महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत; पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक ८ मार्च ते १२ मार्च या कालावधीत महिला कला महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. पाच दिवसीय कलामहोत्सवात विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होणार आहे.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मार्फत दरवर्षी ८ मार्चला महिला कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे या महोत्सवादरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून एकूण २४ कार्यक्रम सादर होणार आहेत.
कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या ‘सर, प्रेमाचं काय करायचं’ या नाटकांचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. सर आणि त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या भवती फिरणार कथानक असलेल्या या नाटकात मकरंद देशपांडे, आकांशा गाडे, निनाद लिमये, माधुरी गवळी आणि अजय कांबळे यांची प्रमुख भूमिका आहे.
या कला महोत्सवाची सुरुवात मीना नाईक यांच्या पॉक्सो कायद्यावर आधारित ‘अभया’ एकपात्री नाटकाच्या प्रयोगापासून सुरुवात झाली. पोक्सो या बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील कायद्याबाबत जनजागृती करणार हे नाटक असून या प्रयोगाला निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि अभिनेता सचिन खेडेकर यांची विशेष उपस्थिती होती.
शिल्पी सैनी यांच्या कथ्थक नृत्याचा ‘नृत्यार्धना’ हा नृत्याविष्कार अभयानंतर सादर झाला तर कलांगणात शाहीर मिराताई उमप, संध्या सखी, विमल माळी यांनी ‘जागर महिला लोककलेचा’ या भारुडावर आधारित कार्यक्रमातुन लोक कलेतील स्त्री साहित्याविषयी जनजागृती केली. पहिला दिवस असला तरी या कला महोत्सवात महिला प्रेक्षकांची संख्या ही उल्लेखनीय होती.
====
हे देखील वाचा: Women’s Day special – वुमेन ऑफ द ईयर…जहरा जोया (zahra joya)
====
====
हे देखील वाचा: महिला दिन विशेष ‘अनन्या’चे पोस्टर रिलीज, हृता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
====
तसेच सर प्रेमाचं काय करायचं या नाटकाला प्रेक्षकांनी लावलेली हजेरी ही विशेष उल्लेखनीय होती. नाटकाच्या या महिला दिन विशेष प्रयोगाला प्रेक्षकांनी उभं राहून ५ मिनिट टाळ्या वाजवून कलाकारांना दाद दिली. शासनाच्या १०० टक्के प्रेक्षक उपस्थितीच्या निर्णयाच स्वागत मकरंद देशपांडे यांनी केलेच पण त्याच बरोबर ‘महिला दिन’ निमित्ताने नाटकाचा खास प्रयोग सादर करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे विशेष आभार मानले.
“महिला दिन निमित्ताने आमच्या नाटकाचा प्रयोग करण्याची संधी दिल्याबद्दल आणि एक अनोखं व्यासपीठ आम्हला दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाचे खरच आभार, महिला कला महोत्सवातून समाजाला ‘स्त्री’ साहित्याकडे ओढ निर्माण होऊ शकते तसेच त्यातून अनेक स्त्रियांच्या मनात कला विभागात आपलं पाऊल ठेवण्यास विश्वास निर्माण होईल ही खात्री आहे. मंगळवारचा प्रयोग आणि तो ही तुडुंब गर्दीत हे अविस्मरणीय आहे. नाटकाला लागणारी दाद देणारा प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी असे अनेक कला महोत्सव होवो” अशा शब्दात मकरंद देशपांडे यांनी आपले या कला महोत्सवा विषयी मनोगत व्यक्त केले आहे.