९० च्या दशकातील हिंदी गाणी आजही प्रत्येक व्यक्तीचे पहिले प्रेम आहे. आज किती चांगली गाणी आली, तरी ९० च्या दशकातील गाण्यांची या गाण्यांना सर येणार नाही. या गाण्यांबद्दल जेव्हा जेव्हा बोलले जाते तेव्हा सर्वात आधी नाव येते ते गायिका अलका याग्निक यांचे. अलका याग्निक यांनी त्यांच्या सुमधुर आणि श्रवणीय आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. आजही अलका या सर्वांच्याच आवडत्या गायिका म्हणून ओळखल्या जातात. (Information About Sensorineural Hearing Loss Disease)
मधल्या काही काळापासून अलका यांनी चित्रपटांसाठी गायन कमी केले असले तरी त्या विविध रियॅलिटी शो च्या माध्यमातून आपल्याला दिसत असतात. आता अचानक त्यांचे चर्चेत येण्याचे कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वीच अलका यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांना ‘रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ हा आजार झाल्याचे सांगितले आहे.
हे देखील वाचा : मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर
आता अनेकांना हे नाव आणि हा आजार नवीनच वाटत असेल. काहींनी तर नाव देखील पहिल्यांदा ऐकले असेल. या आजारामुळे अचानकपणे दोन्ही कानातून ऐकणे बंद होते. हा दुर्मीळ आजार कोणाला होऊ शकतो? या आजारामागील कारणे काय आहेत? चला तर जाणून घेऊया या आजाराबद्दल आणि या आजाराच्या कारणांबद्दल.
सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस म्हणजे नक्की काय?
सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस हा असा दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या कानाच्या आतील मज्जातंतू किंवा कानाला मेंदूशी जोडणारे मज्जातंतू खराब होतात. त्यामुळे रुग्णाची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे कमी होते. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याचे डॉक्टर सांगतात. या आजारात व्यक्ती पूर्णपणे बहिरी देखील होऊ शकते.
सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस या आजाराचे मुख्य कारण आहे तणाव. आजच्या घड्याळ्याच्या काट्यावर जगत असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात ‘तणाव’ हा असतोच. त्याची कारणं जरी वेगळी असली तरी तणाव हा सामान आहे. या आजारात हाय ब्लड प्रेशर किंवा रक्त प्रवाहात निर्माण होणाऱ्या अडचणी या आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण करू लागतात. यामुळे कानाच्या आतील केसांच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. कानाच्या पेशी कमकुवत झाल्यानंतर त्यांना स्थिर रक्त प्रवाहाची आवश्यकता असते. स्थिर रक्त प्रवाहा नसेल तर या पेशी खराब होतात, ज्यामुळे आपल्या ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होतो. सततच्या तणावामुळे श्रवणशक्ती कमी होऊन, अचानक ऐकू येणे बंद होऊ शकते.
याव्यतिरिक्त दीर्घकाळ मोठ्या आवाजात राहिल्याने कानाच्या आत असणाऱ्या पेशींचे नुकसान होते. याशिवाय मैनिंजायटिस, मीजल्स, मंप्स सारख्या आजारामुळे सुद्धा बहिरेपणा येऊ शकतो.
हे देखील वाचा : Weight Loss आणि Fat Loss मधील फरक काय?
हा आजार पूर्णपणे बरा होतो का?
हा आजार बहुतकरून कायमस्वरुपाचा असतो. कानाच्या आतील केसांच्या पेशी खराब झाल्या किंवा नष्ट झाल्या त्यानंतर पूर्वीसारख्या बऱ्या करता येत नाही. तज्ज्ञांच्या मते काही रुग्णांमध्ये योग्य उपचार केल्यानंतर त्यांची ऐकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारली असली तरी हा आजार पूर्णपणे बरा होत नाही.
‘सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस’ या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही गर्दीत किंवा मोठा आणि जास्त गोंधळ असलेल्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला त्या आवाजात बोलणे ऐकू येत नाही. याशिवाय कानात सतत गूंज, किलकिले किंवा वेगळा आवाज असे जाणवत असते. आपल्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द आपल्याला नीट ऐकू येत नाहीत.
सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस या आजारावर उपचार काय ?
हा आजार झालेल्या रुग्णांना ऐकू येण्यासाठी कानात लावण्याचे श्रवण यंत्रे दिले जाते. याशिवाय काही रुग्णांमध्ये जेव्हा श्रवण यंत्रे देखील काम करत नाहीत, तेव्हा त्यांच्या कानात कॉक्लियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले जातात.