१९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या एका मताने कोसळलं होतं. आधी १३ दिवसांचं नंतर १३ महिन्यांचं सरकार वाजपेयींनी सांभाळलं. वाजपेयी यांचं सरकार कोसळलं त्यासाठी एक काँग्रेसचा मुख्यमंत्री कारणीभुत होता. पण लोकसभेत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची भुमिका निर्णायक कशी ठरली? पण तेरा महिन्यांचं चाललेलं वाजपेयी सरकार कसं कोसळलं? यात अण्णा द्रमुक आणि काँग्रेसची काय भुमिका होती ? जाणून घेऊया आजच्या लेखातून. (Atal Bihari Vajpayee)
१९९६ साली काँग्रेस पराभूत झाली आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला १४० जागा मिळाल्या होत्या तर भाजपला १६१ जागा मिळाल्या होत्या. भाजप लोकसभेत जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. १९९१ च्या तुलनेत काँग्रेसच्या ९२ जागा घटल्या होत्या. तर भाजपच्या ४० जागा वाढल्या होत्या. भाजपला बहुमतासाठी आणखी १११ जागांची गरज होती. भाजप लोकसभेत सर्वाधिक मोठा पक्ष असल्याने राष्ट्रपतींनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. भाजपनेही सत्तास्थापनेचा दावा केला. मित्रपक्ष जमवण्यापूर्वी वाजपेयींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण लोकसभेत जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा वाजपेयी अपयशी ठरले. आधी मित्रपक्ष जुळवून, संख्याबळ मिळवून जर वाजपेयींनी सत्तास्थापनेचा दावा केला असता तर १३ दिवसांत सरकार कोसळलं नसतं असं राजकीय जाणकार सांगतात.
पुढे दोन वर्षात देवेगौडा आणि गुजरात पंतप्रधान झाले. १९९८ चं गुजरात यांचं सरकार कोसळलं. नव्याने निवडणुका झाल्या. तेव्हा पुन्हा भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. यावेळीही भाजपला बहुमत मिळालं नाही. यावेळी भाजपने कुठलाही धोका पत्करायचा ठरवला नव्हता. भाजपचा १८२ जागांवर विजय झाला होता. भाजपचा मित्रपक्ष अण्णद्रमुकला १८ जागा मिळाल्या होत्या. संपूर्ण NDA ला मिळून २६१ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू वाजपेयींच्या मदतीला धावले. नायडू यांना १२ जागा मिळाल्या होत्या. नायडु यांच्यामुळे वाजपेयींना बहुमत मिळालं. आणि वाजपेयींनी सत्तास्थापनेचा दावा केला. वाजपेयींनी शपथ घेतली आणि लोकसभेत बहुमतही सिद्ध केलं. (Atal Bihari Vajpayee)
वाजपेयींचं सरकार सुरळीत सुरु होतं. पण अण्णाद्रमुकच्या जयललिता आणि वाजपेयी यांचे मतभेद झाले. वाजपेयींनी जयललिता यांचा पाठिंबा फार महत्त्वाचा होता. कारण एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जयललिता यांच्या अण्णाद्रमुक यांच्याकडे होत्या. जयललिता यांच्या काही अटी आणि शर्ती मान्य न केल्यामुळे त्यांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतला अशी नोंद मिलिंद चंपारनेकर संपादित ‘असा घडला भारत’ या ग्रंथात नमूद आहे. तमिळनाडूतील करुणानिधींचे द्रमुक सरकार पाडा अशी मागणी जयललिता यांनी केली आणि वाजपेयी यांनी ती नाकारली, त्यामुळे जयललिता यांनी पाठिंबा काढला असेही सांगितले जाते.
जयललिता यांनी पाठिंबा काढून टाकल्यानंतर वाजपेयींना बहुमत चाचणी द्यावी लागली. आणि एका मतामुळे त्यांचे सरकार गेले. हे सरकार नेमके कसे गेले याचा किस्सा काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितला आहे. मुखर्जी यांनी The Coalition Years 1996-2012 मध्ये याबाबत सविस्तर लिहिले आहे. मुखर्जी म्हणतात की १७ एप्रिल १९९९ ला संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी बहुमत चाचणी पार पडली. काँग्रेसच्या खासदारांनी एनडीएविरोधात मतं टाकली. या सगळ्यात काँग्रेच्या मुख्यमंत्र्यांचं एक मत निर्णायक ठरलं. आता तुम्ही म्हणाल की लोकसभेत काँग्रेसचा मुख्यमंत्री कसा काय आला. तर त्याचं झालं असं की ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री जानकी बल्लभ पटनाईक हे एका बलात्काराच्या केसमध्ये अडकले. (Atal Bihari Vajpayee)
====================
हे देखील वाचा : नेहरूंनी वाजपेयीं विरोधात प्रचाराला नाही म्हटले!
====================
सोनिया गांधी तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी पटनाईक यांना पदावरून हटवलं आणि काँग्रेस खासदार गिरीधर गमंग यांना मुख्यमंत्रीपदी नेमलं. जेव्हा वाजपेयी सरकारची बहुमताची चाचणी झाली तेव्हा गमंग खासदार होते आणि सभागृहात हजर होते. त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिलं आणि वाजपेयी सरकार कोसळलं. गमंग यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. गमंग एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना मत देण्याचा अधिकार नाही अशी बाजू मांडली.
पण लोकसभा अध्यक्ष म्हणाले की गमंग जरी एका राज्याचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी अजून खासदारकीचा राजीनामा दिला नाही. आणि मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतरही त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभेत निवडून येणे अनिवार्य आहे. म्हणून कायदेशीररित्या गमंग यांचे मत ग्राह्य धरले गेले आणि वाजपेयी सरकार कोसळले. पुढे १९९९ साली पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या. भाजप पुन्हा मोठा पक्ष ठरला आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी त्यांनी पाच वर्षांची आपली टर्म पूर्ण केली. २०१५ साली हेच गमंग भाजपमध्ये सामील झाले. ज्या व्यक्तीमुळे वाजपेयींचं सरकार कोसळलं तीच व्यक्ती भाजपवासी झाली होती. (Atal Bihari Vajpayee)