कायम लक्षात राहील असा धडा शिकविला गेला, तसेच राणे यांना त्यांच्याच कोकणासारख्या बालेकिल्ल्यात अटक करून त्यांच्या प्रभावाला सुरुंग लावला आणि केंद्र सरकारलाही, वेळ आली तर आम्ही तुमच्या मंत्र्यालाही अटक करू शकतो असा इशाराही दिला.

केंद्रीय मंत्री असलेले नारायण यांच्या अटकेमुळे नाही म्हटले तरी केंद्र सरकारची बदनामी झाली हेही तेवढेच खरे. आणि याशिवाय मुख्य म्हणजे राणे यांच्या अटकेमुळे भाजपच्या ”जनआशीर्वाद यात्रे” तील हवाच काढून टाकण्यात आली आहे.  ”आमची यापुढेही जनआशीर्वाद यात्रा ठरल्याप्रमाणे निघेल” असे भाजपतर्फे सांगण्यात येत असले तरी त्याला आता कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे.

राणे यांच्या अटक प्रकरणात सर्वात गोची झाली ती प्रदेश भाजपची. राणे यांच्या उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही मात्र भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे अशी नाईलाजात्मक भूमिका प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार (Ashish Shelar) आदी नेत्यांना घावी लागली. चंद्रकांत पाटील यांना तर अशा शिवराळ वक्त्यव्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणे आवश्यक आहे अशी सूचना करावीशी वाटली त्यावरून त्यांनाही राणे यांची भाषा रुचली नसावी असे दिसते.

राणे प्रकरणात अजून तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया कळू शकली नाही मात्र जे काही झाले ते उचित नव्हते असेच उभय नेत्यांना वाटण्याची शक्यता आहे. तसेच प्रदेश भाजप नेत्यांना डोईजड ठरत चाललेल्या राणे यांच्याविरुद्ध अशा प्रकारची कारवाई झाल्याने काही भाजप नेत्यांना निश्चितच आनंद झाला असेल मात्र त्यांना तो व्यक्त करणे साहजिकच अवघड झाले असावे.

थोडक्यात, राणे यांच्यावरील कारवाईने त्यांना तर योग्य धडा मिळालाच आहे. आता तरी त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीला ‘ब्रेक’ मिळेल. आपल्या अटकेनंतर बुधवारी मुंबईत नारायण राणे यांनी जी पत्रकारपरिषद घेतली त्यामध्ये नेहमी आक्रमक असणारे राणे एकदम बॅकफूटवर गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकूणच राणे यांच्या अटक-प्रकरणाचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.