आज अनेक वर्ष होऊन गेली तरी महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास ऐकला कि अंगावर सर्रsssकन काटा येऊन जातो. आधी स्वराज्य उभारण्यासाठी मग स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी, आपल्या राजाशी एकनिष्ठ राहून आपल्या मातीसाठी, रायातेसाठी जीवाचं रान करणाऱ्या मराठी मावळ्याची गोष्ट ऐकली कि, आश्चर्य, कौतुक, नवल आणि अभिमानही वाटतो.
मुठभर सैन्यानिशी चाल करायची मात्र शत्रूच्या बलाढ्य सैन्याला पळता भुई थोडी करायची ही तर आपल्या सैन्याची खरी ताकद, बुद्धीमत्ता आणि समयसूचकता होती. अशा अनेक लढाया मराठ्यांनी सहज फत्ते केल्याची साक्ष देतो इतिहास. पण आजच्या दिवशीची मराठ्यांच्या इतिहासातील एक गोष्ट लढाई पलीकडे पण काहीतरी सांगते.
ज्याचं आरमार त्याचा समुद्र या तत्वाला जाणून शिवाजी महाराजांनी १६७० पर्यंत त्याचं आरमार उभं करायला सुरवात केली. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्दुर्ग असे किल्ले स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी उभारण्यात आले. नंतर महाराजांच्या आदेशानुसार मायनाथ भंडारी आपल्या १५० सहकाऱ्यांना घेऊन आणि सोबत ४ तोफा घेऊन खांदेरी बेटावर येऊन पोचले. भांडारींच्या सहकाऱ्यांनी वेळ पडल्यास इंग्रज आणि सिद्धी कडून होणार्या आक्रमणात धारकरी होण्याची दुहेरी भूमिका निभावली. पण खांदेरीचे तट आणि बुरुज उभे केले.
किल्ल्याची रचना अशी आहे कि, बुरुजावरून खाली बघितलं, असता असं दिसतं कि काही दगड बांधकाम करत असताना खाली निसटून पडले असावे. पण वास्तविक ती किल्ल्याच्या पायथ्याशी केलेली एक दगडी रचना आहे ज्यामुळे भरतीच्या लाटांच पाणी अडवलं जाऊन त्याचा जोर कमी होतो आणि लाटा अलगद पायथ्याशी आदळतात.७ सप्टेंबर १६७९ मध्ये सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
पुढे शाहू महाराजांच्या काळात; वाढत्या परकीय आक्रमणांना तोंड देण्यासाठी भारतीय सीमेचे रक्षण किती महत्वाचे आहे ह्याची दूरदृष्टी आणि त्या विषयीच्या योजना असणारे कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या इतिहातलं सोनेरी पान आपल्या मोठ मोठ्या कामगिरींसाठी ओळखलं जाऊ लागलं. कान्होजी आंग्रे हे ‘समुद्राचे राजे’ म्हणून ओळखले जायचे. पश्चिम किनाऱ्यावर निव्वळ आंग्रेंशी लढण्यासाठी इंग्रजांचे एक स्वतंत्र आरमार होते ज्याचा वार्षिक खर्च पाच लाख होता. उत्तोमात्त्म जहाजे, मोठ्ठा तोफखाना असल्यावर समुद्रातील कोणतीही युध्द जिंकता येतील असा समज असलेल्या इंग्रजांना शेवटी मराठ्यांनी धूळ चारली. अजूनही खांदेरी किल्ल्याला कान्होजी आंग्रे या नावाने ओळखलं जातं.
पुढे १ नोव्हेंबर १७१८ मध्ये कान्होजींच्या हाती हा किल्ला असताना, मुंबईचा गवर्नर १८ उत्कृष्ट युध्द नौका संपूर्ण शस्त्रसाठा आणि दारूगोळ्या सह शिवाय बॉम्ब फेकणाऱ्या दोन युद्धनौका, प्रचंड दारुगोळा आणि शस्त्रसज्ज ३००० सैनिक घेऊन खांदेरीवर चाल करून आला. पण २४ दिवस सलग तोफा, दारुगोळा, उडवून अखेरीस इंग्रज मुंबईकडे परतले. निव्वळ ५०० मावळ्यांसह कान्होजींनी हा गड राखला.
मराठ्यांच्या इतिहासातील अनेक घटनांपैकी पण कदाचित काहीशी दुर्लक्षिलेली ही एक घटना, आजही युद्धशास्त्र, नीती, आखणी, आणि विजय मिळवण्याची जिद्द बघितली की आपली छाती अभिमानाने भरून येते.
– कांचन नानल.