प्राचीन भारतात गुरुकुल शिक्षण पद्धती प्रचलित होती. यामध्ये विद्यार्थी ठराविक कालावधीसाठी आपल्या गुरुच्या निवासस्थानी, म्हणजेच आश्रमात राहण्यासाठी जात असत. काही काळासाठी हे विद्यार्थी गुरुच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत. यात वेद, उपनिषद, यांच्यासह शस्त्रास्त्रांचे शिक्षणही असे. काळानुसार ही गुरुकुल पद्धती कमी झाली. (Forest School)
मुख्य म्हणजे, इंग्रजी राजवट आल्यावर गुरुकुल शिक्षण पद्धतीला जुनाट ठरवत बंद करण्यात आले. त्याजागी इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांवर लादण्यात आली. आता तर इंग्रजी माध्यमातील शिक्षण म्हणजेच प्रगती असे मानले जाते. मात्र ज्या इंग्रजांनी गुरुकुल पद्धतीला जुनाट म्हटले त्याच इंग्रजांच्या देशात म्हणजे, इंग्लडमध्ये फॉरेस्ट स्कूल अर्थात वनशाळा नावाची संकल्पना बहरत आली आहे. फॉरेस्ट स्कूल असोसिएशन ही युनायटेड किंगडममधील फॉरेस्ट स्कूलसाठी व्यावसायिक संस्था आहे. ही संस्था इंग्लडमध्ये फॉरेस्ट स्कूल विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. (Forest School)
प्राचीन भारतात गुरुकुल शिक्षण पद्धती प्रसिद्ध होती. ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असत. उपनिषदांमध्ये या गुरुकुल पद्धतीचा उल्लेख आहे. प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांचे शिक्षण अशाच गुरुकुल पद्धतीमध्ये झाले. संपन्न अशा या गुरुकुल पद्धतीला काळाचा फटका बसला. संस्कृत भाषेतील शिक्षण कमीपणाचे वाटू लागले. तसेच वारंवार होणा-या आक्रमणांचाही फटका या गुरुकुल शिक्षणाला झाला.
आक्रमकांनी संपन्न अशा ग्रंथसंपदेवरही हल्ला केला. त्यांना जाळून टाकण्यात आले. अनेक प्रसिद्ध अशा गुरुकुलांना जाळून टाकण्यात आले. हळूहळू ही गुरुकुल पद्धती बंद होत गेली. इंग्रजांनी तर या गुरुकुल पद्धतीला जुनाट असेच लेबल लावले. आधुनिक काळासाठी हे शिक्षण उपयोगी नसल्याचे कारण देत गुरुकुले बंद करण्यात आली. सोबत संस्कृत ऐवजी इंग्रजी भाषा आली. गुरुकुल पद्धतीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून विद्यार्थी शिक्षण घेत असत. मात्र शाळा सुरु झाल्यावर हेच शिक्षण चार भिंतींच्या आड देण्यात येऊ लागले. आता भारतात काही मोजक्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण दिले जाते.
पण ज्या इंग्रजांनी भारतात गुरुकुल पद्धत बंद पाडली त्याच इंग्रजांच्या देशात आता फॉरेस्ट स्कूल नावाची संकल्पना रुजली आहे. या वनशाळांमध्ये मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण देण्यात येते. ठराविक साचेबद्ध शिक्षण न देता, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार शिक्षम देऊन, त्याला निसर्गाबरोबर जोडणे हा या फॉरेस्ट स्कूलचा प्रमुख उद्देश आहे. निसर्गाच्या सानिध्यात या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त खेळालाही महत्त्व देण्यात आले आहे. फॉरेस्ट स्कूलचा अभ्यास विकसीत करण्यासाठी जगभरातील मान्यवरांची मते घेण्यात आली आहेत. या फॉरेस्ट स्कूलचा अभ्यासक्रम तयार करतांना या मान्यवरांच्या मतांचा विचार करण्यात आला आहे. (Forest School)
इंग्लडसोबत स्कॅन्डिनेव्हिया देशांमध्ये हा उपक्रम सुरु झाला आहे. यात नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क यांचा समावेश आहे. 1993 मध्ये इंग्लडमध्ये पहिले फॉरेस्ट स्कूल सुरु झाले आहे. आता ही संकल्पना येथील अनेक पालकांना आवडली असून आपल्या मुलांना ते या फॉरेस्ट स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवत आहेत. फॉरेस्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासंदर्भात काम केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना निसर्गाचे महत्त्व शिकवले जाते.
================
हे देखील वाचा : दुबई, अमेरिकेसह ‘या’ देशांमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणी हे आहेत कायदे
================
याच फॉरेस्ट स्कूलमधून (Forest School) बाहेर पडलेले विद्यार्थी आता फॉरेस्टस्कूल या संकल्पनेचा प्रचार करीत आहेत. निवासी अशा या शाळांची मागणी आता या देशांमध्ये वाढू लागली आहे. मुलांमध्ये प्रचलीत शिक्षण पद्धतीमध्ये तणाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण फॉरेस्ट स्कूलमधील विद्यार्थी या तणावापासून दूर राहत आपला विकास करीत आहेत, शिवाय त्यांचा सामाजिक दृष्टीकोनही विकसित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच फॉरेस्ट स्कूलची लोकप्रियता इंग्लडमध्ये वाढली आहे. फॉरेस्ट स्कूल असोसिएशन आता अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचा विकास होईलच शिवाय निसर्गाचीही जोपासना होईल, असे या संघटनचे मत आहे.
भारतात गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून विद्यार्थी शिक्षण प्राप्त करायचे. त्यांचे भाषेचे ज्ञान जेवढे संपन्न व्हायचे, तेवढेच त्यांचे शस्त्राचेही ज्ञान वाढायचे. पण ज्या इंग्रजांच्या काळात या गुरुकुलां बंद करण्यात आले. त्याच इंग्रजांच्या देशात अशाच शाळांची लोकप्रियता वाढू लागली आहे. यालाच म्हणतात काळाचा महिमा.
सई बने