Home » कधीही गुगली न देणारे गुगल!

कधीही गुगली न देणारे गुगल!

by Correspondent
0 comment
Share

आज एकविसाव्या शतकात ‘गुगल’ माहित नाही, असा मनुष्यप्राणी सापडणे मुश्कीलच! लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच जवळचा मित्र म्हणजे गुगल. अगदी काहीही सर्च करायचे झाल्यास ‘गुगली’ न देता, अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत उत्तरं देण्याचे काम गुगल करते. म्हणूनच इतर सर्च इंजिनांपेक्षा गुगलचा ‘फेम’ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे! बर्‍याचदा गुगलला ‘टेक्नॉलॉजीचा राक्षस’ असे म्हटले जाते. परंतु संकटकाळात आपल्याला तारून नेणारे हे सर्च इंजिन ‘देवाइतकेच थोर’, असे म्हणणे देखील योग्य ठरेल.

आज आहे गुगलचा स्थापना दिवस!
वास्तविक गुगलची स्थापना ०४ सप्टेंबर १९९८ ला झाल्याची नोंद आहे. २००४ पर्यंत गुगल या दिवशीच आपला वाढदिवस साजरा करत होते; परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागे देखील एक कारण आहे! ते म्हणजे २७ सप्टेंबर या दिवशी सर्वाधिक पेज व्ह्यू मिळाल्याची घोषणा गुगलमार्फत करण्यात आली होती. त्यामुळे आपला ‘खरा वाढदिवस’ याच दिवशी साजरा करण्यात यावा, असा गुगलचा अट्टाहास !!! परंतु ०४ सप्टेंबर १९९८ रोजी गुगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं, हे काही नाकारता येत नाही.

तर या निमित्ताने गुगल विषयीच्या काही गमतीजमती पाहूया!

‘गुगल’ या शब्दाचा नक्की अर्थ काय, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
गुगोल (इंग्रजीत Googol) म्हणजेच एकावर शंभर शून्य! याचा अपभ्रंश करून ‘गुगल’ या शब्दाचा जन्म झाला आणि नावातील शून्यांप्रमाणे कंपनीचा आवाका वाढत गेला.

गुगलच्या संशोधकांनी आधी ‘Backrub’ असे नाव गुगलला दिले होते. परंतु कालांतराने पुन्हा नामकरण समारंभ करण्यात आला आणि गुगलला नवी ओळख मिळाली.

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असेल, तर आपण गुगल सर्च करतो, बरोबर ना? पण दर सेकंदाला गुगल किती लोकांना किती प्रश्नांची उत्तरं देत असेल याचा शोध घेतला तर हा आकडा ४० हजारांवर जातो. म्हणजेच दर सेकंदाला गुगलवर चक्क ४०००० गोष्टी सर्च केल्या जातात.

गुगल डुडल हे आजकाल फार प्रचलित आहे. कोणताही सण-समारंभ असो वा विशेष दिन असो; गुगल आपल्या सर्च इंजिन होम पेजवर लोभसवाणे डूडल्स दाखवत असते. सोशल मीडियावर तर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो!

गुगलचे आजचे भरभक्कम रूप आपल्याला माहितीच आहे. पण सुरु केलेला व्यवसाय नेहमी जोमानेच चालेल, असे नसते. गुगललाही या वास्तवाचा फटका बसला होता. गुगलच्या मालकांनी गुगल विकण्याचे ठरवले होते. तसा प्रस्तावही ‘याहू’ या सर्च इंजिन कडे पाठवला होता! मात्र याहूने हा प्रस्ताव नाकारला आणि गुगलच्या मालकांनी गुगलचा विकास करण्याचे ठरवले. आज हेच गुगल शंभराहून अधिक भाषांमध्ये काम करते. ‘हे गुगल (Hey Google)’ किंवा ‘ओके गूगल’ अशी हाक मारताच सेवेला तत्पर असते.

या सगळ्या गमतीजमतींचा विचार करताना ‘आज जर गुगल नसते तर…’ असा प्रश्न सहज मनात डोकावतोच. आज जर गुगल हजर नसते, तर गुगल सारख्या हजारोंमधल्या एखाद्या कंपनीने सर्च इंजिन क्षेत्रात बाजी मारली असती. अन्यथा आपल्या ग्रंथालयांच्या फेर्‍या नक्कीच वाढल्या असत्या !वेळेत हवी ती माहिती मिळाली नसती आणि सगळ्या क्षेत्रातील अभ्यास मंदावला असता.. खरंच गुगलने सगळंच काम किती सोयीस्कर केलंय!

गुगल बाबा.. आमच्यावर अशीच कृपा करत राहा!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.