जगातील सर्वात मोठ्या भूमिगत शहराची माहिती ही आपल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी आहे. हे शहर आजकालच्या आधुनिक साधनांचा वापर करुन तयार केलेलं नाही. कारण हे शहर जवळपास 1000 वर्ष जुनं असल्याची माहिती आहे. या भूमिगत शहरात 20 हजार नागरिक राहत होते. त्यांची घरंही अतिशय अलिशान आणि भूमिगत असली तरी हवेशीर होती. हे जगातील सर्वात भूमिगत शहर तुर्कीमध्ये आहे. डेरिंक्यु नावाच्या या भूमिगत शहराला बघण्यासाठी आता हजारो पर्यटकांची गर्दी असते. तुर्कीच्या नेव्हसेहिर प्रांतातील हे डेरिंक्यु शहर 85 मीटर खोलीपर्यंत आहे. यात 20,000 नागरिक त्यांच्या पशुधनासह राहत होते. या सर्वांसाठी पुरेसा अन्नसाठा ठेवण्याची व्यवस्थाही येथे आहे. फक्त तुर्कस्तानमधील नाही तर जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर असलेल्या या डेरिंक्यु शहराचा शोध कसा लागला हे जाणून घेतले तरी आश्चर्य वाटेल. या भागातील एका श्रीमंत माणसाच्या कोंबड्या रातोरात गायब होत असत. या गायब होणा-या कोंबड्या नेमक्या कुठे जातात हे शोधण्यासाठी या माणसांनं पाळत ठेवली. तेव्हा त्याला त्याच्या घराभोवती असलेल्या जागेत मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या. या भेंगांची त्यांनी तपासणी केल्यावर त्याखाली पोकळी असल्याचे जाणवले. मग या भागात खोदकाम करण्यात आले, तेव्हा तब्बल पाचशे गुहा येथे असल्याचे समोर आले आणि त्यातूनच एक संपन्न असे भूमिगत शहर, डेरिंक्यु समोर आले. (Underground City)
जगातील सर्वात मोठे प्राचीन भूमिगत शहर म्हणून डेरिंक्यु या तुर्कस्तानमधील शहराची नोंद आहे. जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे भूमिगत शहर म्हणून डेरिंक्युचा उल्लेख होतो. विशेष म्हणजे, या मोठ्या शहराचा शोध कोणत्याही भूवैज्ञानिक किंवा ऑर्कोलॉजिकल सर्व्हे टीमने लावला नाही. कोंबड्या पाळणा-या एका व्यक्तीच्या सतर्कतेमुळे हे भूमिगत शहर जगासमोर आलं आहे. तुर्कीतील कॅपाडोशियामध्ये डेरिंक्यु नावाचा हा मोठा बोगद्यासारखा भाग सापडला आहे. ज्यामध्ये एक संपूर्ण शहर सामावलेले आहे. या शहराची बांधणी म्हणण्यापेक्षा ते खोदतांना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या होत्या. एकूण 11 स्तरांमध्ये बांधलेल्या बोगद्याला 600 प्रवेशद्वार आहेत. या भूमिगत शहरात लोकांची आलिशान घरे, सामुदायिक इमारती, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, चर्च आणि अगदी स्मशानभूमी देखील आहे. इतकेच काय, भूमिगत असूनही या शहरात अनेक उंच इमारती असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Underground City)
डेरिंक्यु शहरातील या उंच इमारती अलिशान होत्या. त्यात जाण्यासाठी आणि हवेसाठी व्यवस्थित रचना करण्यात आली होती. या उंच इमारतींमध्ये जाण्यासाठी पायऱ्याही बनवल्या होत्या. यातील प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या प्रवेशद्वारावर दगडी दरवाजे बसविण्यात आले होते. हे दरवाजे दीड मीटर लांब आणि 200 ते 500 किलो वजनाचे होते. हजार वर्षापूर्वी उभारलेल्या या शहरात एवढे अवजड दरवाजे कशा पद्धतीनं बसवले असतील आणि मुळात हा बोगदा एवढा खोल कशा पद्धतीनं केला असेल, याचा शोध आता वास्तुशास्त्रज्ञ घेत आहेत. हजार वर्षापूर्वीची ही वास्तुकला आजच्या वास्तुशास्त्राचा अभ्यास करणा-यांसाठीही उत्सुकतेची आहे. त्यामुळे या डेरिंक्यु शहराला भेट देणा-यांमध्ये अभ्यासकांचा अधिक भरणा असतो. पृथ्वीच्या आत एवढी समृद्ध शहरे कशी उभारली असतील याचा शोध ही मंडळी घेत आहेत.(Underground City)
