Home » ‘हवाई गार्डन’ थिम असलेल्या टर्मिनलला पसंती

‘हवाई गार्डन’ थिम असलेल्या टर्मिनलला पसंती

by Team Gajawaja
0 comment
International Airport Terminal
Share

गेला आठवड्यापासून सोशल मिडियावर बेंगळुरुच्या केम्पेगौडा आंतराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल(International Airport Terminal) 2 चे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.  हवाई गार्डन ही थिम असलेल्या या टर्मिनलच्या फोटोंना पसंती मिळत आहे. 5,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने उभारलेल्या या टर्मिनल सोबतच केम्पेगौडा यांचा 108 फूट उंच पुतळाही वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या पुतळ्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.  

हॅंगिग गार्डन अशी थीम असलेल्या बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल(International Airport Terminal) 2 टर्मिनल ची चर्चा सर्वदूर होत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले.   बेंगळुरु शहाराची रचना करण्यात मोठा वाटा असलेल्या नादप्रभू हिरिया केम्पेगौडा, म्हणजेच केम्पेगौडा यांचा पुतळा या टर्मिनलच्या सुरुवातीला आहे.  या 108 फुटी पुतळ्याला प्रसिद्ध शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त राम वानजी सुतार यांनी तयार केले आहे. या प्रकल्पामध्ये केम्पेगौडा यांना समर्पित 23 एकर क्षेत्रफळावर बांधलेले हेरिटेज थीम पार्क सुद्धा आकर्षक ठरले आहे.  

संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करत हा सर्व प्रकल्प उभा करण्यात आला आहे.  बेंगळुरू हे बागांचे शहर म्हणून ओळखले जाते.  यापुढे या शहराची ओळख निर्माण करण्यासाठीच विमानतळाचे आधुनिक पण पर्यावरणसाधक असे सुशोभिकरण करण्यात आले आहे.  टर्मिनल-2 साठी सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.  यासोबत बेंगळुरूचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंच पुतळ्याच्या परिसराचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे.  शहराच्या संस्थापकाचा हा पहिला आणि सर्वात उंच पुतळा कांस्य धातुचा आहे. बंगळुरूच्या विकासात केम्पेगौडा यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ उभारलेला हा पुतळा आता स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्धीचा पुतळा म्हणून ओळखण्यात येणार आहे.  सध्या संपूर्ण देशभर या प्रकल्पाची चर्चा आहे. T2 च्या उद्घाटनामुळे, प्रवाशांची क्षमता तसेच चेक-इन आणि इमिग्रेशनची क्षमताही दुप्पट होणार आहे. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाची गणना दिल्ली आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांसह(International Airport Terminal) देशातील सर्वोत्तम विमानतळांमध्ये केली जाते.  देशातील सर्वात मोठे विमानतळ म्हणूनही हे विमानतळ ओळखले जाते.  आता याच विमानतळाचा परिसर एक मोठी मैदानी बाग, तलाव, छतावरील सौर पॅनेल, कृत्रिम धबधबे, उंच पायवाटा आणि लकटत असलेल्या झाडांनी सजवण्यात आला आहे.  

एकूण 2,55,645 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या T-2 मध्ये पहिल्या टप्प्यात 22 कॉन्टॅक्ट गेट्स, 15 बस गेट्स, 95 चेक-इन सोल्यूशन्स आणि 17 सिक्युरिटी चेक लेन असतील.  नऊ कस्टम हँड बॅगेज स्क्रीनिंग होतील. गेट लाउंजची आसनक्षमता 5932 असेल.  बेंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन टर्मिनल  आता सध्याच्या 2.5 कोटी प्रवासी संख्येवरुन दरवर्षी 5-6 कोटी प्रवाशांना सक्षमपणे हाताळू शकणार आहे.   या विमानतळाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर वर्षाला अतिरिक्त 20 दशलक्ष प्रवासी येथून सुलभपणे प्रवास करु शकतात.  

या विमानतळाची अनेक वैशिष्ट्य आहेत. टी 2 हे एक वास्तुशास्त्रीय आश्चर्य आहे.   देशातील हे पहिलेच टर्मिनल इन गार्डन आहे. त्याच्या आत आणि बाहेर हिरवीगार हिरवळ आहे, आणि प्रवाशांना यातून प्रवास करणे हा एक सुखद अनुभव ठरणार आहे.   हे विस्तारित टर्मिनल, 150,500 चौरस मीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरले असून सध्याच्या टर्मिनलच्या मजल्यावरील जागेच्या ही जागा दुप्पट आहे.  अतिरिक्त टर्मिनल कार्यान्वित झाल्यामुळे, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मागे टाकून देशातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ म्हणून बेंगळुरु विमानतळाचा उल्लेख होणार आहे.   यासाठी दिल्ली पहिल्या आणि मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

========

हे देखील वाचा : फेरफटका चक्क अंतराळातला असला तर…

========

याच विमानतळाच्या परिसऱात केम्पेंगौडा यांचा पुतळाही वैशिष्टपूर्ण ठरला आहे.  नादप्रभू हिरिया केम्पे गौडा, यंना केम्पे गौडा म्हणूनही ओळखले जाते.  ते विजयनगर साम्राज्याचे एक सरदार होते.   बेंगळुरू शहर हे कर्नाटक राज्याची राजधानी आहे.1537 मध्ये केम्पे गौडा यांनी या शहराची उभारणी केली.  त्यांनी या प्रदेशात अनेक कन्नड शिलालेख उभारले.  केम्पे गौडा हे त्यांच्या काळातील सर्वात सुशिक्षित आणि यशस्वी शासक होते. गौडा यांनी विजयनगर सम्राटाचे सार्वभौमत्व स्वीकारले. त्यांनी बेंगळुरू किल्ला आणि सध्याच्या बेंगळुरू शहराचा पाया असलेल्या बेंगळुरू पीटचे नियोजन आणि बांधकाम केले. बंगळुरूमध्ये मंदिरे आणि जलसाठे बांधण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.  याच केम्पे गौडा यांचा 108 फुटी पुतळा  टर्मिनल 2 च्या परिसरात उभारण्यात आला आहे. सुमारे 220 टन वजनाचा हा पुतळा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेल. त्यातील तलवारीचे वजन चार टन आहे.  प्रसिद्ध शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त राम वानजी सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. सुतार यांनी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि बेंगळुरूमधील विधान सौधा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याचीही रचना केली आहे.  एकूण बेंगळुरु परिसराचा हा परिसर विमानतळावरुन प्रवास करणा-यांसाठी आणि पर्यंटकांसाठीही आकर्षणाचा ठेवा ठरत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.