Home » मिथक …

मिथक …

by Correspondent
0 comment
Share

राधा-कृष्ण … खरंच का एक मिथक? प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या मनामनातलं प्रेमाच्या प्रतिकाचं चैतन्यदायी अस्तित्व, समाजमान्य नातं तेही मंदिरातलं. कसं असतं ना…एरवी जिचा उच्चार केल्यावरही भुवया उंचावतात , त्याच भावनेची मंदिरंही होतात.
एक आदिम प्रेरणा …प्रत्येकाच्या मनाच्या डोहतळाशी… ठाव लागत नाही कुणालाच तिचा.त्या प्रेरणेवर संस्कृतीचं तलम वस्र… त्या वस्राचे रंगीत धागे नात्यागोत्यांचे.डोहतळाची प्रेरणा कधी उचंबळून वर येते…आणि तिची बनते कविता तर कधी गाणं.तर कधी चित्र, नृत्यनाट्य… त्या कवितेत ‘ती’ ‘राधा’ अन् ‘तो’ ‘कृष्ण’.अन् त्या आदिम प्रेरणेची एक मूर्ती… तिची मंदिरी स्थापना.नि त्या आदिम प्रेरणेला…  संस्कृतीचं पुन्हा एक तलम वस्त्र. 

माझंच हे एक जुनं मुक्त चिंतन. ते आठवायचं कारण म्हणजे, नुकताच वाचनात आलेला लेखक  वि.स.खांडेकर यांचा एक लेख.

आध्यात्मिक’ या संकल्पनेविषयी वि. स. खांडेकर ह्यांनी 1956 साली एका लेखात मांडलेलेहे विचार .
 ‘ ‘आध्यात्मिक’ या विशेषणामुळे कवीचा दर्जा वाढतो, असे कित्येकांना वाटत असेल.पाश्चात्त्य विद्या आणि शास्रे यांचा अंमल सुरू होऊन शंभर वर्षे लोटली; मवाळ व जहाल सुधारक या देशात निर्माण होऊन साठ वर्षें उलटली, दोन महायुद्धे आली आणि गेली, भारतीय समाजाच्या दैनंदिन जीवनात, वेषालंकारात आणि आचारविचारात बदल झाले ! पण ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा भाव मात्र या देशात अजूनही खाली आलेला नाही. फार फार तर उपनिषदांच्या काळातील जो शंभराचा आध्यात्मिक शेअर जो मध्यंतरी एकशे दहाला किंवा एकशे विसाला विकला जात असे, त्याचा तो वधारलेला भाव ऐंशी- नव्वदापर्यंत घसरलेला असेल !

प्रसंगी लावणीला लाजविणारा राधाकृष्णांचा गहिरा शृंगार वर्णन करावा आणि मग ते चित्रण शृंगारिक नसून आध्यात्मिक आहे, पुरुषप्रकृतीच्या क्रीडांचे ते वर्णन आहे इत्यादी मखमलाशी त्यावर जरूर करावी अशी आपली बौद्धिक सचोटी आहे. ह्या देशात असला दंभ अजून रुचतो. इतकेच नव्हे, तर तो सर्व प्रकृतीच्या लोकांना चांगला पचतो.
भुकेल्या माणसाच्या दृष्टीने दुपारची भाकरी जितकी खरी.. तितकेच जीवनाचे कोडे सोडविताना ऐहिकतेच्या पलीकडे माणसाला जावे लागते, हे ही खरे. मात्र सर्वसामान्य मनुष्यातील आध्यात्मिकता व्यवहाराच्या धबडग्यात झोपी जाते किंवा बधिर होते.

