‘मेलेल्या माणसांच्या ढीगांवर नाचायची इच्छा कोण मनात बाळगेल? मग मुंबईवरचे आभाळ का साक्षी असते, सतत घडणा-या अशा हत्याकांडांचे?’
हा सवाल ‘एक अश्क आलूद अपील’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या लेखात मंटोने केलाय.
मुंबई या बेटाची (की बेटीची) कुंडलीच काहीशी विचित्र आहे बहुतेक. स्वस्थता अशी नाहीच तिच्या जिवाला. अगदी वर्षानुवर्षं. तिची स्वतःची, मूळ ओळख राहू नये, ती कायम अस्थिरच राहावी अशीच तिच्या कुंडलीतील ग्रहता-यांची योजना दिसते.
आधी मौर्य नंतर मुस्लीम अशा राजवटींच्या अधिपत्याखाली जगणारी मुंबईची ही सात बेटं नि तिचे मासेमारी करून जगणारे बिचारे साधे स्थानिक. पण मध्ययुगात पोर्तुगिजांचं हिच्याकडे लक्ष गेलं आणि ही त्यांच्या ताब्यात गेली. सातासमुद्रापलीकडचा कुठला कोण पोर्तुगीज राजा, त्यानं परस्पर आपल्या ब्रिटीश जावयाला ही मुंबई भेट दिली आणि ब्रिटीश राजघराण्याच्या नजरेत ही सुंदरी भरली. पुढे या राजघराण्याने ती भाडेतत्त्वावर ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकली आणि जवळजवळ साडेतीनशे वर्षं ही मुंबईची बेटं ब्रिटिशांची बटकी बनून राहिली.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बिचारीचा 13 वर्षं वनवास चालूच होता. स्वातंत्र्योत्तर भारतातही तिच्याकरता वाद पेटला आणि 105 जणांचे बळी जाऊन शेवटी ती महाराष्ट्राची राजधानी (खरं तर राणीच) आणि भारताचं आर्थिक केंद्र बनली. पण तरीही दास्यत्व, अत्याचार संपले का? उलट शतपटीने वाढले. सर्वांनाच आपलीशी करणारी, मानवनिर्मित संकटांची (नि उकिरड्याचीही) खाण बनलेली ही मुंबई, ‘मी नक्की कुणाची, माझ्यावर सगळे अत्याचार का?’ हा सवाल आजही करतेच आहे.
मुंबई नि मुंबईकर (सध्याचे मिक्स) हे दोघंही इतर क्षेत्रांसारखे, एकूण मराठी साहित्यव्यवहारातही टीकेचे धनी झालेले दिसतात. ‘तुम्ही मुंबईचे लेखक … म्हणजे तुम्हाला खरं जगणं कळतंच नाही’, (ते कळतं नि उतरतं फक्त मुंबईबाहेरच्या माणसाच्या लेखनात) असे औपरोधिक सूर ती बिचारी सतत ऐकतच असते. तर ते असो.
(त्याविषयी एखादा स्वतंत्र लेख)
आजच्या महानगरीचं स्वरूप या इलाख्याला मिळण्यापूर्वी, स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम टप्प्यात, प्रमुख केंद्र म्हणून भूमिका बजावतानाही मुंबईनं याचि देही याचि डोळा जे भयानक वास्तव अनुभवलं, ते तत्कालीन अनेक लेखक-कवींच्या, कलाकारांच्या कलाकृतींमध्ये उतरलेलं दिसतं. मानवी क्रौर्य लेखणीला जे लिहिण्यास उद्युक्त करतं ते आनंददायी नसलं तरी संवेदना जागृत करणारं असतं.
मंटोचं मुंबईतील वास्तव्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणि पर्यायाने लेखणीला बरंच काही देऊन गेलं. तो मुंबईत राहात असतानाच हिन्दुस्थानातील आणि अर्थातच मुंबईतील सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावहारिक अशा सगळ्याच आघाड्यांवर अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या उलथापालथी झाल्या. भोवतालाचे पडसाद संवेदनशील लेखणीतून उमटले नाही तरच नवल.
हिंदू-मुस्लीम वाद हा इथल्या जमिनीत, हवेत, पाण्यात आणि इथे राहणा-यांच्या रक्तातच मुरला किंवा मुरवला असावा. आपापसातील घट्ट ताणलेली जातीयता हे एक आंतरवलय आणि जहाल धार्मिक दुरभिमान हे बाहेरचं वलय अशा परिस्थितीत असलेला देशातील आणि मुंबईतीलही भारतीय समाज हा राजकारण्यांच्या हिडीस आणि स्वार्थी आपमतलबी खेळांचा वर्षानुवर्षं बळी ठरलेला दिसतो.
