हरिद्वार येथील माया देवीचे मंदिर (Maya Devi Temple) चैत्र नवरात्रीनिमित्त सजवण्यात आले आहे. या माया देवीच्या मंदिरात नवरात्री आणि सोबत येणा-या निवडणुकीच्या निमित्तानं मोठी गर्दी झाली आहे. ११ व्या शतकातील या मंदिराला देवी सतीचे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. उत्तराखंड राज्यातील हरिद्वार या पवित्र शहरात अनेक पौराणिक वारसा सांगणारी मंदिरे आहेत, त्यापैकी माया देवी मंदिर प्रमुख आहे. देवी सतीचे हृदय आणि नाभी या मंदिराच्या परिसरात पडली असल्यानं या मंदिराला शक्तीपीठ म्हणूनही ओळखले जात आहे. चैत्र नवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यासाठी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
११ व्या शतकात बांधलेले हे देवी मंदिर (Maya Devi Temple) भारतातील प्रमुख शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. देवी माया ही हरिद्वारची प्रमुख देवता आहे. ही देवी तीन मुखी आणि चार हात असलेली असून तिची शक्तीची देवता म्हणन पुजा केली जाते. माया देवीची धातुची मुर्ती असून ती अतिशय पुरातन आहे. या देवीच्या नावावरुनच हरिद्वारला पूर्वी मायापुरी म्हणून ओळखले जात होते. हरिद्वारमध्ये तीन शक्तीपीठे प्राचीन काळापासून त्रिकोणाच्या स्वरूपात वसलेली आहेत. त्रिकोणाच्या उत्तरेला मनसा देवी, दक्षिणेला शितला देवी आणि पूर्वेला चंडी देवी आहे.
या त्रिकोणाच्या मध्यभागी क्षेत्राची प्रमुख देवता भगवती माया देवी आहे. त्याच्या उजव्या बाजूला, दक्षेश्वर महादेवाचे स्थान आहे. येथे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भक्तांची भावना आहे. या मंदिरात दोन्हीही नवरात्रीला उत्सव असतो. तसेच कुंभमेळ्याच्या काळातही या माया देवी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. माया देवी हरिद्वारची प्रमुख देवता असून या तीर्थक्षेत्राला अनेक संकटांपासून वाचवण्याचे काम मायादेवी करते, असे स्थानिक सांगतात. हरिद्वारमध्ये अनेक भाविक तिर्थयात्रेसाठी येतात. येथील अनेक मंदिरांना भेट देतात. पण या भाविकांची तीर्थयात्रा माया देवी मंदिरात गेल्याशिवाय पूर्ण होत नाही असे मानले जाते. माया देवी, आपल्या भाविकांची ,डाकिनी, शकिनी, पिशाचिनी या दुष्ट शक्तींपासून रक्षण करते, असे सांगितले जाते. (Maya Devi Temple)
हिंदू धर्मग्रंथांमध्ये हरिद्वारला मोक्षाचे शहर म्हटले गेले आहे. हरिद्वारमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमुर्ती राहतात, असे मानले जाते. परंतु त्यासोबतच देवी सतीचे म्हणजे, माया देवीचेही हे स्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. मायादेवी हे शक्तिपीठ भगवान शंकराच्या प्रेमाचे आणि माता सतीच्या बलिदानाचे साक्षीदार असल्याचे स्थानिक सांगतात. माता सती ही सतीकुंड येथे आपला देह सोडून महामायेच्या रूपात हरिद्वार येथे आली. त्यामुळे या स्थानाला माया देवी असे नाव पडले. यानंतर हरिद्वारची ओळख मायापुरी अशी झाली. आपल्या देशात असलेल्या सात पुरींमध्ये या मायापुरीचा म्हणजेच हरिद्वारचाही समावेश करण्यात आला आहे.
११ व्या शतकातील मायादेवी मंदिराचा अनेकवेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिरात माया देवी सोबत काली माता आणि देवी कामाख्या या देवींचे स्थानही आहे. माया मंदिरात धार्मिक विधींसोबतच तंत्र साधनाही केली जाते. असे मानले जाते की, या मंदिरातील देवींच्या फक्त दर्शनाने विघ्न दूर होतात. या माया देवी मंदिरात अनेक भक्त नवसही करतात. नवरात्रीमध्ये हे भक्त नवस फेडण्यासाठी गर्दी करतात. या मंदिराचे व्यवस्थापन जुना आखाड्यातर्फे ठेवण्यात येत आहे. (Maya Devi Temple)
श्री पंच दशनम जुना आखाड्याचे महंत हरिगिरी महाराज हे मायादेवीची पूजा करतात. देवीच्या सर्व शक्तीपीठांचा उगम मायादेवी शक्तीपीठापासून झाला असल्याचे ते सांगतात. या मंदिरात देवीची सकाळ, संध्याकाळी आरती केली जाते. त्यातही देवीच्या संध्याकाळच्या आरतीसाठी हजारो भक्त उपस्थित असतात. या मंदिराची वास्तुकला उत्तर भारतीय वास्तुकलेशी साधर्म्य असणारी आहे. हे मंदिर सकाळी सहा वाजता उघडण्यात येते. दुपारी बारा वाजता आरती करुन मंदिर बंद करण्यात येते.
============
हे देखील वाचा : २०२४ चे सूर्यग्रहण दिसणार या शहरात…
============
त्यानंतर दुपारी ३ वाजता मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात येते. रात्री ९ वाजता देवीची भव्य आरती होते, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतात. हा संपूर्ण मंदिर परिसर बघण्यासाठी आणि या मंदिरातील पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी दोन तास लागतात. मार्च महिन्यापासून या मंदिरात येणा-या भक्तांची संख्या वाढते. कारण या दरम्यान हरिद्वारचे वातावरण आल्हाददायक होते. आता सुरु होणा-या चैत्र नवरात्रौत्सवासाठी येथे हजारो भक्त येतात.
सई बने