सध्या जगभर बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. जिथे कधी पाऊस पडला नाही अशा भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर जिथे कायम पाऊस पडत असे, तो भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या देशातही वेगळी परिस्थिती नाही. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे तर अवकाळी पावसामुळे शेती उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मार्च, एप्रिल महिन्यात गारांचा पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी बेहाल झाला आहे. तयार पिक नष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे उभं पिक आडवं झालं आणि पावसाच्या पाण्यानं, गाराच्या मा-यानं पिकं हातातून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता चिंतेत सापडला आहे. या बदलत्या हवामानामुळे शेती करावी की नाही या विवंचनेत शेतकरी पडला आहे. मात्र शेतीच झाली नाही, उत्पादन घेतले नाही, तर अन्नपुरवठ्याचे काय. मोठी साखळीच यामुळे नष्ट होऊ घातली आहे. यामुळे या बदलत्या हवामानानुसार शेती करावी असे या क्षेत्रात काम करणा-या तज्ञांनी सुचवले आहे. अनेक शेतीतज्ञ पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीचे रुप देण्याची मागणी करत आहेत. या सर्वात चर्चेत आहे ते व्हर्टिकल फार्मिंग अर्थात उभी शेती. आपल्याकडे काही भागात ग्रीन हाऊस उभारुन फुलांची वा फळाची लागवड केली जाते. तशाच काहीशा पद्धतीनं होणारी ही व्हर्टिकल फार्मिंग परदेशात मोठ्या प्रमाणात केली जाते. अत्यंत कमी जागेत होणा-या या शेतीतून मुबलक उत्पादन घेतले जाते. अशाच पद्धतीची व्हर्टिकल फार्मिंग भारतातही सुरु करावी आणि त्यासाठी शेतक-यांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी पुढे येत आहे. (Foreign technology)
व्हर्टिकल फार्मिंग या विदेशी तंत्रज्ञानामुळे (Foreign technology) होणारी शेती ही शेतक-यांसाठी सर्वदृष्टीकोनातून फायदेशीर ठरत आहे. जगभर शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीत वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करणे कठीण होत आहे. त्यातच लहरी हवामानाचा फटका बसत आहे. यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होत आहे. या सर्वांतूनच जगभरात व्हर्टिकल फार्मिंग म्हणजेच उभ्या शेतीचा प्रचार केला जात आहे. ही उभी शेती म्हणजे एकावर एक ठेवलेले मोठे बॉक्सच असतात. ज्यामध्ये मोठ्या जमिनीची गरज नसते. अगदी थोड्या जागेतही ही शेती केली जाते. घराच्या भिंतीवर धान्याचे उत्पादन घेतले जाते. शेतीची ही एक अनोखी पद्धत आहे. यामध्ये कमी जागेत जास्त झाडे लावता येतात. त्यामुळे उत्पादनही अधिक होते.
पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पादन कमी असते. मात्र या व्हर्टिकल फार्मिंगनं शेतीला आधुनिक रुप दिलं आहेच शिवाय शेतीतील उत्पादन दुप्पटीनं नाही तर चौपट वाढवलं आहे. हे आधुनिक शेतीचे तंत्र अवलंबल्याने शेतकऱ्यांचा नफा वाढत आहे. या तंत्रांमुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचीही बचत होत आहे. व्हर्टिकल फार्मिंगला ठिबक सिंचन तंत्रज्ञानाची जोड देण्यात येते. आता संपूर्ण जगाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतीलाही कमी पाण्याचा फटक बसतो. अशावेळी व्हर्टिकल शेतीला ठिबक सिंचन पद्धतीची जोड दिल्यास अधिक फायदा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी सिंचनात मुबलक उत्पादन देणारे हे तंत्र आहे. या तंत्रामुळे पाणी थेट पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचते. ठिबक सिंचनामुळे 60 टक्के पाण्याची बचत होते आणि पिकाची उत्पादकताही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Foreign technology)
=======
हे देखील वाचा : घरबसल्या बदलता येईल बोर्डिंग स्टेशन, केवळ ‘या’ सोप्प्या टीप्स करा फॉलो
=======
शेड नेट फार्मिंग हे सुद्धा आधुनिक शेतीचे एक रुप आहे. हवामान बदलामुळे शेतीचे अपरमित नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस, वादळ, दुष्काळ, गारपीट, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून, ते कमी करण्यासाठी परदेशातील शेतकरी शेडनेट शेतीकडे वळले आहेत. वातावरणातील बदलांचा पिकांवर परिणाम होऊ नये, म्हणून पॉलीहाऊस, हरितगृहे, उभारण्यात येत आहेत. याचा मुख्य फायदा म्हणजे आता परदेशातील शेतकरी हंगाम नसलेली पिकेही केव्हाही घेऊ शकतात. या सर्व पद्धतीचा भारतातही मोठ्या प्रमाणात प्रचार होण्याची गरज आहे. शेतीतज्ञ या तंत्रज्ञानाचे आता भारतातील शेतक-यांना माहिती करुन द्यावी असा आग्रह धरत आहेत. यातील हायड्रोपोनिक तंत्राचाही खूप फायदा होत आहे. यातील शेती फक्त पाण्यावर आधारित असते. यामध्ये मातीचा वापर होत नाही. आज अनेक विकसित देश हायड्रोपोनिक तंत्राद्वारे भाज्या आणि फळांचे उत्पादन घेत आहेत. भारतातही काही भागात हे तंत्र शहरांमध्ये बागकामासाठी लोकप्रिय होत आहे. या तंत्राने झाडे पाईप-आकाराच्या संरचनेत लावली जातात. त्यामुळे जागा वाचते आणि पिकही भरभरुन येते. एकूण व्हर्टिकल शेती, शेड नेट फार्मिंग, ठिबक सिंचन पद्धती, हायड्रोपोनिक तंत्र या सर्वामुळे शेतीचे रुप बदलले आहे. लहरी हवामानावर मात करायची असेल तर अशा पद्धतीनं शेती करायला आता शेतक-यांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे.
सई बने