ओडिशा राज्यातील पुरी शहरापासून सुमारे 23 मैल अंतरावर चंद्रभागा नदीच्या काठावर कोणार्कचे सूर्य मंदिर (Konark Sun Temple) आहे. हे मंदिर भगवान सूर्याला समर्पित आहे. या मंदिराच्या भव्यतेमुळे देशातील 10 मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. या मंदिरातून थेट सूर्यदेवाचे दर्शन होते. मात्र तरीही या मंदिरात सूर्यदेवाची पूजा होत नाही. हेच काय एवढा प्राचीन वारसा असूनही या मंदिराबाबत अनेक चमत्कारीक कथा प्रचलित आहेत. त्यामध्ये येथे सूर्यास्तानंतर वाद्यांचे आणि घुंगरुंचे आवाज ऐकायला येतात अशीही कथा आहे.
या मंदिराची उभारणी भगवान कृष्णाचे पुत्र सांब यांनी केली होती असेही सांगण्यात येते. या मंदिरात भव्य असे चुंबक होते. यामुळे मंदिरातील सूर्याची प्रतिमा तरंगत असायची, असेही सांगण्यात येते. या अशा कथा प्रसिद्ध असल्यातरी मंदिर परिसरात सूर्याचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. 1984 मध्ये, युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शापामुळे कुष्ठरोग झाला होता. हा रोग दूर करण्यासाठी मित्रवनातील चंद्रभागा नदीच्या संगमावर कोणार्क येथे सांबाने बारा वर्षे तप केले. या तपामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांबाला रोगमुक्त केले. यामुळे प्रसन्न झालेल्या सांबाने भव्यदिव्य असे सूर्यमंदिर बांधण्याचा निश्चय केला. (Mysterious Konark Sun Temple)
आजारपणानंतर चंद्रभागा नदीत स्नान करत असताना सांबाला सूर्यदेवाची मूर्ती दिसली. राजा विश्वकर्मांनी ही मूर्ती बनवली होती. तिच मुर्ती सांबानी या मंदिरात स्थापन केली. अशी एक कथा या मंदिराबाबत आहे. मात्र या कथेव्यतिरिक्तही मंदिराच्या निर्मितीबाबत अनेक कथा प्रसिद्ध आहेत. कोणार्क मंदिर 1253 ते 1260 च्या दरम्यान बांधले गेले असे अनेक इतिहासकारांचे मत आहे.
गंगा वंशाचा राजा नृसिंहदेव याने लाल वाळूचा दगड आणि काळ्या ग्रॅनाइट दगडापासून मंदिर बांधले. यासाठी बाराशे वास्तुविशारद आणि कारागीरांच्या फौजेने बारा वर्ष अथक परिश्रम केले. मंदिर सूर्यदेवाच्या रथाच्या रूपात बांधण्यात आले. दगडावर उत्कृष्ट नक्षीकाम करून ते अतिशय रेखीव बनवण्यात आले आहे. संपूर्ण मंदिराची जागा सात घोड्यांनी ओढलेल्या चक्रांच्या बारा जोड्यांसह बांधलेली आहे. ज्यामध्ये सूर्यदेव बसल्याचे दाखवले आहे. मात्र सध्या सातपैकी एकच घोडा शिल्लक आहे. मंदिराच्या प्रत्येक भागात देवता व गंधर्वांच्या प्रतिमा आहेत. (Mysterious Konark Sun Temple)
भारतीय स्थापत्यशास्त्र आणि विज्ञान किती समृद्ध होते याची झलक या मंदिरामध्ये दिसते. या मंदिराचा भाग कालांतराने पडला. त्यामागे असलेल्या कथाही रंजक आहेत. राजा नृसिंहदेव यांच्या अकाली मृत्यूमुळे मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले आणि कालांतराने ते कोसळले असे सांगण्यात येते. मात्र या मंदिरातील चुंबक यास कारणीभूत होता असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.
====
हे देखील वाचा – हैदराबादचे नाव खरंच भाग्यनगर होते? जाणून घ्या यामागील इतिहास
====
या मंदिरात भव्य असा चुंबक बसवण्यात आला होता. मंदिरावर ५२ टन वजनाचा चुंबक होता. या भव्य चुंबकामुळे मंदिरातील सूर्यदेवाची प्रतिमा तरंगत रहायची. मात्र या चुंबकाच्या प्रभावाने या भागातील समुद्रात कोणतेही जहाज येत नसे. जहाजे खराब होत असत आणि त्यांचे अपघातही होत. तसेच त्यांच्या दिशाही चुकायच्या. मुस्लिम आक्रमकांनी यामुळे या चुंबकाला तोडले आणि जहाजांचा रस्ता मोकळा केला. यामुळेच नंतर इंग्रजांच्या जहाजांचा भारतीय समुद्रात शिरकाव झाला. अन्यथा त्यांच्याही जहांजाना या चुंबकाच्या प्रभावाचा अडथळा होत होता. (Mysterious Konark Sun Temple)
कोणार्क मंदिर तीन मंडपात बांधलेले आहे. मंदिराचे मुख्य प्रांगण ८५७ फूट X ५४० फूट आहे. कोणार्क हा शब्द ‘कोना’ आणि ‘अर्क’ या शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे. अर्का म्हणजे सूर्य, तर कोन म्हणजे कोपरा किंवा किनार. या तीन मंडपांपैकी दोन पडले आहेत. तिसर्या मंडपात जिथे मूर्ती होती तिथे इंग्रजांनी मंदिराचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून वाळू आणि दगड भरून सर्व दरवाजे कायमचे बंद केले होते. आता येथील कलाकृतींची काळजी भारतीय पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने बांधलेल्या बगिचामध्ये आता सूर्यभक्तांची गर्दी असते. मंदिराची पडझड झालेली असली तरी भारीतय स्थापत्यशास्त्राचा एक आधुनिक रुप म्हणून या मंदिराला पहाण्यात येते. कोणार्क मंदिराबद्दल आणखी एक समज आहे की, आजही येथे नर्तकांचे आत्मे येतात. या भागातील स्थानिकांच्या मतानुसार आजही आजही सायंकाळी या मंदिरातून वाद्यांचे आणि घुंगरुचे आवाज ऐकू येतात. हा समज प्रचलित असला तरी मंदिराच्या माथ्यावरून उगवणारा आणि मावळणारा सूर्य आणि सूर्यप्रकाशातून निघालेल्या लालीमुळे संपूर्ण मंदिरात पसरलेला लाल-केशरी रंग; हे विलोभनीय दृष्य बघण्यासाठी येथे हजारो पर्यटकांची गर्दी झालेली असते. (Mysterious Konark Sun Temple)
कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे समृद्ध भारतीय सांस्कृतिक वारसा आहे. महान कवी आणि नाटककार रवींद्रनाथ टागोर यांनी तर मंदिराबद्दल, “कोणार्क – जिथे दगडांची भाषा माणसापेक्षा श्रेष्ठ आहे”, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सई बने…