Home » खाशाबा जाधव यांना पुरस्कार सरकार का देत नाही ?

खाशाबा जाधव यांना पुरस्कार सरकार का देत नाही ?

by Team Gajawaja
0 comment
Khashaba Jadhav
Share

सध्या सगळीकडे ऑलिम्पिकचा गाजावाजा सुरू आहे. पॅरिस ऑलिम्पिकला दणक्यात सुरुवात झाली असतानाच भारत यंदा किती मेडल्स जिंकतय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसा इतिहास पाहायचा झाला, तर भारत ऑलिम्पिकमध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन यांच्यासारखी ग्रेट कामगिरी करू शकला नाही, पण तरीही या स्पर्धेत आपली एक वेगळी ओळख तयार करून ठेवली आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारताने हॉकीमध्येच गोल्डन कामगिरी केली होती, याव्यतिरिक्त नॉर्मन प्रीचर्ड यांनी भारताकडून खेळतांना दोन सिल्व्हर पटकावले होते, पण शेवटी ते ब्रिटिश सिटीजन अजूनपर्यंत भारतभूमीवर जन्मलेल्या व्यक्तीने स्वत:चं असं वैयक्तिक पदक जिंकलं नव्हतं. पण १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे भारताचं क्रीडाविश्व पूर्णपणे बदलूनच गेलं.

महाराष्ट्रातील वीरांची भूमी सातारामधून आलेल्या पैलवान खाशाबा जाधव यांनी ब्रॉंझ मेडल जिंकून सगळे बॅरिअर्स मोडून काढले. आतापर्यंत संपूर्ण जगाला वाटायचं की हा देश फक्त हॉकीपूरताच आहे. पण खाशाबा यांच्या एका मेडलने भारतीयांमध्ये उमेद जागवली आणि कित्येक जण त्यातून प्रेरणा घेऊन आज ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले आहेत. पण दुर्दैव म्हणजे आजही भारत सरकारने त्यांचा हवा तसा गौरव केला नाही. स्वातंत्र्यानंतर सर्व ऑलिम्पिक मेडल्स विजेतांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे, फक्त आणि फक्त खाशाबा जाधव यांना सोडून ! त्यांचे कुटुंबीय कित्येक वर्षांपासून पद्म पुरस्काराची मागणी करत आहेत. तर प्रश्न असा पडतो की, खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार सरकार का देत नाही ? (Khashaba Jadhav)

अनेकांना हे माहीत नसावं पण खाशाबा जाधव यांनी १९४८ लंडन ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. यावेळी पहिले दोन राऊंड ते जिंकले, मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये इराणच्या रेसलरने त्यांचा पराभव केला. त्यामुळे १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांचे दोनच लक्ष्य होते, एक म्हणजे कुस्ती आणि दुसरं म्हणजे मेडल ! स्पर्धा संपायला २-३ दिवस बाकी होते, त्यातच खाशाबा सोडून सर्वच भारतीय खेळाडूंचं आव्हान संपलं होतं. म्हणून शहर फिरायला जावं, असं सर्वांनी ठरवलं. टीम इंडियाचे मॅनेजर प्रताप चंद्र यांनीही खाशाबांना सांगितलं की, तुझी मॅच उद्या आहे, तू आज चल ! मात्र खाशाबा यांनी नकार दिला आणि मी इतर रेसलर्सच्या मॅच बघतो तुम्ही जा, असं सांगितलं.

सर्व खेळाडू आणि मॅनेजर फिरायला गेले. इतक्यात इतर दोन रेसलर्सची मॅच सुरू असताना विचित्र गोष्ट घडली. अचानक खाशाबा जाधव यांना आपलं नाव अनाऊन्स होत असल्याचं ऐकायला आलं. एकही साथीदार सोबत नाही, इंग्लिश येत नाही. मात्र तरीही त्यांनी स्वत: जाऊन चौकशी केली आणि असं कळलं की त्यांचा सामना आज आणि आताच आहे. ते गोंधळले. वेळ नव्हता आणि कुस्तीच्या मैदानात उतरण्यापासूनही पर्याय नव्हता. नशिबाने मात्र तरीही ते तयार होऊन मॅटवर उतरले. त्यांचा पहिला प्रतिस्पर्धी आला नाही, त्यामुळे त्यांना बाय मिळाला. त्यानंतर त्यांनी कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या रेसलर्सचा पराभव केला. (Khashaba Jadhav)

खाशाबांना एकूण पाच मॅच खेळायच्या होत्या. त्यांची पुढची मॅच रशियाच्या राशीद मेमेदबेयोव्हविरुद्ध होती. तो तगडा होता, हे खाशाबांना माहीत होतं. त्यांची ही मॅच तासभर चालली पण त्यांना ३-० असा पराभव पत्करावा लागला. लेखक संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे पुस्तक लिहून ठेवलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, मॅच रेफरीचे अनेक खाशाबांच्या विरोधात गेले होते, अन्यथा भारताला रौप्यसुद्धा मिळालं असतं. खाशाबा तिथे एकटेच होते. त्यात तासभर मॅचमध्ये असल्यामुळे ते दमले होते आणि नियमानुसार दोन सामन्यांमध्ये अर्धा तास विश्रांती गरजेची आहे. पण पंधरा मिनिटांनीच त्यांची दुसरी मॅच सुरू करण्यात आली.

