डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Awachat) यांच्या दोन मुली आणि सर्व परिचित त्यांना बाबा म्हणत. तोच आपलेपणा अवचट यांच्याबरोबर जोडला गेला आणि अवचट अधिक आपलेसे होऊ लागले. जगातल्या सर्व चांगल्या कलांमध्ये निपूण असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल अवचट. जेवढी लेखणी चालणार तेवढाच त्या हातांनी चवदार स्वयंपाकही होणार आणि त्याच हातात एखादा कागद मिळाला, तर समोरच्या लहानग्याला खूष करण्यासाठी त्या कागदाला कुठल्याश्या प्राण्याचा आकार मिळणार!
चित्रकला, गाणं, पेटी-बासरी वाजवणे, ओरिगामी, लाकडावर कोरण्याची कला, शास्त्रीय संगीत, वकृत्व या सर्वात अनिल अवचट पारंगत होतेच. सर्वात प्रभावी म्हणजे ते सजग लेखक होते. कुठलीही असायंटमेट मिळाली की बसल्या जागी ते कधीही लिहित नसत. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन, अनेकांबरोबर बोलून मग सर्व कागदावर उतरवायचे. कधीही त्यांनी कोणाला कमी लेखलं नाही, की स्वतःला कधी विद्वान समजलं नाही. अगदी साधा…सरळ…सोप्पा माणूस!

अनिल अवचट (Dr. Anil Awachat) यांचा जन्म पुण्यातील ओतूरमधला. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. पण डॉक्टर होऊन पैसे कमावणे हा उद्देश कधीच ठेवला नाही. सामाजिक भान असलेले अवचट डॉक्टर म्हणण्यापेक्षा लेखक म्हणून अधिक प्रसिद्ध झाले ते त्यामुळेच. त्यांना साथ मिळाली ती त्यांची पत्नी डॉ. अनिता अवचट यांची.
डॉ. अनिता या मानसोपचार तज्ज्ञ. पुण्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होत्या. अवचट दांम्पत्याला दोन मुली, मुक्ता आणि यशोदा. दोन्हीही मुलींना त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत शिकवलं. यावरुन अवचट यांना अनेक सल्ले मिळाले कारण या दोन्ही मुली ज्या शाळेत जायच्या तिथे कामगारांची मुलं शिकायला यायची. पण आपण जिथे रहातो, तिथलंच शिक्षण योग्य असतं, यावर अवचट कायम राहिले.
“मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजभान असणे जास्त महत्त्वाचे असते”, हा संदेश अवचटांच्या लिखाणातून मिळाला. तोच त्यांनी त्यांच्या वागण्यातून प्रत्यक्षातही दिला.
आज अवचटांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या दोन्ही मुली समर्थपणे चालवत आहेत. त्यांची मोठी मुलगी मुक्ता पुणतांबेकर यांनी पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम.ए. करताना चान्सेलर्स गोल्ड मेडल मिळवलं. मुक्तांगण सारख्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात नवीन आशेचा किरण फुलवत आहेत, तर यशोदा वाकणकर यांनी एपिलेप्सी असलेल्यांसाठी ‘संवेदना फाऊंडेशन’ चालू केली आहे.

