१९ जून २०२४ हा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या राजगीर येथील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. ८०० वर्षापूर्वी एका माथेफिरु शासकानं नालंदा विद्यापीठाला जाळून टाकले होते. तेव्हा जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून नालंदा विद्यापीठाची ख्याती होती. अनेक विद्वान या विद्यापीठातून शिक्षण घेत होते.
जगभरातील हजारो विद्यार्थी तेव्हा भारतात येऊन नालंदा विद्यापीठातून मोफत शिक्षण घेत असत. हे शिक्षण सर्वच विषयांमधील होतं. मात्र १२ व्या शतकात या विद्यापीठाला बख्तियार खिलजीने आग लावली. तेव्हा नऊ मजली असलेले हे विद्यापीठ लाखो हस्तलिखीतांनी संपन्न होते. ते जळण्यासाठीही अनेक महिने लागले. येथील विद्यार्थी आणि शिक्षकांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. (Nalanda University)
आता ज्या ऑस्कफर्ड किंवा केब्रिंज विद्यापीठांना जगातील सर्वोत्तम विद्यापीठ असा मान मिळतो, त्यांची स्थापना होण्यापूर्वी कितीतरी वर्ष नालंदा विद्यापीठानं जगाला ज्ञानदानाचे कार्य केले. पण बख्तियार खिलजीने हा ज्ञानाचा स्त्रोतच जाळून टाकला. आज नालंदा विश्वविद्यापिठाच्या या खुणा बघतांना भारतीयांची मने व्यथित होतात. याच नालंदा विद्यापीठाचे नव्यानं बांधणी करण्यात येत आहे. त्याच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले.
१२ व्या शतकात भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाला बख्तियार खिलजीने जाळून टाकले. या घटनेला ८०० वर्ष झाली. विद्यापीठातील पुस्तकांचा खजिना ६ महिने जळत होता. ५ व्या शतकात स्थापना झालेल्या या विद्यापीठात जगाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येत असत. आता नव्यानं तयार होत असलेल्या नालंदा विद्यापीठामधून याच ८०० वर्षापूर्वीच्या विद्यापीठाच्या सुवर्ण खुणा जपण्यात येणार आहेत. नालंदा विद्यापीठाची स्थापना इसवी सन ४२७ मध्ये झाली होती. गुप्त वंशाचा शासक कुमार गुप्ता प्रथम याच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ तयार झाले. त्याचे बांधकांम पढे अनेक वर्ष होत राहिले आणि त्याची कीर्तीही जगभर पसरली. (Nalanda University)
नालंदा विद्यापीठ हे ५ व्या शतकातील स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण मानले जाते. मोहम्मद बिन बख्तियार खिलजी हा तत्कालीन दिल्ली शासक कुतुबुद्दीन ऐबकचा सेनापती होता. खिलजीची नजर या विद्यापीठावर पडेपर्यंत विद्यापीठाला मोठे वैभव प्राप्त होते. खिलजीने नालंदा विद्यापीठावर हल्ला केला तेव्हा येथे हजारो धर्मगुरू विद्यार्थी होते. त्या सर्वांची त्यानं हत्या केली आणि नालंदा विद्यापीठाचा नाश केला. प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या संपूर्ण परिसराभोवती एक भक्कम भींत होती. त्यात प्रवेशासाठी मुख्य गेट होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे मठांच्या रांगा होत्या आणि त्यांच्या समोर अनेक भव्य स्तूप आणि मंदिरे होती. खिलजीनं हे सर्व तोडून जाळून टाकले. यावेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना जिवंतही जाळण्यात आले. खिलजीने विद्यापीठ जाळले तेव्हा नऊ मजली ग्रंथालयात सुमारे ९० लाख हस्तलिखिते होती. (Nalanda University)
या विद्यापीठात तेव्हा जगभरातील १० हजार विद्यार्थी एकत्र शिक्षण घेऊ शकत होते. विद्यार्थ्यांची निवास, भोजन व्यवस्था पूर्णपणे मोफत होती. येथे धर्म, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, चित्रकला, वास्तुशास्त्र, अवकाश आणि धातूशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय शिकवले जात असत. शिवाय आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेदाचेही ज्ञान दिले जाई. आता जशी अभ्यासक्रमात जाण्यासाठी गुणवत्ता तपासणी परीक्षा होते, तशीच नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा होती. नालंदा विद्यापीठात गणित आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे मान्यवर शास्त्रज्ञ होते.