काहीही कारण न देता ते मॅचसाठी तयार झाले, मात्र जपानच्या शोहाची ईची या पैलवानासमोर त्यांचा पराभव झाला. याचवेळी संघाचे व्यवस्थापक तिथे असते तर त्यांची बाजू मांडण्यात आली असती आणि त्यांना विश्रांतीचा वेळ मिळाला असता. पण भारताने ब्रॉंझ जिंकला, इतिहास घडला, स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक भारताच्या पारड्यात पडलं. मुळात खाशाबा यांच्या सर्व मॅच संपल्यावर अगदी मेडल सेरेमनी पार पडल्यावर भारतीय संघ परतला. ब्रॉंझ मेडल स्वीकारतानाही खाशाबा एकटेच होते. पण, त्यांना प्रसंगाचं महत्त्व माहीत होतं. त्यांनी धावत तिरंगा आणला तो आपल्याभोवती गुंडाळला आणि अभिमानाने तिरंगा तिथे मैदानात मिरवला. (Khashaba Jadhav)

अलीकडे सर्व खेळाडूंना आर्थिक मदत मिळते, प्रशिक्षक फिजिओ, ट्रेनर मदतीला असतात. सर्वच सुविधा असतात पण खाशाबांच्या वेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. ते ज्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते तिथले प्राध्यापक खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले होते . एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातूनच खाशाबा यांचं हेलसिंकीला जाणं शक्य झालं. खाशाबा पदकासह परतले, तेव्हा करवीरवासीयांच्या उत्साहाला उधाण आलं आणि गावकऱ्यांनी कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत 151 बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती. (Khashaba Jadhav)

=============

हे देखील वाचा : जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या मनू भाकेरबद्दल

============

खाशाबा यांच्या मेडलचं महत्त्व किती होतं, हे सर्वांनाच माहीत आहे. पण स्वतंत्र भारताने त्यांना काय दिलं ? जगातल्या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय अतिशय हलाखीचं जीवन जगला. त्यांचा हवा तसा गौरव कधीच झाला नाही. १९५२ ला त्यांनी मेडल जिंकलं. यानंतर त्यांना पोलीस खात्यात नोकरी लागली, पण तीसुद्धा पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल चार वर्षांनी याशिवाय स्पोर्ट्स Instructor म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. पोलीस दलातही ते उपनिरीक्षक म्हणजेच सब इन्स्पेक्टर म्हणून लागले. आणि वाईट गोष्ट म्हणजे पुढची २२ वर्ष एकाही बढतीशिवाय त्यांनी काढली.

भारतात पद्म पुरस्करांना सुरुवात १९५४ साली झाली, म्हणजेच खाशाबा यांनी मेडल जिंकण्याच्या दोन वर्षांनी मात्र आजपर्यंत कोणत्याही पद्म पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला नाही. दुसरीकडे अर्जुन पुरस्कारांची सुरुवात १९६१ साली झाली, पण खाशाबा यांचा गौरव झाला चक्क २००० साली म्हणजेच ३९ वर्षानंत याच वर्षी भारताचे महान धावपटू मिलखा सिंग यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही. ते म्हणाले की, ज्यावेळी मला या पुरस्काराने सन्मानित करायला हवं होतं, त्यावेळी केलं नाही. त्यामुळे आता मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही. कदाचित खाशाबा जाधव हयात असते, तर त्यांनीही हा पुरस्कार नाकारलाच असता. (Khashaba Jadhav)

त्यांना पद्म पुरस्कार मिळावा, त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून क्रीडाप्रेमी मागणी करत आहेत. त्यांच्या पद्म पुरस्काराच्या मागणीवरुन त्यांचे पुत्र रणजीत जाधव सांगतात की, ते १९८३ मध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झाले. त्यांची शेवटची वेतनश्रेणी २२०० होती. निवृत्तीच्या काळात त्यांना मिळालेली रक्कम ७५,००० होती. १९८४ मध्ये, जेव्हा आमचे घर बांधलं जात होतं, तेव्हा पैसे उभे करण्यासाठी माझ्या वडिलांना माझ्या आईचे सोन्याचे दागिने विकावे लागले होते. गेल्या सहा वर्षात रणजीत यांनी सरकारला अनेक वेळा पत्र लिहून पद्म पुरस्कारासाठी वडिलांची शिफारस केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

इतका मोठा पराक्रम करून सुद्धा भारताचा हा महान खेळाडू जवळपास अपरिचितच आहे. १९८४ साली त्यांचं एका अपघातात निधन झालं. यावेळी त्यांच्याकडे आपल्या हेलसिंकी ऑलिम्पिक मेडलशिवाय काहीच उरलं नव्हतं. भारताने आतापर्यंत त्यांना केवळ ‘उपेक्षा’ हा पुरस्कार दिला आहे आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही, की त्यांना भविष्यात कधीतरी पद्म पुरस्कार मिळेल. (Khashaba Jadhav)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.