Home » पडद्यावरच्या स्टारची निवडणुकीत हार.

पडद्यावरच्या स्टारची निवडणुकीत हार.

by Correspondent
0 comment
Kamal Haasan | K Facts
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपल्या लोकप्रियतेचा राजकारणातही फायदा करून घेतला. आणि सत्ता हस्तगत करून खऱ्या अर्थाने जनतेवर ‘राज्य’ केले. एम. जी. रामचंद्रन, एम करुणानिधी, जयललिता, एन. टी. रामाराव, चिरंजीवी, विजयकांत आदी त्याची काही प्रमुख उदाहरणे आहेत.

तमिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना तेथील जनता अक्षरशः ‘देव’ मानते. त्यामुळे आधी चित्रपटसृष्टीत आणि नंतर राजकारणातही त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभते अशी अनेक उदाहरणे आहेत. तेलगू चित्रपटांत प्रामुख्याने ‘रामा’ची वा ‘कृष्णा’ची भूमिका करणारे एन. टी. रामाराव यांनी एका रात्रीत स्थापन केलेल्या तेलगू देसम पक्षाला आंध्रातील जनतेने प्रचंड मतांनी निवडून दिले आणि नंतर रामाराव यांनी आंध्रात काही वर्षे राज्य केले. दक्षिणेत चित्रपटसृष्टीतील कलावंतांची लोकप्रियताच अशी असते. आपल्या याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांनी यावेळी स्वतःचा ‘मक्कल निधी मय्याम’ (एमएनएम) हा स्वतंत्र पक्ष स्थापन करून तामिळनाडूत निवडणुका लढविल्या होत्या परंतु त्याच्या दुर्देवाने राजकारणातही ‘सुपरस्टार’ होण्याचे त्याचे स्वप्न भंगले.

Kamal Haasan
Kamal Haasan

नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कमल हासन याच्यासह त्याच्या पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झाले. कमल हासनच्याही आधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘सुपर सुपरस्टार’ रजनीकांत यांनीही राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती. आपण लवकरच एका राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्याने घोषित केले होते व त्याच्या या घोषणेचे त्याच्या लाखो चाहत्यांनी नेहमीप्रमाणे प्रचंड मोठे स्वागत केले होते. हा रजनी राजकारणात कोणता ‘चमत्कार’ घडविणार याकडे त्याच्या लाखो चाहात्यांचे लक्ष लागून राहिले होते. रजनीकांत राजकारणात येणार म्हटल्यावर तामिळनाडूतील द्रमुक, अण्णा द्रमुक या प्रस्थापित पक्षांना चांगलीच धडकी भरली होती मात्र नंतर नेमके काय झाले कोणास ठाऊक रजनीकांत याने आपल्या राजकारण प्रवेशाचा निर्णय रद्द केला आणि त्याचा नवीन राजकीय पक्षही बारगळला. त्याचवेळी कमल हासन यानेही आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा केली मात्र ती त्याने खरी केली आणि २०१८ मध्ये ‘मक्कल निधी मय्याम’ (एमएनएम) हा आपला नवीन राजकीय पक्ष स्थापन केला.

आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना कमल हासन याने ‘एमएनएम’ पक्ष हा भ्रष्ट आणि घराणेशाहीची परंपरा सांभाळणाऱ्या द्राविडी पक्षांना (प्रामुख्याने द्रमुक आणि अण्णाद्रमुक) एकमेव पर्याय असेल असे जाहीर केले होते. तसेच पक्ष्याच्या ध्येयधोरणाबाबत बोलताना, ‘लोकांसाठी राजकारण’ ‘प्रत्येकाची उन्नती’ आणि लोकांच्या प्रगतीसाठी दारिद्र्यरेषेपेक्षा (पॉव्हर्टी लाईन) ‘सुबत्ता रेषेला’ (प्रॉस्परिटी लाईन) प्राधान्य अशी प्रमुख त्रिसूत्री असेल असे सांगितले होते.

Veteran actor Kamal Haasan
Veteran actor Kamal Haasan

आपल्या ‘एमएनएम’ पक्षातर्फे २०१९ मध्ये तामिळनाडूत लोकसभा निवडणूक (काही मतदारसंघात) लढविण्याचा श्रीगणेशाही त्यांनी केला होता मात्र त्याच्या पक्षाला मतदारांचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याचे चित्र दिसून आले.

नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाने अभिनेता शरथ कुमार यांच्या ‘अ. भा. सामंथुवा मक्कल काची’ या पक्षाची युती करून विधानसभेच्या एकूण २३२ जागांपैकी १५४ जागा लढविल्या होत्या. मात्र एमएनएम पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. स्वतः कमल हासन हा कोईमतूर (दक्षिण) मतदारसंघातून भाजपच्या, वनिती श्रीनिवासन यांच्याकडून १७२८ मतांनी पराभूत झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कमल हासन, सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते मात्र शेवटी भाजपच्या उमेदवार वनिती श्रीनिवासन यांनी त्याचा पराभव केला. कमल हासन वगळता अन्यत्र एमएनएम च्या उमेदवारांना त्यामानाने कमीच मते मिळाली. त्यामुळे या पक्षाचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. मात्र काही ठिकाणी द्रमुक तर काही ठिकाणी अण्णाद्रमुक यांच्या उमेदवारांना ‘एमएनएम’ च्या उमेदवारांमुळे निसटती हार पत्करावी लागली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणेच कमल हासन हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय आहे. ‘पुष्पक’ ‘सदमा’ ‘चाचीं ४२०’ सारखे त्याचे अनेक हिंदी चित्रपट गाजले. अतिशय लोकप्रिय कलाकारांना जनतेने निवडणुकीत नाकारण्याची तामिळनाडूत तरी ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कमल हासन यांना चित्रपटसृष्टीतील प्रचंड लोकप्रियतेचा राजकीय क्षेत्रात फायदा का झाला नाही त्याचीच चर्चा सध्या तामिळनाडूत चालू आहे.

  • श्रीकांत ना. कुलकर्णी
    (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.