लेखक-कवी, विचारवंत इ. जेव्हा आपल्या लेखनातून याविषयी लिहितात, तेव्हा त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या विचारसरणीचा पगडा असू शकतो. इतरांकडून अमक्यातमक्या विचारसरणीचा लेखक म्हणून शिक्केही मारले जातात. (जे संतुलित लिहितात किंवा जे तसं लिहिलंय असं भासवतात, अशांची बोटचेप्या धोरणाचे म्हणूनही संभावना होते. थोडक्यात, कसंही लिहा, कुठला ना कुठला शिक्का बसणारच. असो.) मंटोने अशा शिक्क्यांचा विचार न करता आपल्या लेखणीतून या धार्मिक राजकारणावर सरळ हल्ला चढवला. त्यामुळे त्याच्या लेखणीवरही काही विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचे शिक्के मारले गेले.
मंटोची लेखणी धार्मिक अतिरेकाचा निषेध करताना दिसते. स्वतःच्याच धर्मबांधवांच्या अतिजहाल धर्मनिष्ठेच्या विरोधात तो जेव्हा लिहितो, तेव्हा तत्कालीन मुंबईमधील हिंदु-मुस्लीम वाद, राजकारण, राजकारणी यांच्यावर कधी तिरकस तर कधी समोरून हल्ला करतो.
‘या लोकांना भारताला परत एकदा रानटी अवस्थेत घेऊन जायचे आहे. त्यांना भय आणि शिरकाण यातून असुरक्षितता पसरवायची आहे. म्हणजे मग त्यांचे स्वार्थ शाबूत राहतील. मानवी शरीरे मांस म्हणून बाजारात विकली जातात तेव्हा त्यांना आनंद होतो. त्यांना भारत स्वतंत्र व्हायला नको आहे. ते गद्दार आहेत. आणि त्यांचा वेळ ते मानवजातीशी गद्दारी करण्यातच घालवतात.’ ( लेख – मुंबईतील अपराधी माणसे)
मुंबईतील समाजविघातक अशा छुप्या संस्था, त्यांचे तथाकथित धार्मिक कार्यकर्ते यांच्याबद्दल मंटो असे जळजळीत उद्गार काढतो. त्याचे विचार, त्याची लेखणी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करते.
हिंदू- मुस्लीम दंग्यांची नित्याची कारणं म्हणजे मंदिर आणि मशीद असे तो बेधडकपणे लिहितो. या एकाच कारणाकरता अनेक माणसांचा बळी जाताना, त्याकरता माणूस किती पाशवीपणाच्या पातळीवर उतरला हे बघताना भावना मनातच दाबून ठेवल्यावर, शेवटी लेखणी हाती घेतली असं तो म्हणतो.
‘मुंबईच्या भल्या लोकांसाठी आवाहन’ असं लिहून, तो तत्कालीन मुस्लीम नेते हाफिझ अली बहादुर खान यांच्या उद्गारांना सापाचे फूत्कार असं संबोधतो. अशा प्रकारच्या सडेतोड लेखनामुळे त्याचेच धार्मिक बांधव त्याला मारहाण करण्याकरता आले, असा उल्लेख तो करतो.
मुंबईतील गढूळलेल्या वातावरणाचे वर्णन करताना मंटो या व्यक्तिमत्त्वामधील एक माणूस आणि एक लेखक वाचकांसमोर येतो. मुंबईतील जमावाच्या हिंसाचाराचं निरीक्षण त्याच्या लेखनातून डोळसपणे उमटतं ‘दंगलीतील मुंबई, मूळ लेख ‘बातें’मधून. 1942 च्या सुमारास गांधीजींनी चले जाव आंदोलन जोमाने सुरू केल्यावर मुंबई या आंदोलनाचं केंद्रस्थान बनली आणि पर्यायाने हिंदू-मुस्लीम जमावांच्या दंगलीचीही. गांधीजींविषयी या लेखात मंटो लिहितो,
‘कुडमुडे ज्योतिषी आणि राजकारणी यांना मी एकाच पारड्यात घालतो. गांधीजींना चित्रपटाची जेवढी माहिती असेल तेवढाच रस मला राजकारणात आहे. गांधीजी चित्रपट बघत नाहीत आणि मी वर्तमानपत्रे वाचत नाही. असे करून आम्ही दोघेही चूक करतो. गांधीजींना खरे तर चित्रपट बघून फायदा होईल आणि मी वर्तमानपत्रे वाचायलाच पाहिजेत.’
