Home » Normandy landings: संहाराची सुरुवात जिथे झाली, ती नॉरमंडीची लढाई   

Normandy landings: संहाराची सुरुवात जिथे झाली, ती नॉरमंडीची लढाई   

by Team Gajawaja
0 comment
Normandy landings
Share

नॉरमंडी हा फ्रान्समधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला भाग. फ्रान्सच्या उत्तरेला असणारा हा भाग सतत काही ना काही गोष्टींसाठी लोकप्रिय राहिला आहे. हा भाग सुरवातीला रोमन अधिपत्याखाली होता. या नॉरमंडीवर व्हायकिंगस (दर्यावर्दी लोक) अनेकदा चाली करून आले. पुढे या व्हायकिंगस लोकाना ‘नॉर्मन’ म्हणण्यात येऊ लागलं आणि ते ज्या भागात वसले, राहिले त्या भागाला ‘नॉरमंडी’ असं म्हटलं जाऊ लागलं. (Normandy landings)

‘नॉरमंडी’ हा भाग विसाव्या शतकात लोकप्रिय झाला तो दुसऱ्या महायुद्धामुळे. ज्या भागातल्या युद्धामुळे दुसऱ्या महायुद्धाचं स्वरूप पालटलं आणि जिथून जर्मनीची पश्चिम युरोपात पीछेहाट सुरू झाली ते नॉरमंडी… हा फ्रान्सच्या उत्तरेला वसलेला प्रदेश म्हणजे नॉरमंडी… मिलिटरी भाषेत बोलायचं म्हणजे जिथे ६ जून १९४४ ला प्रसिद्ध असा डी-डे (D- Day) गणला गेला ती लढाई म्हणजे ‘नॉरमंडीची लढाई’ इतिहासात प्रसिद्ध झाली. आजच्याच दिवशी इतिहासात नॉरमंडीवर चढाई केली ती मित्र राष्ट्रानी.  (Normandy landings)

दुसऱ्या महायुद्धाची सुरवात हिटलरने पोलंडवर आक्रमण करून केली, ते साल होतं १९३९. दुसऱ्या महायुदधाने जिथे अनपेक्षित वळण घेतलं आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने अभेद्य अशा जर्मन तटबंदिवर आक्रमण केलं तो दिवस होता ६ जून १९४४. या लढाईने संपूर्ण अक्ष राष्ट्रांची म्हणजे खासकरून जर्मनीची धूळधाण उडवली. 

यात एक रंजक गोष्ट सांगायची म्हणजे ज्या दिवशी मित्र राष्ट्रांनी नॉरमंडीवर हल्लाबोल केला बरोबर त्याच्या २ महीने आधी हिटलरने त्याच्या फील्ड मार्शलना आणि कमांडर्सना आदेश दिले होते की, नॉरमंडीवर लक्ष ठेवा… पण त्याचा आफ्रिका कॉर्प्सचा फील्ड मार्शल ‘आयरवीन रोमेल’ हा गाफील राहिला आणि त्याने या हिटलरच्या सुचनेला फारसं महत्व दिलं नाही. (Normandy landings)

=====

हे देखील वाचा – अमेरिकेत भाजीसारखी खरेदी करता येते बंदूक…

=====

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर मित्र राष्ट्रांची पीछेहाट सुरू असताना अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांनी जनरल आयसेनहॉवर यांना युद्धाची सूत्र हातात घेण्यास सांगितले. मित्र राष्ट्रानी या दरम्यान ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’ सुरू करण्याची तयारी केली. साधारणतः १९४३ पासून गुप्त पद्धतीने नॉरमंडीची लढाई लढण्यासाठीची तयारी चालू होती. याला परत कोडनेम दिल होतं ‘ऑपरेशन नेपच्यून’. 

पश्चिम आघाडीवर महत्त्वाचा विजय मित्र राष्ट्राना मिळणार होता त्याची ही झलकच होती. शत्रू राष्ट्रांच्यात धूळफेक करण्यासाठी आणि जर्मनीला या संदर्भात गाफील ठेवण्यासाठी अजून एक ‘ऑपरेशन बॉडीगार्ड’ सुरू केलं गेलं. याचा उद्देश जर्मनीला नक्की मित्र राष्ट्र कुठे हल्ला करणार आहेत आणि त्याची तारीख आणि दिवस कोणता याबद्दल काहीही कल्पना येऊ नये, असा मनसुबा मित्र राष्ट्रांचा होता. 

