Home » मेक्सिकोच्या राष्ट्रपती म्हणून एका महिलेची निवड

मेक्सिकोच्या राष्ट्रपती म्हणून एका महिलेची निवड

by Team Gajawaja
0 comment
President of Mexico
Share

भारतात लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठे फेरबदल होत असतांना तिकडे मेक्सिको सारख्या देशातही एक मोठा बदल झाला आहे. जगातील सर्वात सुंदर देशांच्या क्रमवारीत मेक्सिकोचा समावेश होतो. असे असले तरी याच मेक्सिकोला गुन्हेगारांची राजधानी म्हणूनही ओळखण्यात येते. याच मेक्सिकोच्या राष्ट्रपती म्हणून एका महिलेची निवड करण्यात आली आहे.  हवामान शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाणा-या माजी महापौर क्लॉडिया शीनबॉम यांनी मेक्सिकोमध्ये इतिहास रचला आहे. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली आहे. (President of Mexico)

मेक्सिको हा जगातील सर्वात सुंदर देश मानला जातो.  त्याला कारण आहे, तेथील हवामान.  पर्यटनासाठी पोषक हवामान, परंपरा आणि आधुनिकीकरण यांचा अनोखा संगम यामुळे मेक्सिकोची ओळख आहे.  उत्तर अमेरिकेत असलेला हा देश संघराज्य घटनात्मक प्रजासत्ताक आहे. मेक्सिको हे अमेरिकेतील पाचवे सर्वात मोठे स्वतंत्र राष्ट्र आहे.  याच मेक्सिकोमध्ये आता पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. 

हवामान शास्त्रज्ञ क्लॉडिया शीनबॉम यांनी हा इतिहास रचला आहे. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. याशिवाय त्यांच्या विजयात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, शीनबॉम या देशातील सर्वोच्च पदावर पोहचणा-या पहिल्या ज्यू नेत्या आहेत.   मेक्सिकोच्या निवडणूक कार्यालयानुसार, त्यांना सुमारे ५८ टक्के मते मिळाली आहेत.(President of Mexico)

शीनबॉमचे प्रतिस्पर्धी उमेदवार, मेक्सिको सिटीचे माजी महापौर गाल्वेझ यांना  २६.६  टक्के मते मिळाली. राष्ट्रीय निवडणुका जिंकल्यानंतर, शीनबॉम यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मेक्सिकोच्या २०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहे.  मेक्सिको सिटीच्या त्या महापौर राहिल्या आहेत.   ६१ वर्षीय शीनबॉम या डाव्या विचारसरणीच्या नेत्या आहेत.  उच्चविद्याविभुषीत असलेल्या शीनबॉम या आपल्या भाषणासाठी ओळखल्या जातात.  

उर्जा अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. असलेल्या शीनबॉम यांची ओळख म्हणजे त्यांनी विश्लेषणात्मकपणे समस्या सोडवल्या आहेत. भक्कम वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारीत त्यांची कार्यप्रणाली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात महापौर म्हणून त्यांचा कार्यकाल गाजला. त्यांनी ९ दशलक्ष लोकसंख्येच्या शहरात चाचणी सुरू केली आणि राष्ट्रीय सरकारच्या भूमिकेला न जुमानता व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी व्यवसायांवर मर्यादा घातल्या. त्यामुळे मेक्सिकोमध्ये कोरोनामध्ये सर्वात कमी मृत्यू झाल्याची नोंद आहे. (President of Mexico)

मेक्सिकोमध्ये अनेक टोळ्यांचे वर्चस्व आहे.  तसेच नशेच्या पदार्थांचा मोठा व्यापार या देशात होतो.  या सर्वांवर मात करण्याचे आव्हान आता शीनबॉम यांच्यासमोर आहे.  देशातील विज्ञान संस्थांची प्रगती करण्यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत.  भारतामध्ये झालेल्या एक्झिट पोलचा निकाल लागला असला तरी मेक्सिकोमध्ये मात्र शीनबॉम यांच्या विजयाची पूर्ण खात्री एक्झिट पोलमधून देण्यात आली होती.  निवडणुकीच्या आधीही त्यांच्या विजयाची खात्री देण्यात आली होती. (International News)

मेक्सिकोमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुमारे १०० दशलक्ष लोकांनी नोंदणी केली होती.  मेक्सिकोतील आतापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले.  अर्थात मेक्सिकोमध्येही या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. पण शीनबॉम यांना मेक्सिकोतील महिलांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली.  संघटीत गुन्हेगारीचा नायनाट करणार हे त्यांचे आश्वासन महिला मतदारांसाठी दिलासादायक ठरले.  त्यामुळेच त्यांचा विजय सुकर झाल्याचे बोलले जाते.  मेक्सिकोमध्ये तब्बल ५२ टक्के मतदार महिला आहेत, या सर्व शीनबॉम यांच्या पाठिशी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. (President of Mexico) 

त्यांचा ज्यु कुटुंबात झालेला जन्मही या विजयामागे असल्याचे बोलले जाते.  क्लॉडिया शीनबॉम यांचे आई-वडिलही शास्त्रज्ञ आहेत.  क्लॉडियाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.  त्याचे आईवडीलही राजकारणात आहेत.  त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शीनबॉम या विद्यार्थी राजकारणात सक्रीय झाल्या. पालकांप्रमाणेच त्यांनी विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.(Latest International News) 

============

हे देखील वाचा : अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलला आदित्य रॉय कपूर, म्हणाला…

============

१९६८  पासून शीनबॉम मेक्सिकोच्या राजकारणात आहेत. विद्यार्थी दशेपासून राजकारणात असल्यामुळे त्यांचा अभ्यासू राजकारणी म्हणून उल्लेख करण्यात येतो. देशाचा कारभार हाती आल्यावर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन कार्यक्रम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.  तसेच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवणे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत खत अशी आश्वासनेही शीनबॉम यांनी दिली आहेत.  आता शीनबॉम नागरिकांना दिलेली आश्वासने कशी प्रत्यक्षात उतरवतात, हे काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.