ज्यांची आपण शतकानुशतके धार्मिक म्हणून डोळे मिटून पूजा करीत आलो होतो, अशा अनेक मूल्यांचे पारमार्थिक आधार गेल्या शे-पाऊणशे वर्षांत ढासळून गेले आहेत….. आध्यात्मिकता हे भारतीय समाजात सर्रास चालणारे शिफारसपत्र आहे.’——–वि.स.खांडेकर.(संकलित)

    खांडेकरांनी वरील विचार मांडून आता उणीपुरी साठ वर्षं उलटली. परंतु त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीमध्ये बदल झालेला काही दिसत नाही.उलट तथाकथित ‘आध्यात्मिक’तेचं पेव मात्र अधिकच फुटलेलं दिसतं. 
खरं म्हणजे, तसा हा विषय संवेदनशील. खांडेकरांच्या वक्तव्यानंतर त्या काळी काय गदारोळ उठला असेल, कुणाकुणाच्या कुठल्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याबद्दल माहीत नाही, पण आजच्या परिस्थितीचा विचार करता कल्पना तर नक्कीच करू शकतो.

राधाकृष्ण या मिथकाच्या वापराच्या बाबतीत हा वादग्रस्त विचार कसा लागू होतो, असा प्रश्न अनेकदा मनात येतो. किती साम्य आहे बघा ह्या इंग्लीश आणि मराठी तत्सम शब्दांत. मिथ्य/मिथ्या म्हणजे खोटे, मिथ्यात्मा म्हणजे देह तर इंग्लीश शब्द मिथ myth म्हणजे दंतकथा, पवित्र कथा, काल्पनिक, खोटी, बनावट इ.  आता ह्या शब्दार्थांच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण आणि त्यांचं प्रेम, अनुबंध, त्या दोन्ही व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने मांडल्या जाणा-या व्यक्त-अव्यक्त भावभावना ह्यांचा विचार कोणत्या प्रकारे होऊ शकेल? तो वरवरचा नक्कीच नसावा

एक मात्र आहे की, एकपत्नीव्रती रामाला पूजणारी भारतीय संस्कृती अनेकपत्नीव्रती कृष्णालाही पूजते (त्यामागील अनेक पुराणकथा, लोककथा, दंतकथा, बोधकथा स्वीकारून). ज्या राधेचं अस्तित्व  मूळ महाभारतामध्येच नाही त्या राधेबरोबरच्या त्याच्या विवाहपूर्व सालस शृंगाराचे सणही साजरे करते.  तसंच हा सगळा भौतिक पसारा ‘आध्यात्मिक’ पासोडीमध्येही बांधून ठेवू शकते. 

किंबहुना भारतीय वाड़्मय आणि भारतीय कला ह्या  ‘रामायणा’पेक्षा ‘महाभारता’ वर जास्त पोसल्या गेल्या असाव्यात का? कारण मानवी वृत्ती-प्रवृत्तींचं अचाट आणि अफाट दर्शन ह्या मध्ये घडतं. रामायणाइतकी ह्यातील आदर्शवादाची चौकट घट्ट नाही. ह्यामध्ये कितीतरी धूसर आणि अस्पष्ट जागा आहेत, व्यक्तिरेखांचे कंगोरे आहेत की, त्यावर हजार वर्षांहून अधिक काळ आपलं साहित्य, कला तग धरून आहेत. राधा-कृष्ण हे त्याचं उत्तम उदाहरण. राधा-भाव हा अध्यात्म, साहित्य, कला अशा अनेक स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारे साकार होताना दिसतो.   
  खांडेकरांचे विचार वस्तुनिष्ठ पातळीवर पटतात, पण मग वाटतं, आपले कवी, लेखक आणि सर्व कलेचे पूजक ह्यांनी मनातील भाव मोकळे करण्यासाठी  ‘राधाकृष्ण’ यांच्याशिवाय कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? अॅरिस्टाॅटल सांगून गेलाय ना, भावनांचं विरेचन (कॅथाॅर्सिस) महत्त्वाचं. ते असं ‘आध्यात्मिक’, साहित्यिक, कलांच्या पातळीवर झालं, तर समाजमनाचं भावनिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल का. (?)

(म्हणजे शेवटी हरदासाची कथा ‘राधाकृष्ण’ मिथकावरच …)

© डाॅ. निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.