अनिल अवचट (Anil Awachat) हे भन्नाट लेखक. कुठल्याही विषयवर लिहितांना त्या विषयाचा अभ्यास करण्याची त्यांची हतोटी होती. दुष्काळाचा विषय जेव्हा त्यांनी हाताळला तेव्हा दुष्काळाचा फटका बसून विस्थापीत झालेल्या अनेकांबरोबर त्यांनी संवाद साधला. दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला. तिथे मुक्काम केला. त्यामुळे अवचट यांचे लेख म्हणजे अभ्यास कसा करावा, याचा नवोदितांसाठी एक धडाच असायचा. हे सर्व करताना सामाजिक कार्यातही अवचटांचा वावर होता.
अनिल अवचट (Anil Awachat) यांची जवळपास अडतीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘पुर्णिया’ हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक. त्यांची सर्व पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवरील आहेत. अगदी बालसाहित्याचाही त्यात समावेश आहे. त्यांची अमेरिका, अक्षरांशी गप्पा, कार्यमग्न, कार्यरत, छंद, जिवाभावाचे, पुण्याची अपूर्वाई, बहर शिशिराचा: अमेरिकेतील फॉल सीझन, माणसं, रिपोर्टिंगचे दिवस, सृष्टीत…गोष्टीत, ही पुस्कते कायम ‘बेस्ट सेलर’ ठरली आहेत.
अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्यामध्ये व्यसनमुक्ती कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, फर्ग्युसन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगणच्या माध्यमातून अनिल अवचट (Anil Awachat) यांनी केलेल्या कामाला तोड नाही. तरीही ते दुःखी असायचे. मुक्तांगण चांगलं बहरंलय असं म्हटलं की, त्यांना वाईट वाटायचे. बहरण्यासाठी मुक्तांगण चालू केलं नव्हतं. काहीतरी थांबवायचं होतं, त्यासाठीची ती सुरुवात होती. हे त्यांचे बोल म्हणजेच समाजभान असलेल्या अवचटांची खरी ओळख होते.
काही वर्षापूर्वी एका शाळेच्या व्याख्यानासाठी अवचटांना बोलवलं होतं. मोबाईलच्या जगात साध्या लॅडलाईन फोनमध्ये आनंद मानणारे अवचट ‘हो ना हो’ करत आले. पुण्यापासून डोंबिवली! कुठलीही अट नाही. “शाळेतल्या मुलांबरोबर बोलायचं आहे, आनंद वाटतो”, एवढं बोलून दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेवर हजर! जवळपास एक तास ते मुलांबरोबर बोलले. त्यांच्या अनुभवाचा समृद्ध खजिना मुलांसमोर उघड केला आणि त्यांनाही पुस्तकांबरोबर समाजाला जाणण्याचे आवाहन केले. निघतानाही ते तसेच होते. वयोमानानुसार होणारा त्रास जाणवत होता पण, “मुलांना घडवायला पाहिजे. उद्याचा समाज त्यांच्याच हातात आहे. त्यांची नजर विस्तृत झाली पाहिजे”, हा आग्रहवजा सल्ला सगळ्यांना देऊन गेले.
जेव्हा केव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा अनिल अवचट या भन्नाट माणसाचा परिचय झाला. वाचनालयात गेल्यावर काय वाचायचे, हा प्रश्न घेऊन अर्धा अधिक तास पुस्तकांना हाताळण्यात गेला तेव्हा तिथल्या जाणकारानं, “अवचट वाचा आवडेल आणि वाचायची गोडीही लागेल”, हा सल्ला दिला होता. तो सल्ला प्रमाण मानून अवचट यांनी लिहिलेले पुस्तक घेतले आणि वाचनाची सवय लागली. नवीन शब्द गाठीशी आले आणि लिखाण कसे करावे याचे आपसूक धडे मिळाले. न भेटताही मग अनिल अवचट नावाचा माणूस परिचीत झाला.

आज अवचट सर गेल्याची बातमी कळली तेव्हा जाणवलं, अनिल अवचट (Anil Awachat) यांचे लिखाण का आवडते, याचे उत्तर म्हणजे, ते स्वतःसारखं लिहायचे, साधं, सरळ आणि सोपं! अगदी आपल्या नेहमीच्या बोलण्यातील शब्द, उगीचच मोठ्या क्लिष्ठ शब्दांची रांग नाही की, मोठ्या वल्गना नाहीत आणि उपमा तर नाहीतच. जे लिहायचं ते आपलंसं वाटायचं. त्यामुळेच अनिल अवचट यांचं पुस्तक वाचायला घेतलं आणि ते लगेच खाली ठेवलं, असा वाचक कधी भेटलाच नाही.
=====
हे देखील वाचा: ज्ञानोपासकांच्या परंपरेतलं मानाचं नाव: दुर्गा भागवत!
=====
जो ‘अवचट’ वाचायला घेणार तो झपाटणारच! त्याच नादात पुस्तक वाचणार आणि पुन्हा पुन्हा वाचत राहणार! प्रत्येक वेळी वाचताना नवीन अवचट भेटत जातात. हिच अवचटांची कल्पना होती. हा माणूस सदैव नवीन राहीला. प्रत्येक पिढीला तो आपलासा वाटला. काहींना तो समकालीन सोबती वाटला, तर तरुणांना आपला मित्र आणि नुकतीच मिसरुट फुटत, वाचायला सुरुवात केलेल्यांना एक मार्गदर्शक!
प्रत्येक वयाला भावेल असेच त्यांचे लिखाण होते. त्यांचा हा ‘फ्लेक्झीबल’ साचाच त्यांच्या चाहत्यांना विशेष भावायचा. अनिल अवचट गेले, ही बातमी दुःखदाक, पण अवचट कधीही जाणार नाहीत. त्यांच्या पुस्तकरुपांनी, समाजसेवेच्या संदेशांनी आणि प्रत्येक पिढीला जीवनाचा खरा अर्थ समजावत, ते कायम आसपास राहतील. आजूबाजूला कितीही ‘ब्रॅन्डेड’ माणसांचा घोळका वाढला, तरीही साध्या शर्ट आणि लेंग्यामध्ये सरस्वतीचा वारसा सांगणारे अनिल अवचट (Anil Awachat) कायम आपल्यातच राहतील!
– सई बने