Home » स्थापत्यकलेचा अद्भुत चमत्कार असणारं हे मंदिर बांधलं आहे एलिअन्सनी!

स्थापत्यकलेचा अद्भुत चमत्कार असणारं हे मंदिर बांधलं आहे एलिअन्सनी!

by Team Gajawaja
0 comment
Share

कर्नाटकातील हलेबिडू येथील बेलूरपासून 16 किमी अंतरावर भगवान शंकराला समर्पित असलेले होयसलेश्वर शिव मंदिर (Hoysaleswara Temple) आहे. 12व्या शतकात राजा विष्णुवर्धनाच्या काळात हे मंदिर उभारण्यात आले.  यासाठी तब्बल तीस वर्षाचा कालावधी लागला. भव्य मूर्ती, मंदिरातील खांबावर असलेली अत्यंत सुंदर अशी दगडावरची कलाकृती आणि सद्यस्थितीत फक्त मशीनच्या सहाय्यानेच होऊ शकते अशी मंदिराच्या सजावटीसाठी केलेली दगडांची नक्षी हे सर्व बघायचे असेल, तर या होयसलेश्वर मंदिराला एकदा तरी भेट द्यायला हवी.  

भारतीय स्थापत्यकला किती समृद्ध आणि आधुनिक होती याचे प्रत्यय हे मंदिर बघतांना येते. हे मंदिर परग्रहावरुन आलेल्या कारागिरांनी उभारल्याच्या आख्यायिकाही परिसरात आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक वारसा स्थळ म्हणून होयसोलेश्वर शिव मंदिर नामांकित केले आहे. तसेच  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या मंदिराला समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. (Mysterious Hoysaleswara Temple)

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. या मंदिरात होयसलेश्वर मंदिराचा समावेश होतो. होयसलेश्वर मंदिराला होयलेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर कर्नाटकातील बेलूरपासून 16 किमी अंतरावर हसन जिल्ह्यातील हेलेविड येथे आहे. मंदिर जेवढे रेखीव आहे, तेवढाच हा परिसर सुंदर आहे. त्यामुळे किमान दिवसाचा अवधी तरी सर्व मंदिर पहाण्यासाठी जातो.  

होयसलेश्वर मंदिराची उभारणी राजा विष्णूवर्धन यांनी १२व्या शतकात केली. भगवान शिवाला समर्पित असलेल्या होयसलेश्वर मंदिरात भगवान विष्णू, शिव आणि इतर देवतांच्याही मूर्ती आहेत. या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती एका विशिष्ट दगडापासून तयार केलेल्या आहेत. हा दगड सुरुवातीला अगदी मऊ असतो. त्यामुळेच या सर्व मुर्तींवर अप्रतिम असे नक्षीकाम आहे. मऊ दगडावर अगदी खरे वाटावे असे नक्षीकाम कारागिरांनी केले आहे.  कालांतराने हे सर्व दगडासारखे कठोर झाले.  त्यामुळे या स्थापत्यकेलेचा जेवढा येथे अभ्यास केला जातो, तेवढाच येथील विशिष्ट दगडांचाही अभ्यास केला जातो. (Mysterious Hoysaleswara Temple)

मंदिरातील भगवान शंकराची भव्य मूर्ती शिवभक्तांना खिळवून ठेवते. अतिशय भव्यदिव्य असणाऱ्या या शिवमूर्तीवरील मुकूट खास आहे. या मुकुटावर चारही बाजूंनी मानवी चेहरे आहेत. हे चेहरे एवढे पोकळ आहेत की, त्यातून प्रकाशही आरपार जातो. अगदी डोळ्यातूनही उजेड पार होतो. हा स्थापत्यकेलाच चमत्कार मानण्यात येतो.  

होयसलेश्वराचे मंदिर एका उंच व्यासपीठावर बांधले आहे. त्याच्या खाली बारा थर आहेत. हे थर जोडण्यासाठी कुठल्याही अन्य साधनाचा वापर झाला नाही, तर दगडाच्या आत खाचा तयार करण्यात आल्या आहेत. त्याला स्थापत्यशास्त्रात इंटरलॉक सिस्टीम म्हणतात, या इंटरलॉक सिस्टीमवरच सर्व मंदिर आजही भक्कमपणे उभे आहे.   

या मंदिराचे आणखी एक वैशिष्य म्हणजे येथील प्रत्येक मूर्ती एकाच दगडात बनवण्यात आली आहे.  म्हणजेच ती अखंड आहे. मंदिराच्या आत गोलाकार खांब आहेत. त्यांच्या सुशोभिकरणासाठी त्यावर नक्षी आणि काही ठिकाणी वाजंत्रीही आहेत. हे सर्व एवढं बारीक आणि नक्षीदार काम आहे की, सर्व फक्त काही हत्यारांच्या सहाय्याने आणि हातांनी हे काम केले असेल, याबाबत शंकाच वाटते. मशीन शिवाय येवढे सुबक काम कसे केले असेल, असा प्रश्न पडतो.    

मंदिरातील गरुड स्तंभही आकर्षणाचे केंद्र आहे. या गरुड स्तंभावर कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. शिलालेखानुसार गरुड हे राजे आणि राण्यांचे अंगरक्षक होते. राजांच्या मृत्यूनंतर गरुडानेही आपल्या देहाचा त्याग केल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या भिंतींवर विविध प्राणी, पक्षी, देवी-देवता आणि नर्तकांच्या कलाकृती आहेत. या शिवमंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर गणेशाची आठ फूट उंचीची आकर्षक मूर्ती आहे.  या मंदिराचा संबंध अनेकांना तारे आणि दुसऱ्या ग्रहांसोबतही लावण्यात येतो. कारण या होयसलेश्वर मंदिराचा आकार ताऱ्यासारखा आहे.  (Mysterious Hoysaleswara Temple)

मंदिराच्या भिंतींवर क्षेपणास्त्रे, दुर्बिणी, गियरसारखे आकार, पॉलिशिंग टूल्सची चित्रेही आहेत. त्यामुळे या मंदिराची निर्मिती परग्रहावरुन आलेल्या कारागिरांनी केल्याची आख्यायिकाही काहीजण सांगतात.  मंदिरातील अप्रतिम कलाकृती यंत्राच्या सहाय्यानेच केल्याइतक्या रेखीव आहेत. त्यामुळेच मंदिराबाबत अशा आख्यायिका सांगण्यात येतात.  

========

हे देखील वाचा – गोकर्ण मधील धार्मिक महत्व असलेली ‘ही’ प्राचीन मंदिर

========

चौदाव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी या मंदिराची लूट केली. त्याच्या खूणा मंदिरात फिरताना दिसतात. भगवान शंकराच्या नंदीचीही मोठी मूर्तीही त्यापैकीच एक आहे. मात्र येवढ्या आक्रमणानंतरही मंदिराचा ढाचा आजही जसाच्या तसा आहे. आज एवढ्या वर्षानंतरही लाखो शीवभक्त या मंदिराला भेट देतात आणि आपल्या भारतीय स्थापत्यकलेच्या अद्भुत चमत्काराला याची डोळा पाहतात.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.