समुद्रातून किनाऱ्यावर चढाई करणे हे तितकंसं सोपं नव्हतं. कारण जर्मन फौजेने ठिकठिकाणी लँडमाईन्स पेरल्या होत्या. याचा अर्थ जर्मन सजग आणि अलर्ट होते असा नाही. मित्र राष्ट्रांच्या सैनिकानी या चढाईची आधी तयारी केली होती, प्रॅक्टिस केली होती. सुरवातीला जनरल आयसेनहॉवर यांनी मित्र राष्ट्रांच्या नॉरमंडी चढाईची तारीख ठरवली होती ५ जून १९४४… पण त्यावेळेस हवामान चांगलं नव्हतं. समुद्र शांत नव्हता, त्यामुळे मित्र राष्ट्रांच्या लढाईची तारीख २४ तास पुढे ढकलण्यात आली. 

शेवटी ६ जून १९४४… हा दिवस चढाईला आणि हल्ला करायला निश्चित केला. मित्र राष्ट्रांचे प्रमुख हवामान तज्ज्ञ जेम्स स्टॅग यांनी जनरल आयसेनहॉवर यांना विश्वासाने सांगितलं की, “हवामान ६ जूनला चांगलं  असणार आहे, समुद्रसुद्धा शांत असेल अशावेळी हल्ला करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.”(Normandy landings)

एकदा हिरवा कंदील दिल्यानंतर ३००० लॅंडींग क्राफ्ट्स, २५०० इतर नौका, आणि ५०० मोठी जहाज, विनाशिका, इंग्लिश बंदरावरून निघाल्या. यात ८२२ विमानानी भाग घेतला. साधारणतः २४,००० अमेरिकन, ब्रिटिश आणि कॅनेडियन ट्रूप्स किनाऱ्यावर उतरले. वेळ होती सकाळी ६ वाजून ३० मिनिटं. 

=====

हे देखील वाचा – सिद्धू मुसवालाच्या हत्येचा सूत्रधार लॉरेन्स बिश्नोईचा थक्क करणारा गुन्हेगारी प्रवास

=====

एकूण ८० किलोमीटरचा किनारा पाच विभागात विभागला होता. लढाईला सुकर जावं यासाठी मित्र राष्ट्रांच्या पाच तुकड्या केल्या होत्या. यात अमेरिकेच्या २, ब्रिटिशांच्या २, तर कॅनडाची १ तुकडी होती. ज्या किनाऱ्यावर मित्र राष्ट्रांचे सैनिक धडकणार होते त्या पाच किनाऱ्यांची नाव होती – उटाह, ओमाहा, गोल्ड, ज्युनो आणि स्वॉर्ड. इथे निकराची लढाई झाली. मित्र राष्ट्रांचे आणि जर्मनीचेसुद्धा हजारो सैनिक मारले  गेले. जर्मनीचे ४००० ते ९००० सैनिक मारले गेले, तर मित्र राष्ट्रांचे १०००० सैनिक मारले गेले. पुढे २ महीने म्हणजे ऑगस्ट १९४४ पर्यन्त लढाई चालली. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. 

एक पर्व संपलं. दुसऱ्या महायुद्धातली घनघोर चाललेली लढाई म्हणून नॉरमंडीची लढाई ओळखली गेली. अपेक्षेप्रमाणे मित्र राष्ट्र जिंकले… पुढे जर्मनीची वाताहत झाली. इटलीचा पाडाव झाला. जपानने शरणागती पत्करली. दुसरं महायुद्ध अखेर संपुष्टात आलं. 

नॉरमंडी नेहमी स्मरणात राहील अशी व्यवस्थाच जणू दुसऱ्या महायुदधाने केली. हीच ती ६ जून १९४४ ला सुरू झालेली नॉरमंडीची लढाई… दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मानवजातीने मोकळा श्वास घेतला. परत असे महायुद्ध होऊ नये यासाठी विकसित देशानी पुढाकार घेतला, आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या. असं महायुद्ध झाल्यास मानव जातीला परवडणारे नाही हीच भीती सगळ्यांच्या मनात होती. (Normandy landings)

इतिहास बदलता येऊ शकत नाही, पण वर्तमान चांगलं करून भविष्य सुकर करण्यासाठी वाटचाल करणं आवश्यक आहे, हीच शिकवण दुसऱ्या महायुदधाने दिली. 

निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.