उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशभरातील साधू-संत महाकुंभ आखाड्यात पेशवाईनं दाखल झाले आहेत. आता या सर्व साधू संतांना उत्सुकता आहे ती 13 जानेवारीची. या दिवसापासून महाकुंभमेळा सुरु होणार आहे. महाकुंभमेळ्याची सुरुवात ब्रह्ममुहूर्तापासून होणार असून त्रिवेणी संगमावर लाखो साधू शाही स्नान करणार आहेत. मात्र यामध्ये कुठला आखाडा पहिल्या नंबरवर येणार याची उत्सुकता असते. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्यासह नागा साधूंचे 13 आखाडे सामिल होतात. या सर्व आखाड्यातील नागा साधूंना एकत्र भेटण्याचे ठिकाण म्हणूनही महाकुंभचा उल्लेख केला जातो. असे असले तरी शाही स्नान कुठला आखाडा पहिला करणार याचे काही नियम असतात. सर्व आखाड्यांची मिळून आखाडा परिषद असते. (Mahakumbha)
या आखाडा परिषदेमध्ये सर्व आखाड्याचे दोन प्रतिनिधी असतात. या सर्वातून आखाडा परिषदेच्या प्रमुखाची निवड करण्यात येते. या आखाड्यांचीही एक नियमावली असून आखाडा परिषदेचे प्रमुख या सर्व नियमांचे पालन योग्यपणे होत आहे की नाही, याची पाहणी करतात. याच आखाडा परिषदेच्या नियमानुसार महाकुंभमेळ्यामध्ये कुठला आखाडा कधी स्नान करेल याचे नियोजन केले जाते. शाही स्नानासाठी एखाद्याला आखाड्याला ठराविक वेळ दिली असेल तर त्यावेळी दुस-या कुठल्याही आखाड्याचे साधू संत स्नानासाठी जात नाहीत. लाखोंच्या संख्येनं आखाड्याचे साधू आणि नागा संत स्नान करत असतांना सर्वसामान्यांनाही त्रिवेणी घाट बंद करण्यात येतात. हा शाही स्नानाचा सोहळा बघण्यासाठी लाखो भाविक उपस्थित असतात. या साधू संतांचा हा आनंदोत्सव बघण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे भाविक आलेले असतात. (Latest Updates)
यावेळीही या सर्व शाही स्नानांचे नियोजन झाले असून पहिल्या शाही स्नानाचा मान पंचायती महानिर्वाणी आखाड्याला मिळणार आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान चार शाही स्नानांचे मुहूर्त असून यावेळी तिर्थराज प्रयागराजमध्ये करोडो भाविक येणार आहेत. प्रयागराज येथे 12 वर्षांनंतर होणा-या महाकुंभासाठी संपूर्ण शहर तयार झाले आहे. गंगा आणि यमुनेच्या संगमाच्या दोन्ही तीरांवर तंबूंचे शहर बसवण्यात आले आहे. या सर्व शहराला नव्या जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे. हजारो पोलीस आणि प्रशासन अधिकारी या महाकुंभच्या यशस्वीतेसाठी काम करीत आहेत. या महाकुंभाची सुरुवात 13 जानेवारी पासून होणार असून यावेळी पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे लाखो साधू शाही स्नान करणार आहेत. हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येणार असून महाकुंभ परिसरातील सर्व हॉटेल आणि तंबूही या दरम्यान हाऊसफुल झाले आहेत. (Mahakumbha)
महाकुंभमेळ्यात सर्वाच्या नजरा या नागा साधूंवर असतात. लाखोंच्या संख्येनं नागा साधू महाकुंभमेळ्यात दिसतात. आणि महाकुंभ संपला की हे साधू आपल्या तपस्येच्या ठिकाणी निघून जातात. नागा साधू आपल्या आखाड्यासह शाही स्नानाला जातात, तो सोहळा बघण्यासारखा असतो. मात्र याच आखाड्यांमध्ये पहिल्यांदा शाही स्नान कोण करणार याचीही एक नियमावली आहे. या नियमावलीचे 14 आखाडे अत्यंत काटेकोरपणे पालन करतात. 12 वर्षांनी येणा-या या महाकुंभामध्ये प्रथम स्नान कोण करणार याबाबत एकदा या आखाड्यांमध्ये मोठा वाद झाला होता. यात अनेकांचा मृत्यूही झाला. त्यानंतर आखाड्यांच्या स्नानांचा क्रम ठरवण्यात आला. त्यानुसार प्रयागराज येथे महाकुंभ असल्यास त्यात पहिल्या शाही स्नानाचा मान पंचायती महानिर्वाण आखाड्याला मिळतो. हरिद्वार (Haridwar) येथे जेव्हा महाकुंभमेळा होतो, तेव्हा निरंजनी आखाड्याला पहिल्या शाही स्नानाचा मान अशतो. (Latest Updates)
====================
हे देखील वाचा :
Maha Khumbh Mela : महाकुंभमेळ्याला हायटेक सुरक्षेचे कवच
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
उज्जैन आणि नाशिकमध्ये जेव्हा महाकुंभ होतो, तेव्हा जुना आखाड्याचे साधू पहिल्यांदा शाही स्नान करतात. कुंभकाळात साधूंच्या आखाड्यांमध्ये स्नान करणे, याला विशेष महत्त्व आहे. प्रयागराज महाकुंभात किन्नर आखाड्यासह एकूण 14 आखाडे सहभागी झाले आहेत. चार शाही स्नानांच्या दिवशी ठराविक वेळ या सर्व आखाड्यांना देण्यात आली आहे. त्यावेळी अन्य कुठल्याही आखाड्याचे साधू त्रिवेणी संगमावर दिसत नाहीत. शाही स्नानाच्यावेळी प्रथम आखाड्याचे महंत किंवा सर्वोच्च संत पवित्र नदीत प्रवेश करतात. यावेळी आखाड्याचे दैवतही सोबत असते. त्यांनाही पवित्र स्नान घालण्यात येते. यानंतर आखाड्याचे लाखोंच्या संख्येनं असलेले नागा साधू नदिमध्ये स्नानासाठी उतरतात. या सर्व आखाड्यांच्या साधूंचे स्नान झाल्यावरच अन्य भाविकांना संगम स्थळावर स्नान करण्याची परवानगी देण्यात येते. (Mahakumbha)
सई बने