अक्षरशः दोन दिवसाच्या पावसात शेतातील सगळी पिकं होत्याची नव्हती झाली. इतक्या मोठ्याप्रमाणात झालेल्या पावसाच्या नुकसानीचा अंदाज ना सत्ताधाऱ्यांना आला ना विरोधकांना… जेव्हा माध्यमांनी ह्या बातम्या दाखवायला सुरुवात केली. त्यासोबतच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊ लागले, त्यानंतर कुठे यांना जाग आली. पण ते जागे झाले तेही राजकीय इच्छा आणि आकांक्षा सोबत घेऊनच…हेच महाराष्ट्राच दुर्दैवं आहे.
८० टक्के कृषीप्रधान देश असलेला भारत, आता अशा पद्धतीने सातत्याने शेतात नुकसान सोसत राहिला आणि शेती करणाऱ्यांना केवळ राजकीय पोपटपंचीच त्यांच्या वाट्याला आली तर, यापुढची तरुण पिढी शेतीत किती रममाण होईल ही शंकाच आहे. परतीच्या पावसात सर्वाधिक पाऊस पडला आहे तो उस्मानाबाद जिल्ह्यात… सरासरीच्या तब्बल ४५३ मिमी अधिक पाऊस ह्या जिल्ह्यात झाला. नद्या-नाले इतके भरुन वाहिले की, त्यांनाही कळलं नाही, आपण ज्या मार्गाने वाहतो तो मार्ग तरी कोणता? मग त्यांना जसा मार्ग मिळेल तशा त्या वाहिल्या आणि शेतकऱ्यांच्या शेतातील माती अक्षरशः खरवडुन नेली. काही ठिकाणी तर सुमारे ८-९ फूट खोल खड्डे शेतात तयार झाले आहेत, इतकी माती वाहून गेली आहे. अशा परिस्थितीत हा शेतकरी पुढचे दहा वर्ष उभा राहू शकणार नाही, ‘’इतकं भयंकर हे संकट आहे.
महाराष्ट्रात इतका भयंकर पाऊस चालू असताना मंत्रालय बसून सत्तेचा गाडा हाकणारे सगळे नामदार आपापल्या कामात ‘बिझी’ होते. पावसाने एवढं प्रचंड नुकसान झालं असेल याचा अंदाजही कुणाला येऊ नये? राज्याच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाने सरकारला त्याचा अंदाज दिला नसेल? सगळी कामं बाजूला ठेवून सरकार केवळ राज्यातल्या शेतकऱ्यांना कशी तात्काळ मदत पोहोचेल याचा विचार का करु शकलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
पावसातल्या नुकसानीचा अंदाज आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळीच घरातून निघाले आणि थेट पोहोचले शेतकऱ्याच्या बांधावर…त्यानंतर सत्तेतले आणि विरोधातले राजकारणी जागे झाले. त्यांनाही वाटलं आपणही जायला हवे. विरोधी पक्षनेत्यांनी दौरे आखले, मुख्यमंत्र्यांचाही दौरा आला. इतर पक्षाचे नेतेही शेताच्या बांधावर जाऊन फोटोमध्ये चमकू लागले. आणि मग इथूनच सुरुवात झाली राजकारणाची… प्रत्येक वेळेला शरद पवारांनाच एक पाऊल पुढे टाकून एखाद्या गोष्टीची सुरुवात करावी लागते, त्यानंतरच सत्ताधारी जागे होणार का? सत्तेत बसून राज्य चालवत असताना तुम्हाला याचा अंदाज कधी येणार? त्याला राजकारणात मुरुन चालत नाही तर त्यासाठी मुरब्बी असण्याचीही गरज आहे. कारण कुठलीही गोष्ट जास्त मुरली किंवा रापली तर त्याला वेगळा वास यायला लागतो. आजचं राजकारण हे तसंच झालं आहे.
पवारांनी दोन दिवसांचा दौरा आखला, शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. पुढच्या गावाला जाण्यासाठी त्यांनी मुक्काम केला. इथं आपले मुख्यमंत्री महोदय मात्र सकाळी येऊन संध्याकाळी मुंबईला परतले. मग विमानाच्या उड्डाणाच्या वेळा सांभाळण्यासाठी तुम्ही दौऱ्याच्या वेळा आखल्या का? दौऱ्यात किती शेतकऱ्यांच्या शेतात चिखल तुडवत आपण पोहोचलो याचाही विचार करा. केवळ आपल्या काही नेत्यांनी दाखवलेल्या त्यांच्या निवडक गावात जाऊन पाहणी करण्यापेक्षा ज्याठिकाणी भयंकर नुकसान झालं आहे, त्याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊन थेट त्या गावात पोहोचले असते, तर आपली संवेदनशीलता कळून आली असती, शेतकऱ्यांबद्दल सरकारच्या मनात असलेली तळमळ कळून आली असती.