डेरिंक्यु शहर कसे सापडले, याचीही एक रंजक गोष्ट आहे. 1963 मध्ये पहिल्यांदा हे शहर समोर आले. या भागातील एका श्रीमंत व्यापा-याच्या कोंबड्या अचानक गायब होऊ लागल्या. तेव्हा या व्यापा-यांनी या गायब होणा-या कोंबड्यांचे कोडे सोडविण्यासाठी रात्रभर पहारा द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याला दिसले की, विशिष्ट भागात गेल्यावर कोंबड्या खाली जात आहेत. त्यानं या भागाला खोदण्यास सांगितले. तेव्हा त्याखाली मोठी पोकळी असल्याचे दिसले. अधिक खोदकाम केल्यावर ही पोकळी म्हणजे मोठे बोगदे असल्याचे स्पष्ट झाले. त्याव्यक्तीनं हा काही वेगळाच शोध लागला आहे, हे जाणून याची प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर याभागात पुरातत्वशास्त्रज्ञ आले. त्यांच्या देखरेखीखाली खोदकाम केल्यावर 500 हून अधिक बोगदे असल्याचे स्पष्ट झाला. या बोगद्यांमध्ये भूमिगत घरे, रेशन गोदामे, शाळा, वायनरी, चर्च यांसारख्या गोष्टीही सापडल्या. हे संशोधन सुमारे 20 वर्षे चालले आणि त्यानंतर 1985 मध्ये डेरिंक्यू या भूमिगत शहराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. (Underground City)
========
हे देखील वाचा : दुबईमध्ये सध्या एका घराची विक्री चर्चेत
========
अभ्यासकांच्या सांगण्यानुसार हजारो वर्षांपूर्वी येथे अतिशय शांतताप्रिय लोक राहत असत. तुर्क ओट्टोमन साम्राज्याच्या शासकांनी या भागावर आक्रमण करायला सुरुवात केल्यावर आपला जीव वाचवण्यासाठी या नागरिकांनी भूमिगत शहर बांधायचा निर्णय घेतला. यातून त्यांनी आपल्या समाजाचे संरक्षण केले. डेरिंक्यु शहराचे वास्तुशास्त्र हे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही मागे टाकेल असेच आहे. डेरिंक्यु भूमिगत शहरात मोठ्या रोलिंग स्टोनचे दरवाजे असून ते आतून बंद केले जाऊ शकतात. या शहरातील प्रत्येक इमारतींचा मजला स्वतंत्रपणे बंद केला जाऊ शकत होता. शत्रूचे आक्रमण झाल्यास त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ही सुरक्षा पद्धती होती. येथे जवळपास 180 फूट खोल विहिरी खोदण्यात आल्या होत्या. त्यातील पाणी काढण्यासाठी व्यवस्थाही होती. 20,000 वस्ती असलेल्या या शहरातील मुलांना शिक्षणाचीही व्यवस्था होती. डेरिंक्यु येथील शहर पूर्णपणे बायझँटाईन युगात तयार झाले असल्याचे काही संशोधक सांगतात. भूमिगत वसाहतींमध्ये सापडलेल्या काही कलाकृती 5 व्या आणि 10 व्या शतकादरम्यानच्या मध्य बीजान्टिन कालखंडातील आहेत. ही शहरे 14 व्या शतकात तैमूरच्या मंगोलियन आक्रमणापासून बचाव करण्यासाठी उभारल्याचेही काही अभ्यासक सांगतात. आता हेच भूमिगत शहर वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून पाहण्यात येत आहे.
सई बने