( ‘बातें’, मंटो के माज़मीन’)
वरवर पाहता तटस्थ आणि विनोदी वाटणा-या या वाक्यांमधला उपरोध मंटोकरता अनेक टीकाकार निर्माण करून गेला असेल. मंटोच्या लेखणीतील व्यंग्यात्मक शैली मात्र विचार करायला लावते हे खरं.
मंदिर आणि मशीद या दोन धार्मिक वस्तू त्याच्यालेखी केवळ दगड आहेत तसंच गाय आणि डुक्कर हे त्यासाठी केवळ मांस आहेत, असं (कालातीत खळबळजनक) विधान तो करतो. इतकंच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन सद्यःस्थितीत मुस्लीम लीग म्हणजे मशीद बनली असून, काँग्रेस हे मंदिर असल्याचं वर्तमानपत्रातून कळल्याचं तो सांगतो. आता वर्तमानपत्रं का वाचू लागलो, तर मुंबईतल्या दंगलीमुळे तीन दिवस घरातच बसावं लागलं म्हणून.( वर्तमान परिस्थितीशी या उल्लेखाची नकळत माझ्याकडून तुलना झाली घरात बसलोय म्हणून मग अवांतर वाचन.) मुंबईतही लोकांनी आपापल्यापुरतं हिंदुस्तान, पाकिस्तान कसं आखून घेतलं याबद्दल उपहासात्मक अशी एक गोष्ट तो सांगतो.
माहीमकडे जाणा-या रस्त्याच्या शेवटी एक मोठी मशीद असून, दंगा पेटल्यावर तरुणांनी तिथे रस्त्यावरची झाडं उपटून आडवी टाकली. मग धातूची मोठी वस्तू घेऊन जाणा-या हिंदू मुलांना या मुस्लिमांनी अडवून, एक रेघ ओढून, इथून पुढे पाकिस्तान सुरू होत असल्याचं सांगितलं. मग हिंदू मुलांनी हातातील खांब उचलून दुसरीकडे नेला. मग एकाही ‘काफिर’ला ‘पाकिस्ताना’त प्रवेश करायची हिंमत झाली नाही असं म्हटलं गेलं. मुंबईचं मुस्लीम हृदय म्हणजे भेंडीबाजार, तिथले मुस्लीम चहा पीत, सुस्कारे सोडत जिनासाहेबांच्या आज्ञेची वाट बघत आहेत, असं तो लिहितो.
मंटोनं लिहिलेली ही गोष्ट किती प्रतीकात्मक आहे, तिचा उद्देश कोणता असावा, हे सुज्ञांस उलगडून सांगणे न लगे.
मंटोसारख्याच अनेकानेक लेखक-कवींच्या लेखणीने स्वातंत्र्यलढा आणि फाळणी या काळातील अनुभवांवर, निरीक्षणांवर आपल्या ललितकृतींमधून भाष्यं केली. जी आजही चिंतनीय आणि चिंतीतही करणारी आहेत. इथे गुलज़ार साहेबांच्या ‘रावी पार’ या फाळणीवर आधारित कथेतील एका संवादाचा उल्लेख करावासा वाटतो,
“शरनार्थी? वह क्या होता है?”
“रेफ्यू-जी”
“यह लफ्ज़ पहले तो कभी नही सुने थे”
(—- ‘ रावी पार’, गुलज़ार)
तर मंटो लिहितो, गांधीजींना तुरुंगात टाकल्यामुळे मुंबई खवळली, जमावावर पोलिसांनी लाठीहल्ला करून गोळीबार केला, सैन्य बोलवावं लागलं नि मुंबईच्या रस्त्यावर रणगाडेही उतरले. भोवतालचं भीषण वास्तव जेव्हा एखादा लेखक असं सहजगत्या आपल्या लेखनात आणतो आणि ते आजच्या काळाच्या कसोटीवरही तसंच असल्याचं जाणवतं, तेव्हा वाचकाला नैराश्य येतंच.
काळ बदलतो म्हणजे नक्की काय होतं? काय होणं अपेक्षित असतं? माणूस आणि त्याच्या आदिम प्रेरणा यांचा विघातक वापर, कशा प्रकारे जमावाच्या मानसशास्त्राच्या आधाराने केला गेला, केला जातो यांचं दर्शन या लेखणीतून होतं.
इतिहासाची समृद्ध अडगळ उपसणं नव्हे तर एका लेखणीचा वेध घेताना आपला आजचाही भोवताल तपासणं आणि भविष्याबद्दल सजग होणं कधीकधी गरजेचं ठरतं.
मंटोच्या लेखणीचा, त्यानं अनुभवलेल्या, लिहिलेल्या मुंबईचा वेध घेणं…अभी बाकी है..
(क्रमशः)
(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ –‘मी का लिहितो?’ – संपादन श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 2016)
– © डाॅ निर्मोही फडके.