मुख्यमंत्र्यांनी सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर आतातरी ह्या गोष्टी पवारांकडून शिकाव्यात. पवार आले म्हणजे आम्हाला काहीतरी पदरात पडेल, अशी भावना शेतकऱ्यांची निर्माण का झाली, त्याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे थेट त्यांच्यात मिसळून कार्यकर्त्यांना दूर ठेवून शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेणं. मग मुख्यमंत्री महोदय आपण एक दिवस सोलापुरात मुक्कामी थांबला असता, तर प्रशासकीय यंत्रणा केवळ आपल्या येण्याजाण्याच्या वेळेपूर्तीच कामाला लागली नसती. मुक्कामाच्या ठिकाणी उशीरापर्यंत बैठका घेऊन प्रशासनाला तात्काळ कामाला लागण्याचे आदेश तुम्हाला देता आले असते. मग मुंबईत जाण्याची इतकी घाई का केलीत?
जसे मुख्यमंत्री सोलापुरातून मुंबईला गेले, तसे तिकडे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत पोहोचले आणि आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. मजलदरमजल करत विरोधी पक्षनेते रात्री उशीरा अंधारात उस्मानाबादच्या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते. अंधारात कशाची पाहणी केली त्यांनाच माहिती…मागे एकदा मराठवाड्यात अशीच अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्राचं पथक आलं होतं. त्यांनी तर उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात बॅटरी लावून पिकांचे पंचनामे केले होते. ही आपली यंत्रणा आणि त्यांच्या अहवालावर राजकारण करणारे आपले धुरीण नेतेमंडळी…कसं भलं होईल आपल्या बळीराजाचं..
या सगळ्या नेत्यांच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वपक्षीय नेते मिळून मदत मिळवून देऊ असं म्हणण्यापेक्षा कुणी काय विधानं केली यावरच राजकारण सुरु झालं. शेतकऱ्याच्या प्रश्नाचा उल्लेख फक्त सुरुवातीच्या दोन ओळीत… मग तुम्ही दौरा कसला केला? हे काय कुठल्या निवडणुकीचे प्रचार दौरे नव्हते ना? शेतकऱ्यांबद्दल आस्था दाखवण्याचा केवळ दिखावा यातून केला का? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. सत्ताधारी पक्षातले नेते विरोधकांवर टीका करत होते. तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर… केंद्रस्थानी शेतकरी नाही, तर केवळ राजकारण होते. महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्राने जीएसटीचे किती पैसे थकवले? केंद्र सरकार तर मदत देईलच, पण आधी राज्याने मदत जाहीर करावी, असा प्रत्यारोप यातच या दौऱ्यातलं राजकारण फिरत राहिले. केवळ पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की, शेतकऱ्यांना कर्ज काढून मदत केल्याशिवाय पर्याय नाही. पण तरीही हे नुकसान भरुन निघणार नाही. राजकारण करणाऱ्या पवारांच्या सांगण्यात जर इतकी स्पष्टता असेल, तर ती इतर कुणी का मांडू शकत नाही.
हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निसर्गाने हिरावून नेला.
बाप जेऊ घालिना आणि आई भीक मागू देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
एक लक्षात ठेवा शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू, आणि त्यानंतर तुमच्या राजकारणाचं अस्तित्व राहील. आता खरी गरज आहे राज्यातल्या सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन केंद्राकडे मोठी मदत मागण्याची. राजकारण तर तुम्हाला चुकणार नाही, पण राजकारण करण्याची वेळ नाही, यातही राजकारण केलं तर मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार होईल. आता जरा आवरा आणि प्रामाणिकपणे राजकारण सोडून शेतकऱ्याच्या पदरी काय दान टाकता येईल, ते बघा म्हणजे तो बळीराजा तुम्हाला आशीर्वाद देईल.
लेखक : राजेंद्र हुंजे
- लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.
- Follow on twitter : @RajendraHunje