Home » जय कन्हैयालाल की

जय कन्हैयालाल की

by Team Gajawaja
0 comment
Mathura Vrindavan
Share

यावर्षी जन्माष्टमी देशभरात २६ आणि २७ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरा-वृंदावनमध्ये जन्माष्टमीसाठी आत्तापासूनच अनेक कार्यक्रम सुरु झाले आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीचा कोपरा न कोपरा सजवण्यात आला आहे. यावेळी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे उद्घाटन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार आहेत. ब्रजभूमी येथे ५,२५१ व्या श्री कृष्ण जन्मोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी करतील. सोबतच ५८३ कोटी रुपयांच्या १३७ प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून यात बरसाना येथील रोपवेचाही समावेश आहे. यंदा ७५ वर्षांनंतर जन्माष्टमीला द्वापर युगाचा सौभाग्य योग तयार होत असल्यामुळे मथुरा बरसाणा भागात उत्सवाचे वातावरण आहे. (Mathura Vrindavan)

भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त ब्रजभूमी सजवण्यात आली आहे. श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम सुरु आहेत. आठवडाभर चालणा-या या उत्सवामध्ये ब्रजमधील पाच मोठे टप्पे, १९ छोटे टप्पे आणि २० प्रमुख मार्गांवर सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. यादरम्यान कन्हैया मित्तल आपल्या सुरांची जादू पसरवणार आहे. कथ्थक नृत्यांगना डॉ. यास्मिन यांचे आणि खासदार हेमा मालिनी यांचे नृत्य उपस्थितांना पहाता येणार आहे. खासदार हेमा मालिनी यशोदा कृष्ण नृत्य नाटक सादर करणार आहेत. याशिवाय जन्माष्टमीनिमित्त मथुरा आणि वृंदावनमध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Mathura Vrindavan)

२६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा भव्य सोहळा होणार आहे. या दिवशी ४ शुभ योगांचा योगायोग आल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आनंदीत आहेत. यावेळी भगवान श्रीकृष्णाची ५,२५१ वी जयंती विशेष आहे. या दिवशी, ठाकूरजी पद्मकांती पुष्प बंगल्यात बसतील आणि सोम-चंद्रिकेचा पोशाख धारण करणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आत्तापासूनच ब्रजभूमीमध्ये हजारो भाविक दाखल झाले आहेत. मथुरा येथे जन्माष्टमीनिमित्त मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मंदिर परिसरात कान्हाजींचा पंचामृत अभिषेक होणार आहे. यानंतर भगवान श्रीकृष्णाची बाळकृष्णाच्या रुपात विधिवत पूजा करण्यात येणार आहे. (Mathura Vrindavan)

जन्माष्टमीच्या दिवशी भाविकांची संख्या पाहता यावेळी कृष्ण जन्मस्थान मंदिर २६ ऑगस्ट रोजी २० तास खुले राहणार असल्याचे श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने जाहीर केले आहे. गुरुवारपर्यंत मंदिर अशाच वेळेत भाविकांसाठी खुले रहाणार आहे. २६ रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून शहनाई आणि ढोल-ताशा वादनासह भगवान शंकराची मंगला आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता परमेश्वराचा पंचामृत अभिषेक होईल. रात्री ११ वाजता श्री गणेश-नवग्रहाच्या पूजनाने जन्माभिषेकाचा मुख्य कार्यक्रम सुरू होईल. भगवान जन्माची महाआरती रात्री १२.१० पर्यंत सुरू राहणार आहे.
जन्माष्टमीच्या संध्याकाळी श्री कृष्ण लीला महोत्सव समितीतर्फे भरतपूर गेट येथून पारंपारिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी भगवान श्रीकृष्णासाठी विशिष्ठ पोशाख तयार करण्यात आले आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली असून सर्वत्र कृष्णनामाचा जप सुरु आहे. (Mathura Vrindavan)

======

हे देखील वाचा : कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त

======

गेल्या आठवडयापासूनच मथुरा आणि वृंदावन येथे हजारोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. या सर्व भाविकांना कुठलिही अडचण येऊ नये, म्हणून मंदिर ट्रस्टतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी विशेष आरोग्य पथकेही तयार कऱण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, हजारोंच्या संख्येने येणा-या भाविकांना गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून सोमवारी श्री कृष्णाच्या जन्मस्थानी भाविकांना शहराच्या उत्तरेकडील दरवाजातून प्रवेश देण्यात येणार आहे.
२७ ऑगस्ट रोजी वृंदावनमध्ये जन्माष्टमी साजरी होणार आहे. या सोहळ्याला कृष्णाजी लीलास्थळी म्हणतात. या दिवशी जगप्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात मंगला आरती होणार आहे. बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीच्या दिवशीच मंगला आरती केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक होईल. बांके बिहारी जींचा बाला महाभिषेक जन्माष्टमीच्या रात्री १२ वाजता होणार हा सोहळा सुमारे २ तास चालतो. ठाकूरजींचा बाल महाभिषेक देखील वर्षातून एकदाच होतो. त्यामुळेच हा सोहळा पाहण्यासाठी भक्त मोठी प्रतीक्षा करतात. यानंतर कान्हाजींना पितांबरी पोशाख आणि चिरोंजी सुक्या मेव्याची पंजिरी अर्पण केली जाते. हा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होते. (Mathura Vrindavan)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.