Home » तिसरा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

तिसरा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

by Correspondent
0 comment
Lenyadri Ganapati | K Facts
Share

गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर असं आहे जे पर्वतावर असून १८ गुहा असलेल्या बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.

गिरिजात्मकाची आख्यायिका

गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर (Lenyadri Ganapati) अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.

श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर

या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.

असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.

Shri Girijatmaj Lenyadri Ganpati Temple Maharashtra
Shri Girijatmaj Lenyadri Ganpati Temple Maharashtra

पूजा आणि उत्सव

दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.

इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या कालावधीत मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.

कसे पोहोचाल

गोळेगाव, ता.जुन्नर जि.पुणे
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.
पुण्यातून नाशिक महामार्गाने नारायणगाव-ओझरमार्गे लेण्याद्री : ८९ किमी
पुण्यातून नाशिक महामार्गाने जुन्नरमार्गे लेण्याद्री : ९९ किमी

शब्दांकन – शामल भंडारे.

=====

हे देखील वाचा: दुसरा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.