भारतीय गणिताचे जनक आर्यभट्ट हे ६व्या शतकात नालंदा विद्यापीठाचे प्रमुख होते. चिनी प्रवासी आणि विद्वान ह्युएन त्सांग यांनी ७ व्या शतकात नालंदा विद्यापीठात काही काळ अध्यापन केले. त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात नालंदा हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठ असल्याचा उल्लेख आहे. नालंदा विद्यापीठ हे स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. या विद्यापीठात अभ्यासासाठी ३०० खोल्या, ७ मोठ्या खोल्या आणि ९ मजली लायब्ररी होती. ज्यामध्ये एकेकाळी लाखो पुस्तके होती. यातील बहुतांशी ही हस्तलिखिते होती. तक्षशिलेनंतर नालंदा हे जगातील दुसरे सर्वात जुने विद्यापीठ होते. (Nalanda University)
यात केवळ भारतच नाही तर कोरिया, जपान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, इराण, ग्रीस, मंगोलिया यासह इतर अनेक देशांतील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत.नालंदा विद्यापीठात ‘धर्मगुंज’ नावाचे ग्रंथालय होते. त्याचा अर्थ ‘सत्याचा पर्वत‘ असा होता. ग्रंथालयाच्या ९ मजल्यांमध्ये ‘रत्नरंजक‘, ‘रत्नोदधी‘ आणि ‘रत्नसागर‘ असे तीन भाग होते. या विद्यापीठात अनेक महान विद्वानांनी शिक्षण घेतले होते, त्यात प्रामुख्याने हर्षवर्धन, धर्मपाल, वसुबंधू, धर्मकीर्ती, आर्यवेद, नागार्जुन यांची नावे आहेत.
हे वैभव एका बख्तियार खिलजीमुळे आगीच्या भक्षस्थानी पडले. आता केंद्र सरकारच्या पुढाकारानं नव्यानं नालंदा विद्यापीठाची उभारणी करण्यात येत आहे. आताचे नालंदा विद्यापीठ हे बिहारच्या राजगीरमधील वैभरगिरीच्या पायथ्याशी ४५५ एकर परिसरात आहे. जगातील सर्वात मोठे नेट झिरो कार्बन कॅम्पस असलेले हे विद्यापीठ ‘पंचामृत’ सूत्राच्या आधारे उभारले गेले आहे. तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी १९ सप्टेंबर २०१४ रोजी याची पायाभरणी केली होती. प्राचीन नालंदा विद्यापीठाचा नवीन परिसर नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ आहे. २०१७ मध्ये विद्यापीठाच्या बांधकामाला सुरुवात झाली. वास्तविक १४ विद्यार्थ्यांसह तात्पुरत्या कॅम्पसमध्ये या विद्यापीठाची सुरुवात झाली होती. (Nalanda University)
=============
हे देखील वाचा : 18 जूनला लाँच होणार जगातील वुड फिनिश मोबाइल, जाणून घ्या खासियत
============
भारताशिवाय १७ देश या विद्यापीठाचे भागीदार आहेत. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई दारुसलाम, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. या देशांनी विद्यापीठाच्या समर्थनार्थ सामंजस्य करार केले आहेत. सध्या विद्यापीठात २६ देशांतील विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिकत आहेत. परदेशी विद्यार्थ्यांसाठी १३७ शिष्यवृत्तीही येथे सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठात पीजी, पीजी डिप्लोमा, पीएचडी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस चालवले जातात. नवीन कॅम्पस १७५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. नवीन कॅम्पसमधील इमारती उच्च तंत्रज्ञानाने बांधल्या गेल्या आहेत, त्या उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतात. विद्यापीठाचा स्वतःचा पॉवर प्लांटही आहे. (Nalanda University)
नवीन कॅम्पसमध्ये पीएचडीपासून बौद्ध अभ्यासापर्यंतचे अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुलही बांधण्यात आले आहे. नव्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचा परिसर एकूण ४५५ एकरमध्ये पसरलेला आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीही देण्यात येत आहे. प्राचीन नालंदा विद्यापीठ हे भारताचे वैभव होते. एका माथेफिरु शासकानं ते नष्ट केले असले तरी त्याच्या खुणा भारताच्या इतिहासातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. त्याच धर्तीवर नवीन नालंदा विद्यापिठाची भरभराट होईल, अशी आशा तमाम भारतीयांना आहे.
सई बने