Home » मार्गशीर्ष गुरुवारची माहिती आणि कथा

मार्गशीर्ष गुरुवारची माहिती आणि कथा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Margashirsha Guruvar
Share

इंग्रजी कॅलेंडरमधील शेवटचा डिसेंबर महिना सुरु झाला आहे. यासोबतच आपल्या मराठी महिन्यातला मार्गशीर्ष महिना देखील चालू झाला. मार्गशीर्ष महिना लागला की, सगळ्यांनाच वेध लागतात ते मार्गशीर्ष गुरुवारचे. तसा मार्गशीर्ष महिना व्रतांचा समजला जातो. २ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली.

मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. कुटुंबात धन, धान्य आणि समृद्धी राहावी, सगळ्यांना उदंड निरोगी आरोग्य मिळावे म्हणून सवाष्ण महिला हे व्रत करतात. अनेक घरांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातही नॉनव्हेज आणि मद्यपान वर्ज्य केले जाते. यंदा ३१ डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे.

२०२४ मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत. पहिल्या महालक्ष्मी गुरुवारचे व्रत हे ५ डिसेंबर २०२४ ला असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील असणार आहे. त्यानंतर १२ डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार, १९ डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि २६ डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे.

मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महिलांनी चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळदी-कुंकू लावून, कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी घालावी. कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य अर्पण करा.

Margashirsha Guruvar

महालक्ष्मीची कथा

ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दु:ख, दारिद्र्य दूर होते. महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख, समृद्धी,संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते.मनीची इच्छा पूर्ण होते.

सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, क्षान्ती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, वृत्ती, कांती, स्मृती, दया, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधूकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भुलोकी लक्ष्मी, ब्रम्हलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेस्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनि पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रासादी राजलक्ष्मी घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते. तिला नमस्कार असो. सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ही कहाणी आहे.

द्वापारयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला.

एकदा महालक्ष्मीच्या मनात आले. त्या राजाच्या राजप्रासादी रहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वत: करीताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध बाम्हण स्त्रीची नीट विचारपूस केली.

वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी महणाली, ‘बाळ माझे नाव कमळा. माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होतं. मग नवरा तिला खूप मारझोड करी, या जाचाला त्रासलेली ती वैश्यपली कंटाळली आणि घर सोडून गेली. रानीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समुद्धी देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली.

माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिच घर संतती, संपत्ती व समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंदीआनंद आला. पुढे ते पतिपत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मीलोकात वैभवात राहिली. ज्यांनी जितकी वर्ष श्रीमहालक्ष्मीव्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे.

वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली, ‘माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा.’ वृद्धेच्या रुपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली.

राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली.

ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती. हे काही तिला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती राजदरबारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकिकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राम्हण स्त्रीची क्षमा मागितली, तेव्हा श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली.

तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य,ऐश्र्वर्य, वैभव, सर्व गेले व त्यांची अन्नान्नदशा झाली.

एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, ‘आपला जामात राजा आहे. खूप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे जा. आपले हाल सांगा. त्याला दया येईल. तो आपल्याला साह्य करील.’ त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनीत्याचे नावगाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकिकत तिला सांगितली.

दासीकडून राजवस्यत्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदरसत्कार केला. नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता.

काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मीव्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली.

परंतु ‘बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही’ हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागावता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले.

आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, ‘माहेरून काय आणले ?’ ती म्हणाली, ‘राज्याचे सार’, पती म्हणाला ‘म्हणजे काय ?’ पत्नी म्हणाली, ‘थोडा धीर धरा म्हणजे कळेल.’ त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडं मीठ वाढले. मीठ घालताच जेवण रुचकर लागले.

‘हेच ते राज्याचे सार!’ श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हस्यविनोद करून जेवण पुरे केले. अशा रितीने जे कोणी हे महालक्ष्मीव्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुखसमृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, श्रीमहालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये, दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये.

“महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना’ अशी ही श्रीमहालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण

ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमः। ॐ न्हीम् श्रीलक्ष्मीभ्यो नमः। ॐ शांतिः शांतिः शांतिः। श्रीमहालक्ष्मी देवतार्पणमस्तु !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.