Home » औषधी वनस्पतींची हक्काची बाजारपेठ

औषधी वनस्पतींची हक्काची बाजारपेठ

by Team Gajawaja
0 comment
Neemuch district
Share

मध्यप्रदेशमधील एका जिल्ह्यात सध्या शेतीमालावरुन प्रचंड आर्थिक उलाढाल चालू आहे. मध्यप्रदेशमधीलच शेतकरी  नाही तर देशभरातील शेतकरी आणि त्यांच्यासोबत देशातील अनेक औषधी कंपन्यांचे प्रतिनिधी या जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हा जिल्हा म्हणजे, नीमच जिल्हा. मध्यप्रदेशचा हा नीमच जिल्हा म्हणजे, देशातील बाजारपेठांचा राजा म्हटला जातो. त्याचे कारणही खास आहे.  कारण आपल्या देशातील आयुर्वेदीय औषधांचा कच्चा माल याच नीमच बाजारपेठेमधून जातो. (Neemuch district)

यासोबत नीमच जिल्हा हा अनेक वैशिष्टांनी परिपूर्ण आहे. औषधी पिकांच्या विक्रीच्या दृष्टीने नीमच बाजारपेठ ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.  आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यातील व्यापारी येथे औषधी पिके विकण्यासाठी येतात.  सोबत देशभरातील व्यापारी ही औषधी पिके विकत घेण्यासाठीही याच बाजारपेठेत येतात. इसबगोल, अश्वगंधा, कडुलिंबाची पाने, संत्री, डाळींबाची सालांसह अनेक दुर्मिळ फुले या बाजारात उपलब्ध असतात.   

मध्यप्रदेशमधील नीमच हा कृषीप्रधान जिल्हा आहे.  देशातील ७० टक्के कृषी उत्पदनाचे बीज या जिल्ह्यात विकले जाते.  याशिवाय या जिल्ह्याची अनेक वैशिष्टये आहेत, त्यामध्ये मुख्य म्हणजे, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा जन्म १९३९ मध्ये नीमच येथे झाला.  नीमच हे भारतातील नेत्रदानाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.  येथे दरडोई नेत्रदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. आशियातील सर्वात मोठा सरकारी अफू आणि अल्कलॉइड कारखाना नीमच येथे आहे.  कृषी उत्पादनांच्या वितरणासाठी मुख्य असलेला नीमच जिल्हा हा हातमाग विणकाम यासाठीही ओळखला जातो.  कृषी उत्पादनानंतर नीमच जिल्ह्याची आर्थव्यवस्था हातमागावर अवलंबून आहे.  (Neemuch district) 

नीमचची कृषी बाजारपेठ ही आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पादन बाजारपेठ आहे.   जागतिक अहवालानुसार नीमच बाजारपेठ जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून २०११ साली गौरवण्यात आली आहे. नीमचच्या कृषी बाजारपेठेत अनेक प्रकारची धान्य, कडधान्ये, मसाले, तेलबिया आणि औषधी वनस्पतींचा व्यापार होतो.  ज्या औषधी सामग्रीचा वापर आयुर्वेदीक औषधांमध्ये होतो, त्या बारीक सारीक गोष्टीही या नीमच बाजारपेठेत मिळतात.  येथे अगदी कांद्याच्या साली, लसूणाच्या सालींपासून ते डाळींब, संत्री यासारख्या फळ्यांच्या सालीही किलोच्या भावानं उपलब्ध असतात,  आणि त्यांची विक्रीही चढ्या किंमतीत होते.  (Neemuch district) 

नीमचमध्ये गहू, बार्ली, मका, ज्वारी, धणे, मेथी, खसखस, जिरे, यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.  मात्र बहुतांश बाजारपेठेत ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या येथे मिळतात.   काळे जिरे, नायगेला बियाणे, हलीम बियाणे, बडीशेप, तुकमरिया या सर्वांची बियाणे या नीमच बाजारपेठेत उपलब्ध असतात.  नीमच बाजारपेठेत हा सगळा व्यापर वेगवेगळ्या टप्प्यावर लागतो.  त्यासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत.  येथे हरभरा, उडीद, मूग, मसूर, वाटाणे यांच्या बियाणांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.  तशीच सोयाबीन, काळी मोहरी, पिवळी मोहरी, अंबाडीच्या बिया, भुईमूग, तीळ, तारामीरा बियाणे, एरंडेल बियाणे, डोलमी यांचीही होते.  लसूण, कांदा, गवार बियाणे, इसबगोल बियाणांसाठी ही बाजारपेठ ओळखली जाते. 

संपूर्ण जगात अश्वगंधा मुळांचे एकमात्र लिलाव आणि व्यापार केंद्र हे नीमच बाजारपेठेतच आहे.  या अश्वगंधाला येथे क्विंटलच्या दरात मागणी असते.  त्यासोबत नीमचमध्ये ५०० हून अधिक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा व्यापार केला जातो. त्यात प्रामुख्याने अश्वगंधा, काळमेघ, शतावरी, सफेद मुसळी, स्टेव्हियाची पाने, गिलोय, बाभूळ या औषधींचा समावेश आहे.  गुलाबाच्या पाकळ्या, कडूलिंबाची पानं, तुळशीची पाने, तुळशीच्या बिया यांच्या राशी या बाजारात लागलेल्या असतात.  त्यांचीही विक्री येथे क्विंटल्याच दरानं होते.   याशिवाय अनेक प्रकारची सुकवलेली फुले या बाजारात विक्रीला येतात.   त्याच्यातील औषधी मुल्यानुसार त्यांची किंमत ठरवली जाते.  यासाठी  अनेक राज्यातील औषधी पीक उत्पादक आणि व्यापारी येथे तळ ठोकून असतात.  वैद्यनाथ, झंडू, सांडू, डाबर पासून पतंजली, सारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधीही या नीमच बाजारपेठेत येतात. (Neemuch district)  

=============

हे देखील वाचा : पिंक टॅक्स म्हणजे नक्की काय? भारतातील महिलांवर असा पडतोय प्रभाव

=============

अलिकडील काही वर्षात नीमच जिल्ह्यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे. अश्वगंधा, इसबगोल, असलिया ही पिके पाणी कमी असेल तेथेही होतात.  नीमचच्या अनेक भागात ओसाड जमिन आहे.  आता अशाच ओसाड जमिनीवर शेतकरी अश्वगंधाची लागवड करत आहेत.  त्यातून त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे.  याशिवाय अश्वगंधा, तुळशी, चिरैता, सफेद मुसळी या औषधी पिकांवर २० ते ३० टक्के सरकारी अनुदान मिळत असल्यानं शेतक-यांना अधिक फायदा होत आहे.  याभागत असलेल्या औषध निर्माण कंपन्याही शेतक-यांना वनषौधींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत.  

सई बने 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.