उत्तराखंडच्या प्रत्येक भागात मंदिरे आहेत, आणि या मंदिरांमागे पौराणिक कथा आहेत. त्यापैकीच एक असलेल्या मंदिरात आता महोत्सव सुरु झाला आहे. उत्तराखंडमध्ये 14 मार्चनंतर हा उत्सव साजरा करण्यात येतो. याला छोटी नवरात्र असेही म्हणतात, याच नवरात्रीनिमित्त येथील देवींची मंदिरे सजवण्यात आली असून त्यातील प्रमुख मंदिर म्हणजे, गंगोलीहाट, पिथौरागढ येथील हाट कालिका मंदिर. (Hat Kalika Temple)
गुरु आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले हे शक्तीपीठ हजार वर्षांहून अधिक जुने आहे. विशेष म्हणजे, या मंदिरात पुजेचा मान सैनिकांचा आहे. भारतीय सैन्यातील बलाढ्य कुमाऊँ रेजिमेंटची ही देवी आहे. या रेजिमेंटमधील सैनिक येथे नित्यनियमानं पुजा करण्यासाठी येतात. हाट कालिका मंदिराच्या मुळाशी पाताळ गंगा वाहते असेही सांगण्यात येतात. असेच हे शक्तीपिठ आता नवरात्रीनिमित्त भक्तांनी गजबजून गेले आहे.
उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोलीहाट येथील हाट कालिका मंदिर हे हजार वर्षापासून असल्याची माहिती आहे. कलकत्त्याची काली माँ जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच पिथौरगढची हाट कालिका मंदिर आहे. कुमाऊँ रेजिमेंटची ही पूजनीय देवी आहे. त्यामागे एक कथा सांगितली जाते. युद्धादरम्यान कुमाऊँ रेजिमेंटची एक तुकडी एका जहाजातून प्रवास करत होती.(Hat Kalika Temple)
यावेळी जहाजात तांत्रिक बिघाड झाला आणि जहाज बुडू लागले. या तुकडीत पिथौरागढ येथील रहिवासी लष्करी अधिकारी म्हणून होता. त्यानं आपल्या हात कालिका मातेला मदतीसाठी हाक मारली. त्यानंतर बुडणाऱ्या
जहाजाने आश्चर्यकारक किनारा गाढला. तेव्हापासूनच हाट कालिका मंदिर कुमाऊं रेजिमेंटची पूजनीय देवी मानली जाते. आजही नियमितपणे कुमाऊं रेजिमेंटकडून मंदिरात नियमित पूजा केली जाते. ‘कालिका माता की जय‘ हा कुमाऊँ रेजिमेंटचा लढाईचा जयघोषही मातेच्या नावावरुन आहे. (Hat Kalika Temple)
हाट कालिका मंदिर गंगोलीहाट या निसर्गरम्य ठिकाणी आहे. हा संपूर्ण परिसर देवनार वृक्षांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकही मोठ्या संख्येनं येतात. या कालिका मातेची शक्तीच्या रूपात पूजा केली जाते. या मंदिरासंदर्भात सांगण्यात येणा-या अन्य एका कथेत स्कंद पुराणाचा संदर्भ देण्यात आला आहे. सुम्या नावाच्या राक्षसाने या संपूर्ण भागात उपद्रव केला होता. त्याने देवांचाही पराभव केला. त्यानंतर देव शैल पर्वतावर आले आणि त्यांनी या राक्षसापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली. त्यावर देवांनी माता दुर्गेने महाकालीचे रूप धारण केले आणि नंतर सुम्या या राक्षसाचा संहार केला. त्यानंतर या ठिकाणी महाकालीची शक्तीपीठ म्हणून पूजा केली जाते. काही पौराणिक ग्रंथात याच ठिकाणी महाकालीने महिषासुर रक्तबीज सारख्या राक्षसांचा वध केल्याचा उल्लेख आहे.
आदीगुरु शंकराचार्यही याच भागात अनेक वर्ष ध्यान करीत होते. त्यावेळी हे स्थान अतिशय निर्जन होते. या भागात घनदाट झाडी होती. वन्यपशुंच्या भीतीमुळे सहसा या मंदिरात कोणीही जात नव्हते. अशावेळी मंदिराबद्दल असलेली सर्व भीती शंकराचार्यांनी दूर करून मंदिराची पुर्नबांधणी केली आणि मंदिराला भव्य स्वरुप दिले. (Hat Kalika Temple)
या मंदिरात शतकानुशतके एक परंपरा आहे. मंदिराचे पुजारी रात्री मंदिर बंद करतांना देवीसाठी पलंग लावतात. सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले असता या पलंगावर सुरकुत्या पडलेल्या दिसतात. या ठिकाणी रात्री महाकाली स्वतः आराम करते, अशी स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे. मंदिरात पूजा केल्यानं भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असेही म्हटले जाते. मंदिरात भाविक आपली इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा येऊन घंटा वाजवण्याची परंपरा आहे. (Hat Kalika Temple)
============
हे देखील वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीताचे शिक्षण माहितेय का?
===========
मातेला शक्तीचे रुप म्हणून पुजणा-या या मंदिरात अनादी काळापासून पवित्र अग्नी सतत प्रज्वलीत आहे. काही वर्षापूर्वी, संत जंगम बाबा यांनी या मंदिराची नव्यानं उभारणी केली. त्यांना स्वप्नात येऊन देवीनं मंदिराचा आदेश दिल्याची माहिती आहे. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धानंतर सुभेदार शेरसिंग यांच्या नेतृत्वाखाली कुमाऊं रेजिमेंटने महाकालीची मूर्ती मंदिरात स्थापन केल्याचीही माहिती आहे. कुमाऊं रेजिमेंटचे सैनिक मंदिरात येऊन देवीला वस्त्र अर्पण करतात. आता याच माता कालिका मंदिरात उत्सव सुरु झाला असून या छोट्या नवरात्रीसाठी मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात येत आहेत.
सई बने