Home » खाष्ट सासू… ललिता पवार!

खाष्ट सासू… ललिता पवार!

by Correspondent
0 comment
Lalita Pawar | K Facts
Share

ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी झाला. त्यांचे मूळ नाव अंबा लक्ष्मणराव सगुण असे होते. येवले हे गाव पैठणीसाठी प्रसिद्ध आहे हे सर्वांना माहीत आहेच. ललिता पवार यांचे वडील पैठणी विणणाऱ्या व्यवसायात होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या मुलीला अभिनयाची आवड आहे म्हणून ते तिला घेऊन पुण्याला आले. तो काळ मुकचित्रपटांचा होता. अंबा दिसण्यात सुंदर होती.

तिला पहिला चित्रपट मिळाला त्याचे नाव होते ‘पतितोद्धार’ त्या चित्रपटाच्या वेळी तिचे अंबा नाव बदलून ललिता ठेवण्यात आले. १९२७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. पुढे बोलपट आल्यावर स्वतःलाच गाणे गावे लागे त्यासाठी ललिताबाई गाणे शिकल्या. त्यानंतर त्यांना बरेच चित्रपट मिळाले. त्यात नेताजी पालकर, गोरा कुंभार, स्वामींनी, अंबाबाई असे अनेक चित्रपट मिळाले. चित्रपट मिळतच होते परंतु १९४२ मध्ये एक घटना घडली. ‘जंग- ए -आजादी’ चे शुटींग चालू होते, त्या शुटींगच्या वेळी अभिनेते भगवान दादा यांचा एक ठोसा ललिताबाईना बसला आणि त्या खाली पडल्या आणि कानातून रक्त आले, डॉक्टरांची काहीतरी औषध देण्यात चूक झाली आणि त्यांची डावी बाजू पॅरलाईज झाली.

Lalita Pawar

जवळ जवळ ३ वर्षे त्या चित्रपट क्षेत्रापासून दूर राहिल्या, त्या परत चित्रपटात आल्या खऱ्या पण त्यांना नायिकेच्या भूमिका मिळत नव्हत्या कारण त्या आजारपणात त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी कधी खाष्ट सासू तर कधी प्रेमळ आजी अशा भूमिका करण्यास सुरुवात केली. हिंदी  मराठी, गुजराथी अशा एकूण सुमारे ७०० चित्रपटातून भूमिका केल्या. त्याचे अनेक चित्रपट गाजले त्यात जिस देश मे गंगा बहती है, परवरिश, श्री ४२०, संगम, प्रेमदीदी, आनंद अश्या अनेक चित्रपटांचा समावेशआहे.

१९५९ मध्ये अनाडी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट स्त्री या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर १९६१ साली नाटक संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. ललिता पवार यांचा मृत्यू २४ फेब्रुवारी १९९७ रोजी त्यांच्या रहात्या घरी पुण्यात झाला. तीन दिवस कळले नाही की त्यांचे निधन झाले, शेवटी घराचा दरवाजा फोडण्यात आला तेव्हा समजले. आजही ललिता पवार म्हटले की खाष्ट सासू, आनंद चित्रपटामधील नर्स किंवा रामायण सिरीयलमधील मंथरा आठवते. एक आठवण सांगतो. मी त्यांच्या मुलाखती अनेक वेळा प्रत्यक्ष ऐकल्या आहेत. एकदा त्यांची स्वाक्षरी मागितली तर त्यांनी स्वाक्षरीचा स्टिकर मला आणि अनेकांना दिला, आजही तो स्टिकर ३० वर्षानंतर माझ्या संग्रही आहे.

सतीश चाफेकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.